छोटा राजनला मिथुनचं इतकं वेड होतं कि तो कपडेदेखील मिथुनसारखे शिवून घ्यायचा.

आपल्या देशात एकवेळ महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर लोकं चालणार नाहीत पण पिच्चरमधल्या एखाद्या हिरोने डायलॉगमधून सांगितलेल्या गोष्टी लगेच करून बघतील. सिनेमाचा प्रभाव इतका जबरदस्त आहे कि त्यातून सुटका नाही. म्हणजे शूटआउट ऍट वडाळा आणि लोखंडवाला बघून तरुणाई अक्षरशः वेडी झाली होती. पण हे झालं मागच्या काही वर्षातील.

पण ज्यावेळी अंडरवर्ल्ड ऐन भरात होतं, टोळीयुद्धे, मुंबईवर दहशत बसवणे अशा गोष्टींना ज्यावेळी ऊत आला होता तेव्हा बॉलिवूड देखील याला बळी पडलं होतं. बॉलिवूडचे सिनेमे अंडरवर्ल्ड प्रोड्युस करू लागलं होतं. आता अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड यांचा एकमेकांशी अगदी घनिष्ठ संबंध आहे.

मुंबईचा डॉन असलेल्या मस्तानवर आधारित दिवार हा चित्रपट आला, अंडरवर्ल्डमधील पहिला एन्काऊंटर मन्या सुर्वे आणि माया डोळस यांच्यावरही चित्रपट आलेत. पण एक डॉन असा होता जो सिनेमातल्या नायकाच्या भयंकर प्रेमात पडला होता. नक्की कोण होता हा मिथुन मॅनिया.

राजेंद्र निकाळजे. हा तरुण पुढे जाऊन अंडरवर्ल्डचा नाना अर्थात छोटा राजन झाला. हा छोटा राजन मिथुन चक्रवर्तीचा भक्त होता. बाकीच्या हिरोंमध्ये नसलेली एक शैली, बहुविविधता मिथुनमध्ये होती त्यामुळे तो त्याला भयंकर आवडायचा. मिथुनचा ‘ सुरक्षा ‘ हा पहिला चित्रपट पहिल्यापासून राजन डिस्को डान्सर, आणि तुफान हाणामारी करणाऱ्या मिथुनचा निस्सीम चाहता बनला होता.

वारदात आणि साहस हे मिथुनचे गाजलेले चित्रपट होते. हे चित्रपट हेरगिरी संबंधित होते त्यात मिथुनची भूमिका जेम्स बॉण्डच्या धर्तीवरची होती. त्यामुळे राजनला तो कायम आकर्षक वाटत असायचा.

छोटा राजनला मिथुनचं इतकं वेड होतं कि तो कपडेदेखील मिथुनसारखे शिवून घ्यायचा.

मिथुनसारखाचं मधला भांग पाडायचा.

मिथुन त्याच्यासारखाच रांगडा आणि ऐटबाज आहे असं नानाला वाटायचं.

मिथुनच्या लोकप्रियतेचा फायदासुद्धा त्यानं मिळवला. सहकार थेटरमध्ये जर मिथुनचा पिच्चर लागला तर तो सगळ्यात आधी त्याच्या टोळीतल्या मुलांना पाठवून ब्लॅक तिकिटांचा धंदा करायला लावायचा. एके दिवशी साहस हा मिथुनचा चित्रपट पहिल्याच दिवशी हाऊसफुल झाला त्यामुळे त्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलीस बंदोबस्त तिथे होताच पण राजनला आपल्या धंद्याची खोटी होऊ द्यायची नव्हती.

तिकिटं न मिळाल्याने राजनची आणि मिथुन फॅन्सची बाचाबाची झाली आणि पुढे त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. पोलिसांनी देखील तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना पळवून लावलं पण इथं आजवर न झालेली घटना राजनने केली. त्याने एका पोलिसांच्या हातातली काठी हिसकावली आणि तिथंच त्या पोलिसाला झोडपायला सुरवात केली.

याआधी पोलिसाना कुणीही हात लावत नसायचं पण राजनने हे कृत्य करून सगळ्या अंडरवर्ल्डचं लक्ष वेधून घेतलं. पुढे राजनला जेलात डांबण्यात आलं. त्याचा हा पराक्रम मस्तान, पठाण टोळ्या आणि दाऊदच्या कानावर गेला होता. पुढे तो दाऊदच्या टोळीत सामील झाला आणि दाऊदचा उजवा हात बनला. त्याला दाऊद कायम चित्रपटातील एखाद्या बादशहासारखा वाटायचा.

पुढे अंडरवर्ल्डमध्ये नाव कमावल्यावर तो दुबईला गेला. मुंबईत दाऊदचा व्यवसाय वाढवला. १९८७ मध्ये राजनला त्याचा आवडता अभिनेता मिथुन भेटला. मिथुनला जेव्हा तो प्रत्यक्ष भेटला त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो मिथुनला सारखा मिठ्या मारत होता आणि त्याने त्याचा एक हात घट्ट दाबून ठेवला होता. राजनला असं वागताना कुणीही पाहिलं नव्हतं. मिथुनला चाहत्यांची सवय होती मात्र राजनचं प्रेम बघून तोही घाबरून गेला होता.

त्या दिवशी छोटा राजनने मिथुनबरोबर फोटो काढून घेतले. आणि टिळकनगरच्या त्याच्या लहानपणीच्या मित्रांना तो दाखवून सांगत होता कि तो किती मोठा बनला आहे आणि सेलिब्रिटी लोकांसोबत तो राहतो.

छोटा राजनच्या हिशोबाने यश म्हणजे काय होतं तर,

मिथुनच्या सिनेमांच्या तिकिटांचा काळाबाजार ते त्याच्याबरोबर जेवण आणि फोटो घेण्याइतपतचा पल्ला गाठणे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.