सेटल नाही म्हणून पोरीने नकार दिला, पठ्ठ्याने तिला इंग्लंडचा पंतप्रधान होऊन दाखवलं.

इंग्लंडचा माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलला आपण एक खडूस म्हातारा म्हणून ओळखतो. दुसऱ्या महायुद्धात त्याच्या खडूसपणामुळेच इंग्लंड हिटलरच्या जर्मनी पुढे तग धरू शकली आणि ते महायुद्ध जिंकू शकली.

असा हा चर्चिल जगभरात लोकशाहीच महत्व सांगणारी भाषणे ठोकायचा पण भारताला स्वातंत्र्य देण्यास मात्र त्याचा सक्त विरोध होता.

याच कारण म्हणजे भारतावर त्याचा विशेष राग होता, त्याच पहिला हार्टब्रेक भारतातच झाला होता.

विन्स्टन चर्चिलचा जन्म इंग्लंडमधल्या एका प्रचंड मोठ्या राजवाड्यात झाला. त्याच्या घरचे श्रीमंत होते. त्याचे वडील लॉर्ड रँडोल्फ चर्चिल हे सुद्धा राजकारणात होते. व्हिक्टोरिया राणीच्या मंत्रिमंडळात अर्थ खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला होता, ते भारत मंत्री सुद्धा होते.

अशा या संपन्न घरात जन्मलेल्या विन्स्टन चर्चिलने इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित हॅरो स्कुलमध्ये प्रवेश मिळवला होता. पण त्याच्या वडिलांची इच्छा त्याने मिलिटरी मध्ये करियर करावे अशी होती.

अनेक प्रयत्नांनी त्याला रॉयल मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळाला

आणि तेथील ट्रेनिंग संपल्यावर त्याची नेमणूक ब्रिटिश आर्मीच्या घोडदळात सेकंड लेफ्टनंट म्हणून झाली.

चर्चिल यांच आर्मी ऑफिसरचं ट्रेनिंग सुरू होत तेव्हाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांना त्याला मिल्ट्री युनिफॉर्म मध्ये कधीच बघता आलं नाही.

चर्चिलला लहानपणापासूनच युद्धाच प्रचंड आकर्षण होतं.

त्याने आपल्या आजोबांचा वशिला वापरून स्वतःची नेमणूक क्युबाच्या युद्धक्षेत्रावर करून घेतली. तिथे पराक्रम गाजवला.

साधारण ऑक्टोबर १८९६ मध्ये विन्स्टन चर्चिल भारतात आला.

भारतात तेव्हा ब्रिटिशांच राज्य स्थिरस्थावर झालेलं होतं. अनेक बंड मोडून काढण्यात आले होते. राजे महाराजे इंग्लंडच्या राणीच मंडलीकत्व घेऊन घेऊन गप्प बसले होते. स्वातंत्र्यलढ्याने देखील अजून पेट घेतलेला नव्हता.

एकंदर ब्रिटिश शासनाच्या दृष्टीने भारतातील स्थिती एकदम शांततापूर्ण होती. चर्चिल साठी ही एक मोठी सुट्टी असल्याप्रमाणे होती.

भारतात आला तेव्हा चर्चिलच वय एकवीस बावीस वर्षांच असेल.

तो हुशार होता, विनोदबुद्धी तेज होती, दिसायला देखणा होता. पोलो खेळणे आणि पुस्तके वाचणे ही महत्वाची कामे त्याने या काळात केली.

Winston Churchill 1874 1965 ZZZ5426F

तो भारतभर फिरला. कलकत्ता सोडून तो बेंगलोर, उटी, मद्रास, मथुरा, पुणे, दिल्ली, आग्रा, शिमला या ठिकाणी राहिला. भारताचं निसर्गसौन्दर्य, इथलं मैलोगणिक बदलणार हवामान, भाषा, संस्कृती याचा तो अनुभव घेत होता.

एकदा एका पोलो मॅच निमित्त त्याची टीम बेंगलोरहुन हैद्राबादला आली. तिथून त्याने आपल्या आईला पाठवलेल्या एका पत्रात तो म्हणतो,

“काल माझी ओळख जगातल्या सर्वात सुंदर मुलीशी झाली. ती मला उद्या हत्तीवरून हैद्राबाद शहर दाखवणार आहे.”

विन्स्टन चर्चिलसारख्या वांड माणसाचं हृदय पाघळवणारी मुलगी होती मिस पामेला प्लोडेन. ती सुद्धा ब्रिटिश होती. तिचे वडील आयसीएस अधिकारी होते. त्यांचं कुटुंब सुद्धा गर्भश्रीमंत होतं.

पामेलाची आणि विन्स्टनची खास मैत्री झाली.

दोघं हैद्राबाद मध्ये बरेच फिरले, संध्याकाळी तिच्या घरी विन्स्टनला आमंत्रण देखील मिळालं. त्यांचा शाही पाहुणचार पाहून चर्चिल भारावून गेला. त्याचा उल्लेख त्याने आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात केलेला आहे.

एवढं सगळं झाल्यावर आपल्या सारख्या सर्वसामान्य सिंगल मुलांचं जे होईल तसंच चर्चिलच्या बाबतीत झालं.

त्याने जोशात येऊन पामेलाला प्रपोज करून टाकलं.

पामेलानेसुद्धा टिपिकल रिप्लाय दिला,

” मी माझ्या घरच्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यांना माझं लग्न वेल सेटल असलेल्या मुलाशी लावून द्यायचं आहे. जर तुझ्या आणि माझ्या दोन्ही घरचे तयार असतील तर मग मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.”

इथंच माशी शिंकली. चर्चिल च्या घरची परिस्थिती चांगली होती पण वडिलांच्या मृत्यूनंतर जुना रुबाब कमी झाला होता. पामेलाच्या घरचे तिच्यासाठी मोठं स्थळ शोधत होते. आर्मी मध्ये एक छोटा ऑफिसर असलेला चर्चिल त्यांच्या दृष्टीने मिडल क्लासच होता.

चर्चिलचं मोठं हार्टब्रेक झालं.

त्याने पामेलाच मन वळवण्यासाठी तिची मनधरणी करण्यासाठी मोठं मोठी काव्यमय पत्रे पाठवली. त्यात तो म्हणतो,

“मी एक स्वप्न पाहणारा स्वप्नाळू आहे. तू फक्त मला हो म्हण मी जग जिंकून तुझ्या पायाशी आणेन.”

पण व्यवहारी पामेलाने त्याला नकार कळवला.

पुढे तिचं लग्न भारताचे माजी व्हॉइसरॉय लॉर्ड लिटन यांचा मुलगा सर व्हिक्टर लिटन याच्याशी झाल. जो पुढे जाऊन बंगालचा गव्हर्नर व काही काळासाठी भारताचा कार्यकारी व्हॉइसरॉय बनला.

पामेला जवळपास आयुष्यभर भारतात राहिली.

इकडे चर्चिलचं भारतात मन रमलं नाही. भारत हा अडाणी रानटी लोकांचा देश आहे. इथले लोक पान खाऊन जिथे तिथे थुंकत असतात वगैरे वगैरे त्याच्या तक्रारी होत्या. पण खरं कारण भारतात त्याला पामेलाची आठवण यायची.

चर्चिल लवकरच इंग्लंडला परत गेला.

पामेला बद्दल त्याच्या मनात मात्र शेवटपर्यंत आदर होता. तिच्या लग्नांनंतर त्याने शुभेच्छा देखील पाठवल्या होत्या. त्याच्या खाली तो तुझ्या एकनिष्ठ मित्र असं लिहून लफ्फेदार सही सुद्धा ठोकली होती.

चर्चिलचं १९०८ साली क्लेमेंटाईन होझीअर हिच्याशी लग्न ठरलं तेव्हा देखील त्याने पामेलाला सिक्रेट अस टायटल लिहिलेलं पत्र पाठवलं त्यात सुद्धा तो

तुझा मी शेवट पर्यंत बेस्ट फ्रेंड राहीन वगैरे म्हणतो.

चर्चिलने पुढच्याच वर्षी लष्करातून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरला. वडिलांचा घराणेशाहीचा वारसा घेऊन निवडून देखील आला. आपलं अचाट वक्तृत्व लोकांवर मोहिनी घालणारे व्यक्तिमत्व यामुळे लवकरच मंत्री झाला.

काही वर्षांनी ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात लाडका पंतप्रधानदेखील बनला.

पामेलाला सुद्धा आपलं चर्चिल बरोबर लग्न झालं नाही याचं दुःख शेवट पर्यंत राहिलं. ती एकदा कोणाशी तरी बोलताना म्हणाली देखील,

“पहिल्यांदा तुम्ही विन्स्टनला भेटता तेव्हा तुम्हाला त्याच्यातील काही अवगुण दिसतात पण त्यांनंतर त्याच्यातील सदगुण मोजायला तुम्हाला आयुष्य पुरत नाही.’

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.