आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरी छत्रपतींची शिवराई असावी, अशी इच्छा असते.

शिवकाळातील अभूतपूर्व घटना म्हणजे ‘शिवराज्याभिषेक’. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून फार मोठी क्रांतीच घडवून आणली होती. या घटनेचे वर्णन करताना सभासद म्हणतो,

‘या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह. मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.’

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने इतिहासात अनेक बदल घडले. शिवाजी महाराजांनी आपल्या नावे ‘शिवशक’ सुरू केला. नवीन कालगणना तयार केली. आपले स्वतःचे नवीन चलन महाराजांनी अस्तित्वात आणले. शिवरायांनी राज्याभिषेकासमयी आपले नाव बदलून ‘श्री राजा शिवछत्रपती’ असे केले. त्यांच्या मृत्युपर्यंत हेच नाव वापरात होते. अगदी शिवरायांच्या नाण्यांवरसुद्धा..

शिवरायांचे सर्वात प्रसिद्ध आणि जवळ जवळ दीडशे वर्ष चलनात असलेले नाणे म्हणजे ‘शिवराई’.

शिवराई तांब्यापासून बनवली जात. शिवकाळात शिवराई हे स्वराज्याचे प्रमुख चलन होते. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाप्रसंगी सर्वप्रथम ‘शिवराई’ नाणे पाडले. या नाण्याच्या पुढील बाजूस ‘श्री राजा शिव’ तर मागील बाजूस ‘छत्रपती’ अशी अक्षरे कोरलेली दिसून येतात. दोन्ही बाजूने नाण्याच्या काठावर बिंदूमय नक्षी तयार केलेली असते.

एका शिवराईचे वजन साधारणपणे 12-13 ग्राम भरते. 6-7 ग्रॅमची अर्धी शिवराई आणि 3-4 ग्रॅमची पाव शिवराईसुद्धा चलनात होती. शिवाजी महाराजांच्या नंतर जेवढ्या राज्यकर्त्यांनी शिवराई पाडली, त्याला ‘दुदांडी शिवराई’ असे संबोधण्यात येते.

यानंतर दुसरे प्रसिद्ध नाणे म्हणजे ‘होन’.

शिवकाळात असणारे सोन्याचे नाणे. होन म्हणजे सोन्याचे नाणे, मोहर.. शिवाजी महाराजांचे व्यवहार हे रुपयांच्या भाषेत नव्हे तर ‘होन’ मध्ये करण्यात येत. एखाद्या वस्तूची किंमत अमुक अमुक रुपये अशी न ठरवता अमुक अमुक ‘होन’ ठरवण्यात येई.

याही नाण्याचा आकार गोलाकार असून त्याच्या पुढीक बाजूस ‘श्री राजा शिव’ तर मागील बाजूस ‘छत्रपती’ असे लिहिले आहे.

या नाण्यांचे वजन 2.7 ग्रॅम भरते. आज हे शिवकालीन सुवर्णनाणे मात्र दुर्मिळ आहे. आज जवळ जवळ या शिवराई होनचे पंधरापेक्षा जास्त प्रकार अस्तित्वात आहेत. कृष्णाजी अनंत सभासदाने शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी तिजोरीत असणाऱ्या नाण्यांची संख्या आणि नावे दिली आहेत.

तिजोरीत 31 प्रकारची सुवर्णनाणी होती. या सुवर्ण नाण्यांची संख्या 69 लाखांच्या घरात आहे.त्यापैकी 4 लाख सुवर्णहोन महाराजांच्या तिजोरीत होते. शिवकाळात सोन्याचा भाव हा 16 रुपयांच्या जवळपास होता. त्यामुळे एका होनाची किंमत ‘3 रुपये 13 आणे’ एवढी भरते. यावरून शिवरायांच्या तिजोरीत असणाऱ्या चार लाख होनाची किंमत किती होईल? आणि उरलेल्या 65 लाख सोन्याच्या नाण्यांची सुद्धा किंमत किती होईल, याचे गणित तुम्हीच सोडवा.

शिवराई आणि होन ही दोन प्रमुख नाणी जरी शिवकाळात असली तरीही अजूनही काही नाणी बाजरात फिरत होती.

शिवरायांच्या या नाण्यांविषयीसुद्धा जाणून घेऊया. यातील एक नाणे होते ‘कासू’. हे तांब्यापासून तयार केलेलं नाणं मुख्यतः दक्षिणेत वापरले जाई. याचे वजन जास्तीत जास्त 3-4 ग्रॅम इतके होते. याही नाण्याच्या पुढील बाजूस श्री राजा शिव तर मागील बाजूस ‘छत्रपती’ ही अक्षरे कोरलेली आहेत.
अजून एक सोन्याचे नाणे स्वराज्यात वापरले गेले, त्याचे नाव ‘फनम’.

हे नाणे दक्षिण भारतात सर्रास वापरल्याचे आढळून आले आहे. शिवरायांच्या दक्षिण स्वारीमध्ये ही नाणी पाडण्यात आल्याचे अभ्यासक सांगतात.

यानंतर अजून एका नाण्याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. शिवाजी महाराजांनी चांदीची नाणी पाडली होती असे एका गटाचे म्हणणे आहे तर दुसऱ्या गटाने ही शक्यता फेटाळली आहे. या चांदीच्या नाण्यांचा उल्लेख ‘होन नुख्रा’ असा आला आहे. राजव्यवहारकोशात या नाण्यांना ‘रजतवर्ती’ असे म्हणणे आहे. पण शिवकाळात अशी चांदीची नाणी पाडल्याचे पुरावे नाहीत.

शिवोत्तर काळात या नाण्यांची निर्मिती झालेली असावी, असा अंदाज आहे. या नाण्यांचे वजन जवळपास 1.4 ग्रॅम इतके भरते.

अशी ही कथा शिवकालीन चलनाची. आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरी शिवाजी महाराजांची शिवराई असावी, अशी इच्छा असते. साडेतीनशे वर्ष लोटून गेली, तरीही या राजावरील प्रेम मात्र आजही कमी झाले नाही, हेच यावरून जाणवते.

संदर्भ – स्वराज्याचे चलन, लेखक आशुतोष पाटील.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.