भारताचा सर्वात महान फुटबॉलर ज्याने क्रिकेटमध्ये सुद्धा गॅरी सोबर्सला हरवलं होतं
प.बंगाल ची निवडणूक आत्ताच पार पडली, बंगाली जनता जागरूक आहे, राजकारणाबद्दल किती वादविवाद करतात आपण सगळ्यांनी बघितलं…कोणता पक्ष निवडायचा,कोणाला मतदान करायचं यावर निवडणूक काळात बंगाल मध्ये जोरात वाद होतात, निवडणूका झाल्या कि हे वाद मिटून पण जातात. फक्त एक वाद आहे तो प.बंगाल मध्ये कधीच मिटणार नाही तो म्हणजे बंगालचा सगळ्यात भारी फुटबॉल क्लब कोणता, ईस्ट-बंगाल का मोहन बागान.
होय… कला,साहित्य,समाजकारण याबाबतीत प्रसिद्ध असणारा बंगाल आपल्या फुटबॉल प्रेमासाठी सुद्धा ओळखला जातो.
बंगाल च्या फुटबॉल बद्दल आज का सांगायाला लागलोय तर, याच बंगालच्या मातीत तयार झालेल्या अशा फुटबॉलर बद्दल तुम्हाला सांगणार आहे कि जो भारताचा आतापर्यन्तचा सर्वात फास्ट, सर्वात भारी फॉरवर्ड मानला जातो. बर फक्त फुटबॉलच नाही, तर क्रिकेटसुद्धा एवढं भारी खेळायचा कि त्याच्या टीमने वेस्ट इंडिजच्या महान गॅरी सोबर्स च्या टीमला हरवलं होत.
सुबिमल उर्फ चुन्नी गोस्वामी. देशात आणि विदेशात आपल्या टोपण नावानेच ते जास्त गाजले. १९६० च्या दशकात सत्यजित रेंच्या सिनेमांनी जगभरात भारताचा नाव मोठं करायला सुरुवात केली होती, त्याचप्रमाणे अजून एका खेळाडूमुळे प.बंगाल आणि भारताचं नाव गाजायला लागलं होत तोच खेळाडू म्हणजे चुन्नी गोस्वामी.
१५ जानेवारी १९३८ ला पूर्व बंगाल (सध्याचा बांग्लादेश ) मधील किशोरगंज जिल्ह्यात जन्मलेल्या चुन्नी गोस्वामी यांनी वयाच्या नवव्या वर्षी प्रसिद्ध मोहन बागान फुटबॉल क्लब जॉईन केला. १६ व्या वर्षी त्यांना मोहन बागान च्या सिनियर टीम मध्ये जागा मिळवली पण त्यांच्या सिनिअर टीम मध्ये जागा मिळवण्याचा किस्सा सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग आहे.
प्रसिद्ध फुटबॉल पत्रकार नोव्ही कपाडिया यांनी चुन्नी गोस्वामी यांच्या मोहन बागान कडून खेळण्याच्या एक किस्सा सांगितला आहे.
चुन्नी गोस्वामींचा मोहन बागान कडून झालेला डेब्यू एक लकी डेब्यू होता. मोहन बागान चे दोन प्रसिद्ध फॉर्वर्डस रुनु गुहा ठाकुरता आणि अब्दुल सत्तार हे दोघेही काही कारणामुळे टीमसाठी खेळायला उपलब्ध नव्हते. याचा अर्थ असा नव्हता कि चुन्नी गोस्वामींना त्यांच्याजागी खेळण्याचा चान्स मिळेल. पण इथे गोस्वामी एक डाव खेळून गेले.
चुन्नी गोस्वामींनी मोहन बागानच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन टीमची जर्सी घातली. त्याकाळी मोहन बागान मध्ये एक अंधश्रद्धा होती कि एकदा जर प्लेयर ने जर्सी घातली तर त्याला टीमच्या बाहेर ठेवायचं नाही. नशिबाने त्यांना मोहन बागान च्या टीममध्ये स्थान मिळालं असलं तरी आपल्या खेळाच्या जोरावर ते या क्लबचे सर्वात यशस्वी कॅप्टन बनले.
ड्युरँड कप हा भारताचा सर्वात मोठा फुटबॉल चषक मोहन बागानने १९६३,६४,६५ असा सलग तीनवेळा जिंकला. या तिन्हीवेळी चुन्नी गोस्वामीच मोहन बागान चे कॅप्टन होते.
ड्युरँड कप मधला चुन्नी गोस्वामींचा आणखी एक किस्सा खूप फेमस आहे. १९६३ ची ड्युरँड कप ची फायनल , मोहन बागानने आंध्र पोलीस टीमला हरवून हा कप जिंकला, पुढच्याच वर्षी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी ईस्ट बंगाल ला हरवून ड्युरँड कप जिंकला. १९६५ साली सलग तिसऱ्या वेळी मोहन बागान संघ ड्युरांड कप च्या फायनल पोहचला ,यावेळी त्यांच्यासमोर होती पंजाब पोलिसांची टीम…
भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सुद्धा हि मॅच बघायला स्टेडियमवर उपस्थित होते. वॉर्म करत असलेल्या चुन्नी गोस्वामींना बघून ते म्हणाले कि,
“तुम्ही तर आता प्रत्येक फायनलचा हिस्साच झाला आहात”.
सामान्य लोकांपासून ते सर्वोच्च राजकारण्यांपर्यन्त सर्वांनाच त्यांच्या खेळाची भुरळ पडली होती.
चुन्नी गोस्वामींनी एकूण सहा वेळा हा चषक आपल्या नावावर केला. मोहन बागान चा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी क्लब असलेल्या ईस्ट-बंगाल चे सेक्रेटरी जे.सी.गुहा यांनी तर चुन्नी गोस्वामींना आपल्याकडून खेळावे यासाठी त्याकाळात अतिशय लोकप्रिय असणारी फियाट गाडी देण्याची ऑफर केली होती. पण चुन्नी कोणत्याही ऑफर ला बळी न पडता शेवटपर्यंत मोहन बागानशीच प्रामाणिक राहिले.
क्लब फुटबॉल मध्ये ज्याप्रकारे ते यशस्वी झाले तसंच यश त्यांनी फुटबॉल मध्ये आपल्या देशाला सुद्धा मिळवून दिल.
मोहन बागान कडून यशस्वी सुरुवात केल्यानंतर गोस्वामींनी १९५६ मध्ये भारताकडून पहिला सामना खेळाला. भारतीय संघाकडून खेळताना त्यांनी एशियन गेम्स, एशिया कप,ऑलंपिक सारख्या महत्वाच्या स्पर्धांत भाग घेतला. भारतीय फुटबॉल संघाने त्याकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं सर्वात मोठं बक्षीस म्हणजे १९६२ च्या एशियन गेम्स मध्ये फुटबॉल गोल्ड मेडल, यावेळी भारताचे कॅप्टन चुन्नी गोस्वामीच होते.
गोस्वामींनी या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये व्हिएतनाम विरुद्ध २ गोल केले होते ज्या जोरावर भारताने हि मॅच ३-२ अशी जिंकली होती. कोरियाविरुद्धच्या फायनल मॅच मध्ये त्यांनी पहिल्या गोल साठी असिस्ट केला होता.
या एशियन कप नंतर गोस्वामी एवढे फेमस झाले कि, बॉलिवूड च्या सर्कल मध्ये , मोठमोठ्या राजकारण्यांच्यात त्यांची उठबस सुरु झाली. इतकंच नाही तर एशियन गेम्स मधला त्यांचा खेळ बघून त्याकाळचा युरोपमधील बलाढ्य फुटबॉल क्लब ‘टॊटेनहम’ ने चुन्नी गोस्वामीना आपल्या कळंब कडून खेळायला आमंत्रित केलं होत पण त्यांनी नकार कळवला.
१९६४ साली भारताचा फुटबॉल संघ एशियन कप ची फायनल मॅच हरला आणि फक्त २७ वर्षांच्या चुन्नी गोस्वामीनी फुटबॉल मधून रिटायरशिप घेतली.
फुटबॉल मधून रिटायरमेंटशिप घेतली म्हणजे त्यांनी खेळणं थांबवलं असं नाही. फुटबॉल मधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तस बघायला गेलं तर गोस्वामींनी १९६२ सालीच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती पण फुटबॉल मधल्या रिटायरमेंट नंतर त्यांनी क्रिकेटला अधिक वेळ द्यायला सुरुवात केली.
१९७२ च्या रणजी चषक स्पर्धेत गोस्वामी बंगालच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते.
१९६६-६७ साली वेस्ट इंडिज ची प्रसिद्ध अशी क्रिकेट टीम जिचा कॅप्टन गॅरी सोबर्स होता भारताच्या दौऱ्यावर आली होती. या टीमसोबत प्रॅक्टिस मॅच खेळण्यासाठी पूर्व आणि मध्य विभागातल्या खेळाडूंना एकत्र करून एक टीम बनवली होती ज्यामध्ये चुन्नी गोस्वामींचा सुद्धा सहभाग होता.
या मॅच मध्ये त्यांनी ८ विकेट्स घेतल्या आणि गॅरी सोबर्स च्या टीमला हरवलं. त्या दौऱ्यात वेस्ट इंडिजने हरलेली ती एकमेव मॅच होती.
इंटरनॅशनल मैदानावर टिकतील असे खूप कमी फुटबॉलर भारताला लाभले आहेत, जे लाभले त्यांच्यात चुन्नी गोस्वामींचा नंबर सर्वात वरती आहे. हे नक्की. फुटबॉल ,क्रिकेट अशी दोन्ही मैदाने गाजवणाऱ्या या महान खेळाडूच मागील वर्षी ३० एप्रिलला निधन झालं होत.
हे ही वाच भिडू.
- इंग्लिश क्लब फुटबॉल बघणाऱ्यांनां त्याने भारतात पण फुटबॉल असते हे शिकवलं.
- असाच पाठींबा मिळत राहिला तर संघासाठी खेळताना जीव देखील देऊ- सुनील छेत्री
- १०० कोटी कमवणारा फुटबॉलपटू फुटका मोबाईल का वापरतो याला पण एक कारण आहे.
- नेहरूंच्या हलगर्जीपणामुळे भारताचा संघ फुटबॉल विश्वचषक खेळू शकला नव्हता ?