छोटा राजनने बाळासाहेबांना सल्ला दिला,” दाऊद देशद्रोही नाही, ठाकरेंनी लक्ष घालू नये.”

मुंबई आणि तिच्यावर सत्ता गाजवू पाहणारं अंडरवर्ल्ड. मुंबई आपल्या कब्जात करण्यासाठी अनेक गॅंगवार मुंबईत झाले, टोळीयुद्धे अमाप झाली, छोट्यामोठ्या डॉन लोकांना धुळीस मिळवून मुंबई जशीच्या तशी ठाम उभी आहे.

मात्र मुंबईवर झालेला बॉम्बस्फोट हल्ला त्यातून चवताळलेल्या बाळासाहेबांनी आपल्या लेखणीतून दाऊदवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. बाळासाहेबांच्या जहरी टीका जिव्हारी लागल्या म्हणून छोटा राजनने बाळासाहेबांवर टीका केली होती.

तर त्यावेळी दाऊद टोळीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले होते. छोटा राजनचं टोळीतील वाढतं प्रस्थ बघून छोटा शकील मनातून चरफडत होता. पुढे जाऊन टोळीचा प्रमुख दाऊद नानाला [ छोटा राजनचे टोपणनाव ] बनवतो कि काय अशी भीती शकीलला वाटू लागली होती.

दाऊदला राजनविषयी काहीबाही सांगून शकीलने दाऊदचं लक्ष वेधलं होतं. राजनला ज्यावेळी जेजे हॉस्पिटलमध्ये गवळी टोळीवर हल्ला करायला दाऊदने सांगितलं होत त्यावेळी ते काम छोटा शकीलने यशस्वी करून दाऊदची मर्जी संपादन केली होती.

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या प्लॅनिंगच्या वेळी राजनऐवजी दाऊद छोटा शकीलला नेऊ लागला होता. सगळ्या कामात राजनची जागा छोटा शकील घेऊ पाहत होता. या बैठकांना दाऊदला जाताना बघून छोटा राजनला आश्चर्य वाटू लागलं होतं. या बैठकांमध्ये दाऊद बराच काळ व्यस्त असतो असं राजनच्या लक्षात येऊ लागलं. पण राजनला कोणीही या कॉन्फरन्सला बोलावलं नाही. यामुळे छोटा राजन एकटा पडला होता.

१२ मार्च १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. प्रचंड मोठी जीवितहानी झाली, संपूर्ण शहर या प्रकारानं हादरून गेलं. अनेक लोकं मारली गेली, कैक जखमी झाली, कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झाली. हा जगातला सर्वात क्रूर आणि अमानवीय हल्ला म्हणून घोषित करण्यात आला. या घटनेत २२५ माणसे मृत पावली आणि ७०० हुन अधिक लोकं जखमी झाली.

या सगळ्या प्रकाराला दाऊदला जबाबदार धरण्यात आलं. जगभरातून त्याच्यावर टीका होऊ लागली. प्रत्येकाची खात्री पटली होती कि अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनपूर्वक हा हल्ला दाऊदने केला असणार कारण मुंबईवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न आणि मुंबईला गुढगे टेकायला लावणारा केवळ दाऊद इब्राहिम आहे.

समाजमाध्यमानी दाऊदच्या जगभरात पसरलेल्या बेकायदेशीर मालमत्तेची यादी बाहेर काढली. आजवर दाऊदने केलेले गुन्हे बाहेर काढले. पण अंडरवर्ल्ड मधल्या लोकांचं म्हणणं होत कि हा हल्ला दाऊद करू शकत नाही कारण दाऊद धार्मिकदृष्ट्या कट्टर कधीच नव्हता, त्याच्या टोळीत अनेक हिंदू मुलं होती त्यात सुनील सावंत, मनीष लाला, अनिल परब आणि त्याचा अगदी जवळचा माणूस छोटा राजन.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन हल्ला करून कुटुंबासोबत दुबईला फरार झाला होता. या हल्ल्यात पकडलेल्या लोकांनी दाऊदचं नाव पुढे न करता टायगर मेनन मुख्य होता असं सांगितलं त्यामुळे पोलिसांना दाऊदवर थेट बोट उचलता येईना. पण जनतेने दाऊदला गुन्हेगार ठरवलंच होतं.

या सगळ्या प्रकरणाने संतापलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या वृत्तपत्रातून संपादकीयात जळजळीत भाषेत दाऊदला देशद्रोही म्हणून घोषित करून टाकलं.

अरुण गवळी आणि अमर नाईक याना ‘ हिंदू डॉन ‘ आणि ‘ आमची मुलं ‘ म्हणून सांगितलं.

तेव्हा आधीच दाऊदच्या नजरेतून उतरलेला छोटा राजन पुन्हा दाऊदच्या नजरेत हिरो ठरावा म्हणून पुढे आला आणि दाऊदच्या बाजूने बोलू लागला. राजन हा एक मराठी माणूस होता, दाऊदचा या स्फोटात कितपत हात आहे ते त्याला माहिती होतं.

आपल्या मालकाप्रती आपली निष्ठा दाखवून देण्यासाठी छोटा राजन इंग्रजी वृत्तपत्रांच्या ऑफिसला फॅक्स पाठवून दाऊदची बाजू मांडू लागला.

दाऊदचा स्फोटात भाग आहे हा आरोप अत्यंत तकलादू असून तो जातीय विद्वेषावर आधारित असल्याचं राजनने म्हटलं. याही पुढे जाऊन राजनने थेट बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली. तो वृत्तपत्रांना फॅक्स पाठवू लागला, त्यात त्याने मराठीत लिहिलं कि,

ठाकरेंनी आपला व्यवसाय चालवावा व आपले लक्ष राजकारणावर केंद्रित करावे ; पण गुन्हेगारी जगतावर टिप्पणी करणे थांबबावे.

राजनने यापुढे असेही म्हणाला कि, दाऊद हा देशद्रोही नसून त्याला बाळ ठाकरे यांच्याकडून कोणतेही प्रमाणपत्र नको आहे !

केवळ आपल्या मालकाच्या नजरेत स्थान मिळवण्यासाठी छोटा राजनची हि केविलवाणी धडपड होती आणि त्याने बाळासाहेबांना डिवचले होते.

छोटा राजनच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी चूक ठरली. पुढे जेव्हा दाऊद इब्राहिमशी त्याच वाजलं, त्याला जीव वाचवण्यासाठी देशोदशीं फिरावं लागलं तेव्हा त्याच्या मदतीला कोणीही गेलं नाही. दाऊद इब्राहिमने त्याच्या खुनाचे देखील प्रयत्न केले. छोटा राजन त्यावेळी हिंदुत्वाची साद घालत राहिला पण फार पूर्वी केलेली चूक त्याला भोवली. आता पश्चाताप करूनही उपयोग नव्हता.

अखेर गेल्या काही वर्षांपूर्वी तो बाली येथे सापडला. सध्या तो तिहार जेलमध्ये आपली शिक्षा भोगत आहे.

संदर्भ : डोंगरी ते दुबई – एस हुसेन झैदी

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.