अंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या “चोरीचोरीने” बॉलिवूडला शहाणं केलं.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातल्या उत्तरार्धातली. मुंबई तेव्हा भीतीच्या वातावरणाखाली जगत होती. अंडरवर्ल्डच्या गॅंग वोर्सनी टोक गाठलं होत. दुबई किंवा पाकिस्तान मधल्या कराची मध्ये बसून मुंबई वर कन्ट्रोल ठेवलं जात होत. ९३ सालच्या बॉम्ब स्फोटानंतर दहशतीच्या जोरावर खंडणी गोळा करून त्यांचा कारभार चालला होता.

यात अंडरवर्ल्डची सर्वात सोपी टार्गेट होती मुंबईची फिल्म इंडस्ट्री.

कोणीही सोम्यागोम्या गुंडाने फिल्मस्टारचा फोन फिरवावा आणि डॉनचं नाव सांगून खोका पेटीसाठी धमकी द्यावी असं चालल होता. खरं तर दाऊद इब्राहिमच्या डी कंपनी मध्ये हे डिपार्टमेंट छोटा शकील कडे होते. अबू सालेम मुंबई मध्ये वरून आलेले आदेश इम्पलिमेन्ट करायचा. पण हळूहळू सालेमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढला तो शकीलच्या पाठीमागे डील करू लागला होता.

१२ ऑगस्ट १९९७ कॅसेट किंग गुलशन कुमारची दिवसाढवळ्या हत्या झाली आणि फक्त फिल्मइंडस्ट्रीच नाही तर पूर्ण देश हादरला.

या मागे अबू सालेमचा हात होता. असं म्हणतात की याची पूर्वकल्पना दाऊदला देण्यात आली नव्हती. इथूनच अबू सालेम डी कंपनीच्या ब्लॅक लिस्ट मध्ये गेला. आधीच त्याच आणि छोटा शकीलच पटत नव्हत. अबू सालेम दाऊदच्या नाकावर टिच्चून स्वतःची वेगळी खंडणी गोळा करू लागला.

रोज वेगवेगळ्या डायरेक्टर प्रोड्युसरला फोन जायचे. वेगवेगळ्या डिमांड ठेवल्या जायच्या. पिक्चरचा हिरो कोण हिरोईन कोण इथपासून ते पिक्चर रिलीज कधी करायचा इथं पर्यंत हे सगळं अंडरवर्ल्डचे छोटे मोठे डॉन ठरवू लागले. अबू सालेमच्या माणसांनी “कहो ना प्यार है” या सिनेमा वेळी राकेश रोशन वर प्राणघातक हल्ला केला. त्यात ते जखमी झाले पण ड्रायव्हरच्या समयसूचकतेमुळे त्यांचे प्राण वाचले.

आता मात्र हद्द झाली होती. मुंबई पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढायचं ठरवलं.

साल होतं २०००.

अब्बास मस्तान या जोडगोळीच्या चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. या सलमान खान मुख्य हिरो तर राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा या दोघी नायिकेच्या रोल मध्ये होत्या. प्रोड्युसर होता नझीम रिझवी.

या पिक्चरसाठी भारतातला सर्वात मोठा हिरे व्यापारी भरत शाह याने तेरा कोटी रुपये फायनान्स केले होते.

शूटिंग च्या दरम्यान एक दिवस प्रीती झिंटाने नझीम रिझवीला सांगितले की अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा तिला ५० लाख रुपये खंडणीसाठी फोन येतोय. रिझवी तिला म्हणाला की मी पाहून घेईल तू टेन्शन घेऊ नको. तरी प्रितीने हि गोष्ट संजय दत्तच्या कानावर घातली. 

संजय दत्तचे अंडरवर्ल्डशी कॉन्टॅक्ट आहेत हि गोष्ट लपून राहिलेली नव्हती. संजय दत्तने अबू सालेम प्रीतीला त्रास देतोय याची कम्प्लेंट छोटा शकील कडे केली. याच फोन रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे. छोटा शकीलच डोकं फिरल त्यानं अबू सालेमचा थोड्याच दिवसात गेम करणार असल्याचं संजय दत्तला सांगितलं. यामागे त्याला प्रीती झिंटा बद्दल सहानुभूती होती असे नाही तर कारण वेगळंच होत.

चोरी चोरी चुपके चुपके या सिनेमासाठी पैसे भरत शाह ने नाही तर छोटा शकील म्हणजेच शेवटी दाऊद इब्राहीमने गुंतवले होते. 

ही गोष्ट मुंबई पोलिसांना कळली. असं म्हणतात याची टीप अबू सालेमने पोलिसांना दिली होती. भरत शाह आणि नझीम रिझवीला अटक झाली. अंडरवर्ल्ड खंडणी प्रकरणात पहिल्यांदाच फिल्मइंडस्ट्रीचे इन्सायडर सापडले होते. अंडरवर्ल्ड आणि फिल्मइंडस्ट्रीचा अनौरस संबंध सगळ्या जगासमोर उघड झाला होता.

भरत शाह बॉलिवूडचा सर्वात मोठा फायनान्सर होता. अनेक मोठ्यामोठ्या सिनेमाना त्याने फायनान्स केला होता. यश चोप्रा, राजकुमार संतोषी, संजय लीला भन्साळी अशा मोठ्या मोठ्या दिगदर्शकांना त्याने फिल्म बनवण्यासाठी पैसे पुरवले होते. त्याची अटक झाल्यामुळे अनेकांची चौकशी सुरु झाली.

शाहरुख, ह्रितिक अशा अनेक फिल्मस्टारनी पोलिसांपुढे आपल्याला धमक्या येत होत्या हे मान्य केले. पण जेव्हा कोर्टात सांगायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपली साक्ष पलटवली. फक्त प्रीती झिंटा ही एकमेव अभिनेत्री होती जिने आपल्याला अबू सालेमचा फोन आला होता हे सांगायचं धाडस दाखवलं. असं म्हणतात कि सलमान खानला ठाऊक होते की हा सिनेमा छोटा शकीलच्या पैशातून बनत होता. 

त्यावेळी आरोप झाले की भरत शाहचा वर पर्यंत हात असल्यामुळे तो सहज यातून बाहेर पडेल. शिवाय त्याच्या जेलमध्ये जाण्यामुळे निम्मी फिल्मइंडस्ट्री ठप्प होणार होती. पण तेव्हाचे गृहमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की ,

“कायद्याच्या वर कोणीही नाही. पोलिसांच्या हातात सज्जड पुरावे सापडले आहेत ज्यावरून सिद्ध होते की भरत शाह आणि छोटा शकील यांचे आर्थिक व्यवहार होते.”

भरत शाहवरचे आरोप सिद्ध झाले. त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. जिवाच्या भीतीने देशोदेशी फिरणारा अबू सालेम अखेर पोर्तुगालमध्ये पोलिसांच्या स्वाधीन झाला. 

चोरी चोरी चुपके चुपके २००१ साली रिलीज झाला. हिटही  झाला. स्टोरी सरोगसी मातेवर होती पण टिपिकल फिल्मी स्टाईल मध्ये रंगवली होती. या सिनेमामुळे बाकी काही नाही पण एक गोष्ट झाली, फिल्मइंडस्ट्रीची काळी बाजू बाहेर आली. त्यावेळचे पोलीस कमिशनर सिवानन्दन यांच्या प्रयत्नातून बॉलिवूडवरचा अंडरवर्ल्डचा विळखा कमी झाला. एका अर्थे चोरीचोरी चुपके चुपके फिल्मइंडस्ट्रीसाठी वरदान ठरला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.