सुईदेखील बनवू शकणार नाही म्हटल्या जाणाऱ्या देशाने एका वर्षात रेल्वेचा कारखाना उभारला..

भारताला मध्ययुगातून आधुनिक युगात नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रेल्वेने. नाना शंकर शेठ यांच्या सारख्या दृष्ट्या नेत्याच्या प्रयत्नातून भारतात रेल्वे सुरु झाली आणि देशाच चित्र पालटलं. इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी कानाकोपऱ्यात रेल्वे पोहचवली आणि देशाची गाडी प्रगतीच्या रुळावर येऊन धावू लागली.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. इतिहासाचे नवीन पाऊल पडत होते. इंग्रज देश सोडून गेले पण जाताना इथली भरमसाठ लूट आपल्या देशाला घेऊन गेले. एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा हा श्रीमंत देश  आधुनिक बनला मात्र पैशांच्या बाबतीत मात्र प्रचंड कफल्लक बनला होता.

इंग्रजांच्या सुनियोजित लुटीमुळे १५० वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात भारतात कोणतेही उद्योगधंदे उभे राहू शकले नाहीत. इंग्लंडमधील आयातीवरच भारतीयांनी अवलंबून राहावे हीच ब्रिटिशांची नीती होती. भारतातले कारखाने बंद पाडले, इथला कच्चा माल स्वस्तात घेतला आणि युरोपात तयार होणारा पक्का माल महागड्या किंमतीत विकला.

स्वातंत्र्यानंतर हे चित्र बदलायचं असं त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी ठरवलं. गांधीजींच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नेहरू, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पासून ते देशातल्या सामान्य माणसांपर्यंत सगळे झाडून कामाला लागले.

सुई पासून ते अंतराळ यानापर्यंत प्रत्येक गोष्ट भारतात निर्माण व्हावी यासाठी नेहरूंचा कटाक्ष होता. टाटा, बजाज, बिर्ला या उद्योगसमूहाना भारतात वेगवेगळे कारखाने सुरु करण्यास प्रोत्साहन दिले गेले.  मात्र काही उद्योग असे होते ज्याचा थेट गोरगरीब जनतेच्या दैनदिन जीवनाशी संबंध येत होता. या उद्योगामध्ये सरकारनेच उडी घेतली.

यातच एक प्रमुख उद्योग होता तो म्हणजे रेल्वे इंजिन बनवणे.

स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून भारतात बंगालमध्ये रेल्वे इंजिन बनवण्याच्या कारखान्याच्या निर्मितीचे प्रयत्न सुरु झाले होते. पण इंग्रज सरकारने त्याला जास्त महत्व दिले नव्हते. पण स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या सरकारने त्याला गती दिली. बंगालमध्ये रेल्वे कारखाना उभारण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले.

पुढच्या एकाच वर्षात  रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची पश्चिम बंगालमधील बरद्वान जिल्ह्यातील मीहीजाम येथे स्थापना करण्यात आली आणि एकंदरीतच भारतीय रेल्वेच्या विकासाच्या कार्याला मोठ्या उमेदीने सुरुवात झाली.

स्वातंत्र्यापूर्वी विविध संस्थानिकांच्या ताब्यात असलेल्या ४२ खाजगी रेल्वे कंपन्यांचं केंद्र सरकारने त्वरेने विलीनीकरण केलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रीयीकरण करून त्या भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत आणल्या होत्या. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच व सर्वांगीण विकासाच कार्य हाती घेण्यात आलं. इंजिननिर्मितीचा कारखाना उभा करणं हे याच उपक्रमातील पहिलं पाऊल होतं.

कोलकात्या पासून २३५ किलोमीटर दूर असलेल्या मीहीजाम इथे वाफेची इंजिने तयार करण्याचा हा कारखाना उभारण्याचा निर्णय झाला होता. असनसोल- पाटणा लोहमार्गावरील मीहीजाम या स्थानकाजवळ असलेल्या या गावातील जवळपास १८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर हा कारखाना उभारला गेला. इंजिनांची निर्मिती करणाऱ्या जगातील मोठ्या कारखान्यांमध्ये या कारखान्याची गणना होते.

बंगालचे अग्रणी स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कारखान्याला ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’ असं नाव देण्यात आलं आणि मीहीजाम स्थानकांचही चित्तरंजन असच नामकरण करण्यात आलं.

भारतात ‘चित्तरंजन’ कारखान्या पूर्वी १९४५ मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातच टाटा उद्योगसमूहाच्या ‘टाटा इंजीनियरिंग अँड लोकोमोटिव्ह वर्क्स’ (टेल्को) या खासगी कारखान्याची स्थापना झाली होती. इथेही मीटर गेजवर चालणाऱ्या इंजिनांची निर्मिती सुरू होती.

परकीय बनावटीच्या भागांचा वापर न करता पूर्णतः स्वतंत्र तंत्रज्ञान वापरून मीटर व ब्रॉडगेजवर चालणारी सुमारे २०० वाफेची इंजिने तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून या कारखान्याने सुरुवात केली. १९५० मध्ये पहिले वाफेचे इंजिन येथे तयार करण्यात यश आलं आणि १ नोव्हेंबर १९५० रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते हे इंजिन राष्ट्राला समर्पित करण्यात आलं.

१९६१ साली या कारखान्यात भारतातले पहिले इलेक्ट्रिक इंजिन बनवण्यात आले. त्याला नाव देण्यात आलं लोकमान्य. खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑक्टोबर १९६४ रोजी या रेल्वे इंजिनचे उद्घाटन केले.

या कारखान्यात पुढे कालानुरूप अनेक बदल करण्यात आले. १९६८ पासून डिझेल इंजिनांची निर्मिती सुरू झाली. १९७२ मध्ये ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’ मध्ये बनवलेलं ‘अंतिम सितारा’ हे इंजिन या कारखान्यात बनवलेले अखेरचा वाफेचे इंजिन ठरलं.

आज जवळपास ७४ वर्षे झाली, फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे इंजिन कारखान्यामध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्हच नाव घेतलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला याचे उदाहरण म्हणून हा चित्तरंजन कारखाना ओळखला जाईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.