भारतात ईदला भाईच्या पिक्चरची वाट बघतात आणि बांगलादेशात चंकी पांडेच्या !!
आजकाल ना प्रत्येक सणाला बड्या सुपरस्टार्सनी बुक केलंय. दिवाळीत शाहरुखचा सिनेमा रिलीज होतो, ख्रिसमसला आमीर खान आणि ईदला भाईचा. बाकी जग इकडच तिकड होवो ईदला सल्लूचा सिनेमा सुपरहिट होणार अशी गणित पिक्चरचा अभ्यास करणारे पंडीत सांगतात. पण सलमानने ईदला सुपरहिट करण्यापूर्वी दुसऱ्या एका स्टारने हवा केली होती. तीही बांगलादेशमध्ये!!
नाव चंकी पांडे. आता या चंकीचा आणि बांगलादेशच्या ईदचा काय संबंध? सांगतो सांगतो सगळ सांगतो, अगदी सुरवातीपासून सांगतो.
चंकी पांडे या नावापासूनच लोकांना हसू यायला लागत. पण त्याच खरं नाव सुयश पांडे. घरात त्याचा सांभाळ करणाऱ्या कामवाल्या बाईने या सुयशला चंकी म्हणायला सुरवात केली. चंकीचा अर्थ होतो जाड्या. त्याच्या घरच्यांना सुद्धा हे नाव आवडल आणि तेव्हा पासून त्याच नाव चंकी पांडे पडल. चंकी म्हणतो,
“बर झालं कोणाला माझ खर नाव सुयश आहे ते माहित नाही. कारण खऱ्या आयुष्यात यशापासून मी लाखो कोस दूर आहे.”
अॅक्टिंगची आवड होती. घरची परिस्थितीसुद्धा बरी होती. अॅक्टिंग स्कूलमध्ये अडमिशन घेतलं. तिथे काम करताना संजूबाबाच्या रॉकी सिनेमात त्याच्या मित्रांच्या गर्दीत एक छोटा रोल केला. मोठ्या हिट साठी मात्र बरीच वर्षे स्ट्रगल करायला लागली. मध्यंतरीच्या काळात त्याच अॅक्टिंग स्कूलमध्ये डान्स इंस्ट्रक्टर म्हणून लागला.
खिलाडी अक्षयकुमारला डान्स चंकी पांडेने शिकवला आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
तर हे असले उद्योग चालू होते. स्ट्रगल संपत नव्हता. अखेर त्याला पहिला ब्रेक दिला पहलाज निहलाणी यांनी. (काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष होते ते) पहलाजनी गोविंदा वगैरेना ब्रेक देऊन स्टार बनवल आहे हे चंकीला माहित होतं. त्यांची भेट कशी होईल या साठी तो खूप प्रयत्नात होता.
एकदा चान्स मिळाला. पण खूप अवघड प्रसंगी. झालं असं की चंकी एका मित्राच्या लग्नात गेलाहोता. तिथे पहलाज निहलानी सुद्धा आले होते. तेव्हा त्यांच्या भोवतीने बरेच स्ट्रगलर गोंडा घालत असायचे. यात आपला नंबर लागणार नाही याची चंकीला खात्री होती. पण त्याच पूर्ण लक्ष निहलाणी कुठे जातात याकडे होतं. मध्येच ते बाथरूमकडे गेले.चंकीला कळाल आता आपला चान्स आहे. तो धावत तिथे गेला. आत जाऊन पाहतो तर पहलाज निहलानी डोक्याला हात लावून बसले होते. त्यांच्या पायजम्याचा नाडा सुटत नव्हता.
चंकी पांडेने त्यांचां नाडा सोडवून देण्यास मदत केली आणि पहलाज निहलानी यांच्यावरचा अतिप्रसंग टळला.
त्यांनी सुद्धा आपल्यावर उपकार करणाऱ्या या तरुणावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि चंकीला पहिला ब्रेक मिळाला, आग ही आग.
या सिनेमात धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा असे मोठे स्टार होते पण चंकीने आपल्या अभिनयाने छाप पाडली. त्याला बरेच रोल ऑफर झाले. यातच एक होता एनचंद्रांच्या तेजाब मधला बबन. अनिल कपूरच्या टवाळखोर पण चलाख मित्राचा हा रोल. माधुरीच्या एकदोतीन मुळे हा तेझाब गाजला, पण चंकीचा बबन, त्याचा तो हॉटेलमधल्या मारवाड्याला उल्लू बनवण्याचा प्रसंग, त्याच सो गया ये जहा हे गाण कधीच कोणी विसरू शकणार नाही. एन चंद्रानी म्हणे स्वतःवरून हा रोल लिहिला होता. चंकीला फिल्मफेअरच नॉमिनेशनसुद्धा मिळालं.
सगळ्यात महत्वाच त्याला कॉमेडी येते हे प्रुव्ह झालं. तिथून पुढे त्याला तसेच रोल येऊ लागले. हिरो म्हणून त्याने काही ट्राय मारले पण ते काही जमल नाही. मल्टी स्टारर सिनेमेच त्याला मिळत होते. एका वेळी तो वीस वीस सिनेमात काम करत होता. गोविंदा बरोबरचा आंखे हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सुपरहिट होता. त्यातल लाल दुपट्टेवाली हे गाण तर प्रचंड गाजलं. पण दुर्दैव हा सिनेमा सुपरहिट होऊन ही चंकी पांडे घरात बसून होता. त्याच्या जवळ एकही रोल नव्हता.
झाल असं की आंखेमध्ये गोविंदाने केलेल्या डबल रोलच्या जबरदस्त परफोर्मन्सनंतर पूर्ण पिक्चरच क्रेडीट त्यालाच मिळालं. कादरखान आणि त्याची जुगलबंदी, पिक्चरमधल माकड, सदाशिव अमरापूरकर बिंदू यांचे काही कॉमेडी सिन्स यामध्ये चंकी झाकोळून गेला. शिवाय त्याला आता हिरोचा मित्र, भाऊ असे अगदी टिनपाट रोल मिळू लागले होते जे त्याने नाकारले.
एकदिवस चंकीला एक बंगाली मित्र भेटला. त्याने त्याला बांगलादेशच्या फिल्मइंडस्ट्रीबद्दल सांगितलं. चंकीला बंगाली भाषेतलं ओ की ठो कळत नव्हत. तरी तो तिकडे गेला. बॉलीवूड मधला स्टार आपल्या इथे काम करतोय म्हटल्यावर त्यांनी त्याला डोक्यावरच घेतल. त्याचे सगळे सिनेमे तिकडे सुपरहिट झाले. बांगलादेशी फिल्मपब्लिक साठी तो देव बनला होता.
दर ईदला त्याचे सिनेमे तिकडे रिलीज व्हायचे आणि ते बॉक्स ऑफिसवर धो धो चालायचे. जस राजकपूर मिथुन दा भारताबाहेर रशियामध्ये हिट होते अगदी तसच चंकी पांडे भारताबाहेर बांगलादेश मध्ये सुपरस्टार बनला.
जवळपास पाच सात वर्ष असच चालू होतं. चंकी तिकडे खोऱ्याने पैसा कमवत होता. १९९८ साली त्याच लग्न झालं. हनिमूनवेळी बायकोला आपलं स्टारडम दाखवायचं म्हणून तो बांगलादेशला घेऊन गेला. जिथ जाईल तिथ त्याचं उत्साहात स्वागत होत होतं. त्याची बायको हे बघून खुश होती पण तिला माहित होतं चंकी वर वर दाखवतोय मात्र तिथे तो खुश नाही. तिने त्यालापरत भारतात बॉलीवूडमध्ये काम कर असं समजावलं.
बायकोच ऐकुन चंकी परत आला. पण इथे तर कामच नव्हत. बॉलीवूड तो पर्यंत बदलून गेलेलं. शाहरुख अमीर सलमान यांनी मागून येऊन गोविंदा सनी जॅकी सारख्या पिढीला माग टाकलं होतं. वेगळ्याच टाईपचे सिनेमे बनत होते. चंकीला एका सिनेमात रोल मिळाला पण त्यात काम करणाऱ्या कुत्र्याला त्याच्या पेक्षा जास्त मानधन होत कारण ते कुत्र हॉलीवूडरिटर्न होतं आणि चंकी बांगलादेश रिटर्न.
अखेर २००६ साली आलेल्या अपना सपना मनी मनी मध्ये गुरखाच्या भयानक कॉमेडी रोलमध्ये चंकीला आपला सूर गवसला. त्यानंतर आलेल्या हाउसफुल मधल्या आखरी पास्ताने त्याला नवी ओळख मिळवून दिली. आता तर बेगमजान, साहो, प्रस्थान्म अशा सिनेमात त्याने कॉमेडीसोडून वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय.
दोन पिढ्या बदलल्या तरी क्षणाक्षणाला बदलणाऱ्या फिल्मइंडस्ट्रीशी जुळवून घेण्याचा त्याने जो धूर्तपणा दाखवलाय तो कौतुकास्पदच आहे.
आज चंकी आयुष्यात एकदम वेलसेटल आहे. पैसा मिळत होता त्यावेळी ठिकठिकाणी जागा घेऊन ठेवल्या. आता निवांत पार्टी करत चैनी करत तो राहतोय. त्याच्यासोबतच्या अनेक कलाकारांना जे पैशाच गणित सुटल नाही ते चंकीला व्यवस्थित सुटलंय. त्याबाबतीत तो छुपा रुस्तम निघालाय. त्याच्याबरोबरचे दीपक तिजोरी सारखे नव्वदच्या दशकातले साईड हिरो स्वतःला नव्या युगात अॅडजस्ट करू शकले नाहीत पण चंकीने ते करून दाखवलं. आता तर काय त्याच्या मुलीला खुद्द करण जोहरने लॉंच केलंय. बघू आता हा आखरी पास्ता पुढे काय काय कमाल करून दाखवतोय?
हे ही वाच भिडू.
- त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील तो हिरोचा कमनशिबी मित्रचं आहे.
- जेव्हा भाईची पहिली एन्ट्री फसली होती
- या बॅडमॅनची एन्ट्री एखाद्या धमाकेदार डायलॉगने व्हायची.
- जेव्हा शाहरुख खान सनी पाजीच्या हातचा मार खाता खाता वाचला होता.