ठाण्याच्या विनाश पथकाची दहशत एवढी होती कि खुद्द दाऊदसुद्धा त्यांच्यासमोर टरकायचा….

ठाण्यातल्या विनाश पथकाने आपल्या दहशतीने आणि खूनसत्राने अंडरवर्ल्डचा बादशहा समजल्या जाणाऱ्या दाऊदच्या पायाखालची जमिन सरकवली होती. याची बीजे पेरली ती छोटा राजनने आणि या टोळीतले सगळे माथेफिरू होते, निर्दयी होते. राजनच्या फसलेल्या प्लॅनपासून या किस्स्याची सुरवात होते ती अशी-

१९९८ साली दाऊदला कराचीत ठार करण्याचा पहिला प्रयत्न. यावेळी दाऊदला संपवण्याचा प्लॅन दाऊदचा अत्यंत जवळचा माणूस छोटा राजनने बनवला होता. दर शुक्रवारी न चुकता मशिदीत नमाजासाठी जाणारा दाऊद त्यादिवशी खल्लास होणार असा सगळा प्लॅन छोटा राजनने तयार केला होता. पूर्वी फोनवरून सगळ्या आखण्या व्हायच्या. दाऊदला मरण्यासाठीचे शस्र अगदी शेवटच्या क्षणी मशिदीत मारेकऱ्यांना आणून दिले जाईल असं ठरवण्यात आलं होतं.

अर्धा तास दाऊद मशिदीत होता पण ऐनवेळी शस्र न पोहचल्यामुळे मारेकऱ्यांना हातावर हात चोळत बसण्याखेरीज दुसरा इलाज नव्हता. नमाज पढून दाऊद निघून गेला तरी शस्र पोहचले नाही म्हणून राजन चिडला , संतापला. दाऊदला मारण्याचा त्याचा प्लॅन फसला होता.

काहीही करून दाऊदला ठार करण्याचा राजनचा कयास होता. तसेच १९९३च्या बॉम्ब हल्ल्यात जे जे लोकं कायद्याच्या कचाट्यातून वाचले होते त्यांना वेचून वेचून ठार करायचं हि आग राजनच्या मनात धुमसत होती. या कामात राजनला इंटेलिजन्स ब्युरो [ ib ] ने अभय आणि संरक्षण देण्याच्या गोष्टी केल्या होत्या. यातल्या अधिकाऱ्यांनी दाऊदला संपवण्याची अट राजनला सांगितली होती.

या महत्वाच्या प्लॅनिंगसाठी राजनने साथीदारांची फौज उभारण्यासाठी तयारी सुरु केली. शेवटी हि फौज तयार झाली , यात एकाहून एक भीतीदायक माणसे होती. बाळू डोकरे , सुशील हडकर , बाबा रेड्डी, बाबा मयेकर आणि विनोद मटकर हि सगळी महत्वाची माणसे होती. बाळू डोकरे या फौजेचा मेन माणूस होता.

हे सगळे ठाण्याचे होते. त्यांचे नाव जरी उच्चारले तरी लोकांच्या मनात धडकी भरायची. सगळेच्या सगळे उत्तम शार्पशुटर होते आणि सगळे छोटा राजनच्या आज्ञेत होते.

यातला बाबा रेड्डी हा कालीमातेचा निस्सीम भक्त होता. काली ज्याप्रमाणे रक्त पिते आणि कच्चे मांस खाते तसेच तोही खायचा. सगळ्यात भेसूर, क्रूर आणि हिंस्र हा बाबा रेड्डी होता. रक्ताची चटक त्याला लागली होती आणि ती इतकी कि तो दररोज एखादा माणूस, बाई किंवा लहान मुलाला ठार केल्याशिवाय झोपत नसे.

या टोळीची ठाण्यामध्ये इतकी जबरी दहशत होती कि पोलिसांनीच त्यांचा विनाश पथक असे नाव दिले होते.

हे विनाश पथक दर आठवड्याला नौपाड्याच्या एका तंदूर धाब्यावर भेटत आणि पुढच्या प्लॅनची आखणी करत. त्यांच्याबद्दल निर्माण झालेल्या भीतीमुळे आणि कायद्याचा त्यांना धाक नसल्यामुळे ते कोणालाही फटकावून काढत असे. पैसे उकळवत असे.

पोलिसांनी एकदा पाठलाग केला तेव्हा त्यांनी उलट पोलिसांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात गोळी एका सतरा वर्षाच्या मुलाला लागली पण विनाश पथकाला त्याचा काहीही फरक पडला आणि आणि ते तिथून पसार झाले.

एका व्यापाऱ्याच्या घरी ते मध्यरात्री गेले असता त्यांनी व्यापाऱ्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. गेल्यागेल्या त्यांनी बंदुका काढल्या आणि व्यापाऱ्यांवर रोखल्या.एकाने कानात, एकाने नाकात आणि एकाने व्यापाऱ्याच्या तोंडात पिस्तुलची नळी ठेवली या प्रकारामुळे व्यापार्याची भीतीने गाळण उडाली होती. मागणी पूर्ण केली नाही तर एकाच वेळी या गोळ्या झाडल्या जातील असा दम दिला.

व्यापाऱ्याने दुसऱ्या दिवशी देण्याची मागणी केली आणि स्वतःची सुटका करून घेतली. गुंड जाताच त्याने गुन्हे शाखेत तक्रार दिली पण पोलिसांनी हे प्रकरण सिरियसली हाताळलं नाही पण व्यापाऱ्याला संरक्षण देऊ केलं.

हे विनाश पथक ठाण्यात मोकाटपणे हत्या करत, खंडणी गोळा करत आणि त्या पैशातून चैन करत असे. मात्र त्यांनी एक देशभक्तीचं काम केलं होत. त्याच झालं असं नेपाळमधला खासदार मिर्झा दिलशाद बेग हा दाऊदचा हस्तक होता. दाऊदने त्याच्या अनेक लोकांना भूमिगत करण्यासाठी नेपाळला पाठवलं होतं तेव्हा या खासदाराने त्यांना आसरा दिला होता. भारतातल्या अनेक कारवायांमध्ये तो सामील होता.

या खासदाराचा गेम करण्यासाठी राजनने विनाश पथकाला थेट त्याच्या बंगल्यावर पाठवले. हा खासदार मिर्झा दिलशाद बेग काय बंगल्याच्या बाहेर पडत नसायचा. तेव्हा या विनाश पथकाने आयडिया करून एका पोरीचं आमिष त्याला दाखवलं. असंही तो खासदार लंपटच होता तो अलगद जाळ्यात सापडला आणि विनाश पथकाने त्याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याचा काटा काढला.

या अनपेक्षित धक्क्याने दाऊद मात्र आतून बाहेरून पूर्णपणे हादरून गेला कारण बेग हा महत्वाचा माणूस होता. यामुळे नेपाळमधील आश्रयस्थान दाऊद गमावून बसला.

हे विनाश पथक एवढ्यावरच थांबेल असं चिन्ह दिसत नव्हतं. राजनने भरपूर पैसा त्यांना पुरवला होता. या विनाश पथकाने १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोन आरोपी माजिद खान आणि मोहम्मद जिंद्रान या दोघांनाही संपवलं होतं. मुंबई पोलिसांना या खुनांचा तपास लावण्यात जास्त इंट्रेस नाही हे कळताच राजनने प्रोत्साहन दिल्याने या पथकाने बॉम्बस्फोट हल्ल्यातील आणखी एक आरोपी हनीफ लकडावाला याचाही खून केला.

राजनच्या या भयंकर विनाश पथकाने बॉम्बस्फोट प्रकरणातले किमान सहा आरोपी ठार केले. यामुळे खुद्द दाऊदनेसुद्धा या गँगचा धसका घेतला होता. सगळीकडे या पथकाने जबर दहशत बसवली. राजन टीव्हीवर झळकू लागला. मुलाखतींमध्ये तो देशभक्त असल्याच्या गोष्टी करू लागला. दाऊदला संपवण्याच्या शपथा घेऊ लागला.

बॉम्बस्फोट प्रकरणातल्या काही आरोपींनी राजनला पैसे देऊन जीव वाचवला आणि राजनशी तह केला.

राजनच्या विनाश पथकाबद्दल आणि कराचीमधील दाऊदला उडवण्याच्या अयशस्वी प्रयत्नाबद्दल छोटा शकीलला जेव्हा समजलं तेव्हा तो राजनवर सूड उगवायचा प्रयत्न करू लागला. त्याने दाऊदची सुरक्षा वाढवली आणि गढी मजबूत केली.

पुढे राजन जीव वाचवण्यासाठी जगभर पळू लागला. पैसे वेळोवेळी न मिळाल्यामुळे आणि आपापसातल्या वादांमधून हे विनाश पथक सुद्धा अचानक लुप्त झालं. पण त्यांनी जी दहशत ठाण्यात माजवली होती ती इतर कोणालाही जमली नव्हती.

संदर्भ ; भायखळा ते बँकॉक – हुसेन झैदी

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.