‘चुंबक’ ब्रॅंडने आपलं नाव एवढं मोठं केलंय की या ब्रॅंडच्या गोष्टी विकत घेताना कोणी किंमत बघत नाही.
लग्नाचा सीझन पुन्हा जोमात सुरुय. आता डिसेंबर मधली लग्न सुखासुखी पार पडतात आणि मे महिन्यातली लई घाम काढतात. पण लोकांना काय, त्याची पडलेली नसते. त्यांचं आपलं शॉपिंग, नटणं आणि गरमीशी झटणं सुरूच असतय.
आता कालच आमच्या एका मैत्रिणीचं लग्न घामात आणि जोमात पार पडलं. तिला गिफ्ट काय द्यायचं हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता.
म्हणलं उन्हात फिरण्यापेक्षा ऑनलाइनच कायतरी सर्च करू. तेव्हा एक साइट नजरेत आली. साईटचं नाव एक नंबर होतं आणि त्यांच्याकडे मिळणारे प्रोडक्ट्स पण.
पण सगळं ऑनलाइन बघून आमचं काय समाधान होईना.. मग कळलं ह्यांची दुकानं पण आहेत. झालं.. उन्हं टाळून झटकन एरिया जवळच्या दुकानात जाऊन, पटकन आमच्या मैत्रिणीसाठी, नवीन घर सजवायला तिला लागतील अशा काही ‘हटके’ गोष्टी आम्ही विकत घेऊन आलो.
दुकानाचं नाव होतं चुंबक. तिकडले एकसो एक प्रोडक्ट्स बघून ब्रॅंड फॉरेनचा वाटला.. आता नाव ‘चुंबक’ होतं त्यामुळे तो फॉरेनचा असण्याचा विषयच नव्हता. पण एकंदर दुकानात गेल्यावर वस्तू, वास्तू आणि किंमती पाहून या दुकानाचा विषय लय मोठाय हे लगेच लक्षात आलं.
चुंबकची स्थापना झाली २०१० साली. स्थापना केली, विवेक प्रभाकर आणि शुभ्रा चड्डा या दोघांनी. बंगलोर, दिल्ली आणि मुंबईत हा ब्रॅंड आता व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेलाय. शिवाय त्यांची भारतात आणि भारताबाहेर अनेक ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोर्स सुद्धा आहेत.
आता बघूया चुंबक ब्रॅंड सुरू कसा झाला?
शुभ्रा चड्डा आणि विवेक प्रभाकर हे जोडपं बंगलोरमध्ये फूल लॅविष लाईफ जगत होतं, ठीकठिकाणी फिरत होतं. ठीकठिकाणी फिरत असताना त्यांनी हौस म्हणून, परदेशातून बरीच फ्रीज मॅगनेट्स विकत आणलेली. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे असलं हटके काही भारतात मिळतच नाही. भारतात गिफ्ट म्हणूनही काही द्यायचं झालं तरी आपण कप बशा, शाल, शोपीस आणि ग्रिटींग कार्डांच्या पुढे काही जात नाही.
मग लागलीच त्यांनी, जर काही हटके वस्तू भारतात विकायच्या झाल्या, तर काय करावं लागेल ह्यावर अभ्यास सुरू केला.
त्यांना या कन्सेप्टमध्ये दम दिसला आणि त्यांनी थांबायचं नाय असं ठरवलं. हळू हळू त्यांनी एक एक करत छोटे छोटे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणायला सुरवात केली. बिझनेस सुरू करायला चाळीस लाखांची गरज होती तेव्हा त्यांनी आपलं घर विकून भांडवल जमा केलं.
चुंबक ब्रॅंडची सगळ्यात युनिक गोष्ट काय होती तर ते बनवत असलेलं डिझाईन, ते डिझाईन बनवत असताना वापरायची रंग संगती आणि त्यांच्याकडे मिळणारे, रोजच्याच वापरातले असणारे प्रोडक्ट्स.
त्यांच्या डिझाईन्सना एक वेगळेपण होतं. कुठूनही ओळखता येतील अशी त्यांची डिझाईन्स बनवण्याची युनिक स्टाइल होती. आणि प्रत्येक प्रॉडक्टमध्ये वगळेपण असण्याचं कारण होतं, त्यात वापरले जाणारे रंग.
चुंबकच्या प्रोडक्ट्समध्ये वापरली जाणारी रंगसंगती ही ‘लाईट अँड ब्राइट’ कॅटेगरीमध्ये मोडली जाते. इतर कुठल्याही प्रोडक्ट्समध्ये ही रंगसंगती इतकी वेगळी उठून दिसते की प्रोडक्ट चुंबकचंच आहे हे लोकांच्या चटदिशी लक्षात येतं. शिवाय ह्या प्रोडक्ट्समध्ये एक विशेष भारतीय फील असतो. जो इंडियन मेंटॅलिटीला आपल्याकडे चुंबकासारखा आकर्षित करतो.
चुंबक ब्रॅंडने पहिल्यापासूनच आपला ऑनलाइन गेम स्ट्रॉंग ठेवलेला. त्यांच्या प्रोडक्टसचं मार्केट जितकं ऑफलाइन आहे तेवढंच ते ऑनलाइन सुद्धा असणारे हे त्यांनी आधीच ओळखलं होतं. सुरवातीला तर त्यांचं मार्केटिंगसाठी वेगळं असं काही बजेटही नव्हतं.
त्यांच्याकडे सर्वात महत्वाची दोन अस्त्र होती ती म्हणजे वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटी आणि सोशल मीडिया. त्यांचं सगळं ब्रँडिंग आजही, जास्त करून सोशल मीडियाद्वारे केलं जातं. चुंबक हा असा पहिला भारतीय ब्रॅंड आहे ज्याची केस स्टडी फेसबुकवर फीचर केली गेली.
आपल्या ग्राहकांसोबतचा कनेक्ट आणि कॉनटॅक्ट न तुटू देता त्यांना ब्रॅंडसोबत कसं जोडून ठेवता येईल यावर चुंबक ब्रॅंड सतत काम करत असतो.
चुंबक ब्रॅंडने २०१३ साली बंगलोरमध्ये आपलं पहिलं ऑफिस सुरू केलं. आणि नंतर पुढे वेगवेगळ्या शहरात आपला ब्रॅंड विस्तारत नेला. आज चुंबक ब्रॅंडची भारतात जवळ जवळ १५० स्टोर्स आहेत, शिवाय त्यांचं इ कॉमर्स सेक्शन सुद्धा तगडं आहे. आणि त्यांचा वर्षागणिक नफा कायम, ३०० टक्यांनी वाढतो असं ब्रॅंड ओनरचं म्हणणं आहे.
ब्रॅंडमध्ये विकेक प्रभाकर हे मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्यूशनचं काम पाहतात तर शुभ्रा चड्डा प्रॉडक्टशन आणि प्रॉडक्ट डिझाईनचं काम पाहतात.
चुंबक ब्रॅंड येतो गिफ्ट्स आणि लाइफ स्टाइल ब्रॅंड ह्या कॅटेगरीमध्ये. ब्रॅंडच्या प्रॉडक्ट रेंजमध्ये आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आणि हौस करायला मिळेल, अशा गोष्टी येतात. जसं की, फ्रीज मॅगनेट्स, मोबाइल कव्हर्स, वॉलेट, लॅपटॉप बॅग्स, कुशन कव्हर्स, मग्स, घडयाळं, घरात आणि स्वयंपाकघरात लागणाऱ्या गोष्टी, चपला, कपडे, ज्वेलरी आणि इत्यादी.. आणि प्रॉडक्ट रेंजनुसार तुमच्या हे ही लक्षात आलंच असेल की चुंबक ब्रॅंडचा टार्गेट ऑडियन्स हा जास्त करून महिला आहेत.
आता चुंबक ब्रॅंडच्या किमतीचं विचाराल तर ‘आयफोन’ ग्राहकांचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. ते कसे.. फक्त ब्रॅंड बघतात. आणि किमती न बघताच वस्तू विकत घेत सुटतात. तसंच काहीसं चुंबकचं आहे. हा ब्रॅंड सुद्धा किमती पाहून नाही तर ब्रॅंडचं नाव पाहून वस्तू विकत घेणाऱ्यांसाठी आहे.
येणाऱ्या काळात भारतातल्या वेगवेगळ्या शहरात ५० हून अधिक रिटेल स्टोर्स उघडण्याचा चुंबक ब्रॅंडचा प्लॅन रेडी आहे. त्यामुळे ऑनलाइन काय किंवा ऑफलाइन काय…
चुंबक हा ब्रॅंड मार्केटमध्ये चुंबकासारखाच टिकून आणि चिकटून राहणार, फिक्स.
हे ही वाच भिडू:
- बाहेरून झोपडपट्टी दिसत असली तरी ‘धारावी’ म्हणजे अनेक इंडस्ट्रीजचं एक भलं मोठं जाळं आहे.
- या दोन बहिणी कॉटनच्या साड्या विकून १६ हजार घरं चालवतायेत