मंडपाचा आकार कमी होत गेला तसा राजनचा दबदबा कमी होऊ लागला होता…

मुंबई अंडरवर्ल्डमधे गुंड जितके घातकी होते तितकेच ते भाविक आणि धार्मिकसुद्धा होते. सगळ्या जगाचे आपण दुष्मन आहोत आणि आपल्याला तारणारा फक्त देवच आहे अशी त्यांची भावना असायची. मुंबई अंडरवर्ल्डचे अभ्यासक हुसेन झैदी यांनी याबद्दल बरच लिहून ठेवलंय. या गुंडांमध्येसुद्धा या देवाधर्माच्या कारणावरून स्पर्धा लागायची. यात सगळ्यात आघाडीवर होता वरदराजन मुदलियार.

व्हीटी स्टेशनवर अन्नदान करणे, गणेशोत्सवात मोठा मंडप टाकणे असे सगळे प्रकार तो करत असायचा.

माटुंग्यात वरदराजनचा गणेशोत्सव छोट्या प्रमाणावर चालायचा पण नंतर तो मोठा डॉन बनला तसा तसा त्याच्या गणेशोत्सवातील मंडपाचा आकार वाढत गेला. यात अरुण गवळीसुद्धा मागे नव्हता. तोही मोठ्या प्रमाणावर नवरात्रोत्सव साजरा करत असे. 

गवळीच्या मंडपाचा आकारसुद्धा पोलिसांनी कमी करायला सांगितला होता आणि दहा नंतर गाणी लावायची नाही अशी सक्त ताकीदसुद्धा दिली होती. पण छोटा राजनचा विषय वेगळा होता.

१९८७ साली दाऊदच्या टोळीत सामील झाल्यावर  त्याने सगळ्यात अगोदर टिळकनगरच्या गणेशमंडपात पूजा केली. पण नंतर तो दुबईला पळाला पण आपल्यामागे गणेशोत्सव कसा धुमधडाक्यात चालू राहील याची तो पूर्णपणे काळजी घेत असे.

लाखो रुपये खर्च करून तो गणपतीची आरास करायचा. टिळकनगरच्या गणपतीची महाराष्ट्रभर चर्चा व्हायची. राजनचे कार्यकर्ते लाल किल्ला, म्हैसूरचा राजवाडा, अजिंठा वेरूळची लेणी, डिस्नीलँड अशा जगप्रसिद्धी वास्तूंच्या प्रतिकृती उभारू लागले.

पुढे हे देखावे लाखोंच्या घरात गेले. या देखाव्यांवर, राजन मनमुराद खर्च करत असे. टिळकनगरच्या रहिवाश्यांकडून मिळालेल्या वर्गणीवर देखावे उभारले जातात असे कार्यकर्ते भासवायचे पण राजन आपल्या गणेशोत्सवात कसलीही कमी पडू देत नसायचा. १९९० च्या सुमाराला टिळकनगरच्या मंडपाच्या भिंतीवर छोटा राजनची आद्याक्षरे मिरवली जायची. इतकी क्रेझ राजनची होती. 

पुढे पोलिसांनी गुंडाना गुंडाळण्याची मोहीम आखली आणि हि पद्धत बंद करण्यात आली. २००३ साली मंडपाचा आकार नियमापेक्षा मोठा असल्याने पोलिसांनी त्याचा काही भाग कमी करायला लावला होता. तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं कि,

मंडपाचा आकार लहान झाला याचा अर्थ राजनचा दबदबा कमी झाला होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीचा मथळा होता कि राजनच्या गणपती शक्ती प्रदर्शनात घट. या बातमीत म्हंटल होत कि टिळकनगरच्या गणेशोत्सवावर ३० लाख रुपये खर्च करण्यात येतो. यावर मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश ए पी बंगाळे यांनी स्वतःहून गणेशोत्सवासाठी पैसे कुठून येतात याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते मात्र त्यात राजनबद्दल काहीही आढळून आलेलं नव्हतं.  

छोटा राजनचा गणेशोत्सव इतका भव्य असायचा कि सगळी मुंबई आणि बॉलिवूड सेलिब्रिटी तिथे दर्शनाला जात असे. चेम्बुरचे बांधकाम व्यावसायिक ओमप्रकाश कुकरेजा हे छोटा राजनचे खास होते ते दरवर्षी गणेशोत्सवासाठी छोटा राजनच्या गणेशोत्सवाला ५० लाख रुपये वर्गणी देत असत. छोटा शकीलला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने काही दिवसांनी कुकरेजाची हत्या घडवून आणली. पण त्याचा राजनच्या गणेशोत्सवावर फारसा परिणाम झाला नाही.

गुंड, बंदुका आणि गणेशोत्सव याभोवती आजही मुंबई अंडरवर्ल्ड फिरतं असं म्हटलं जातं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.