नुसतं भारतातलं नव्हे तर जगातलं सर्वात मोठ्ठं नौदल “चोल” राजांच होतं…

पीएस-1 पिक्चर ३० सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या पिक्चरची चर्चा तशी फार आधीपासूनच सुरू होती. सगळी दाक्षिणात्य स्टारकास्ट, त्यात चोल साम्राज्याचा वैभवशाली इतिहास आणि हिरॉईन म्हणून ऐश्वर्या राय या कारणांमुळे हा पिक्चर चांगलीच गर्दी खेचत आहे. पहिल्या दिवशीच या पिक्चरने ४० कोटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन होते.

या पिक्चर मध्ये ९ व्या शतकातला इतिहास डोळ्यांसमोर उभा केला आहे. हे सगळं उभा करायचे म्हणजे काय सोप्पी गोष्ट नाही. यात मोठमोठी जहाजं दाखवण्यात आलीयेत, या जहाजांवर युद्ध होतं, सौनिकांचे घोडे जहाजांमधून निघतात. बघायला भारी वाटतं,

पण एक प्रश्न पडतो की त्याकाळात युद्धनौका होत्या का ? तेही इतक्या खतरनाक ? तर उत्तर आहे हो. भारतातलं नाही तर एकेकाळी जगातलं सगळ्यात ताकदवान नौदल चोल राजांनी उभं केलं.

नुसतं उभं नाही केलं, तर या नौदलाच्या जीवावर आपल्या साम्राज्याच्या सीमा दूरवर पोहोचवल्या.

कोण होते हे चोल राजा ?

दक्षिण भारतातल्या तमिळ राजांनी उभं केलेलं हे चोल साम्राज्य, आजही जगातलं सगळ्यात जास्त काळ राज्य करणारं साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. चोलांनी इसवीसन पूर्व चौथं शतक ते इसवीसन १२७९ पर्यंत राज्य केलं. म्हणजे जवळपास १३०० वर्ष चोल राजे सत्ताधीश होते.

चोल साम्राज्याचा इतिहास तीन कालखंडात सांगितला जातो.

पहिला कालखंड म्हणजे इसवीसन पूर्व चौथं शतक ते इसवीसन २०० हा ६०० वर्षांचा काळ. या कालखंडात उत्तरेत मौर्य राजाचं साम्राज्य होतं, दक्षिणेकडचा भाग चोलांच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर विजयालया चोल हा कालखंड इसवीसन ८४८ ते १०७० असा होता, तर चालुक्य चोल हा कालखंड १०७० ते १२७९ सालापर्यंत होता. चोल साम्राज्याचा विस्तार दक्षिण भारतापासून ते पार पश्चिम बंगाल, ओडिसा, श्रीलंकेचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचला होता.

चोल साम्राज्य अजिंक्य आणि बलवान बनलं ते इसवीसन नवव्या शतकात आणि याचा कर्ताधर्ता होता, राजराजा चोल पहिला. प्रचंड दूरदृष्टी असलेल्या या राजानं चोलांचंच नाही, तर जगाचं भविष्य बदलून टाकणारे काही निर्णय घेतले असं सांगितलं जातं. पहिल्या राजराजाचा कालखंड इसवीसन ९८५ ते १०१४ असा आहे. याकाळात त्यानं दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या.

पहिलं म्हणजे त्यानं शक्तिशाली नौदल उभारलं आणि या नौदलाच्या ताकदीवर पार आपल्या साम्राज्याची राजकीय, आर्थिक आणि सामरीक ताकद वाढवली.

राजराजा चोलानं नौदलाचा वापर कसा केला ?

समुद्रावर अंमल असणारा पहिला राजा म्हणून राजराजा चोलाचं नाव घेतलं जातं. चोल साम्राज्याकडे साध्या नौका होत्या, पण समुद्रावर राज्य प्रस्थापित केलं, तरच आपण साम्राज्याचा विस्तार करु शकतो, हे राजराजा चोलानं ओळखलं. आर्थिक ताकद वाढवण्यासाठी राजराजानं चीन आणि अरब देशांशी समुद्री व्यापार करायला सुरुवात केली. चोल चीनमध्ये मसाले पाठवायचे आणि त्याबदल्यात कापूस आणि लोखंडाची आयात करायचे. तर अरब देशांकडून चोल राजानं उंची घोड्यांची आयात करायला सुरुवात केली. या दोन्ही देशांमधून राजराजानं काही माणसंही भारतात आणली.

ही माणसं मोठमोठी जहाजं आणि युद्धनौका बांधण्यात एक्स्पर्ट होती…

राजराजानं आता व्यापारच नाही, तर समुद्री मार्गाचा वापर करुन आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचं ठरवलं. राजराजानं अगदी रोममध्येही आपला व्यापार पोहोचवल्याचं सांगण्यात येतं. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर ताकद राखून असणारे हे चोल राजे मालदीव, चीन, रोम, अरब देश, फिलिपाईन्स असे सर्वदूर पसरले होते, तेही फक्त व्यापाराच्या आणि नौदलाच्या जोरावर.

चोलांचं नौदल रणभूमीतही पराक्रम गाजवणारं ठरलं, राजराजा चोलाच्या काळात त्यांनी श्रीलंकेचा राजा महिंदा पंचम याचा पराभव केला आणि सगळी श्रीलंका आणि केरळ (तेव्हाचं मलबार) आपल्या अधिपत्याखाली आणलं. श्रीलंकेवर हल्ला करण्यासाठी राजराजा चोलानं नौदलाचाच वापर केला होता.

बापसे बेटा सवाई

१०१२ ते १०४४ असा कालखंड असलेला राजेंद्र चोल हा राजराजा चोलाचा मुलगा. यानं आपल्या वडिलांनी उभं केलेलं नौदल आणखी शक्तिशाली बनवलं. राजेंद्र चोलानं व्यापार तर वाढवलाच पण सोबतच नौदलाची ताकद काही पटींनी वाढवली. या ताकदीच्या आधारे त्यानं इंडोनेशिया (तेव्हाचं श्रीविजय) आपल्या अधिपत्याखाली आणलं. आजचा नकाशा बघितला तर भारताच्या समुद्र सीमेपासून इंडोनेशिया तब्बल २३४१ नॉटिकल माईल्स लांब आहे.

इतक्या लांबच्या देशावर समुद्रातून पूर्ण ताकदीनिशी हल्ला करणारं आणि तो देश ताब्यात घेणारं नौदल किती सुसज्ज असेल याचा आपल्याला सहज अंदाज येतो. राजेंद्र चोल नुसता इंडोनेशिया ताब्यात घेऊन स्वस्थ बसला नाही, त्यानं चीन, सुमात्रा, म्यानमार इथं आपले दूतही पाठवले होते.

पण हे नौदल नेमकं होतं कसं ? त्याची रचना कशी होती ?

चोल साम्राज्याच्या नौदलात नौकांचे चार प्रकार होते –

थिरीसदाई – ही होती चोल साम्राज्याची सगळ्यात मोठी युद्धनौका, यावर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र असायची आणि सोबतच या नौकेत एकाचवेळी दोन शत्रूंना झुंजत ठेवण्याची ताकद होती.

धरणी – या त्यांच्या नौदलातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौका, ज्यावर तोफा, घोडे आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज सैन्य असायचं.

लुला – मोठ्या नौकांसोबत जाणाऱ्या हल्ला करण्याची आणि संकटकाळी ‘रेस्क्यू बोट’ म्हणून काम करण्याची जबाबदारी या नौकांवर असायची. 

वज्र – आकारानं छोट्या पण हल्ला करु शकणाऱ्या या वेगवान नौका चोलांचं नौदल आणखी मजबूत करणाऱ्या होत्या.

एवढंच नाही तर नौदलातल्या अधिकाऱ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या आणि पदंही वाटून देण्यात आली होती.

चोल साम्राज्याच्या सर्व सेनेचा अधिपती ‘चक्रवर्ती’ या नावानं ओळखला जायचा. ‘जलथीपथी’ या पदावरचा अधिकारी हा नौदलाचा प्रमुख असायचा. तर जहाजांच्या ताफ्याचा जो प्रमुख अधिकारी असायचा त्याला अथीपथी, देवरन किंवा नयगन या नावांनी ओळखलं जायचं. 

थोडक्यात ज्या प्रकारे आज भारतीय सैन्यात अधिकाऱ्यांना पद आणि जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत, अगदी त्याचप्रकारे चोल राजांनी पार नवव्या आणि दहाव्या शतकात आपल्या नौदलाचं नियोजन केलं होतं.

आजही आपल्याकडे युद्धनौका आणि लढाऊ विमानांना वेगवेगळी नावं दिलेली असतात. त्याचप्रमाणे चोल साम्राज्यातही नौकांना वेगवेगळी नावं देण्यात आली होती. ‘आक्रमंधम’ या जहाजातून फक्त राजघराण्यातली लोकं प्रवास करायची. त्यांच्यासाठी शाही थाटातल्या रूम्सही या जहाजावर बांधण्यात आल्या होत्या. दुसरा प्रकार होता ‘नीलमंधम.’ राजकीय अधिकारी, आणि राजे या जहाजाचा वापर करायचे. यात राजकीय बैठकाही व्हायच्या. तर सर्पमुगम नावाचं जहाज नदीतल्या प्रवासासाठी वापरलं जायचं. ज्यात अग्रभागी सापाचं शिल्प उभं केलेलं असायचं.

याच नौदलाच्या जोरावर चोलांनी आपलं साम्राज्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवलं. त्यांच्या नौदलाची ताकद इतकी अजस्त्र होती की, एकेकाळी चोल साम्राज्याकडे जगातलं सगळ्यात मोठं नौदल होतं. या साम्राज्यानं भारताला मोठमोठी मंदिरं बांधत स्थापत्याचा वारसा तर दिलाच, पण सोबतच नौदलातून पार दहाव्या-अकराव्या शतकात भारताचा जगभर दबदबा तयार केला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.