सी.आय.डी.च्या “कुछ तो गडबड है दया!” मागे सुद्धा एक अजब किस्सा आहे.

१९९८ चं साल. एक मालिका प्रसारीत होण्यास सज्ज होती. ती मालिका नंतर एक इतिहास रचेल याची कोणालाच कल्पना नव्हती. ‘कुछ तो गडबड है दया’ असो किंवा ‘दया, तोड दो ये दरवाजा’ असो, आजही या मालिकांच्या चाहत्यांमध्ये अशा डायलाॅगची क्रेज आहे. आता जरी हि मालिका संपली असली, तरी या मालिकेची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे, की मालिकेचे जुने भाग युट्यूब सारख्या सोशल माध्यमावर आवर्जुन बघितले जातात.

एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल, हे वर्णन कोणत्या मालिकेविषयी आहे.

२० वर्ष टी.व्ही. वर लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडणा-या ‘सी.आय.डी’ ही मालिका आजही आपल्या मनात आहे. या मालिकेतील सर्वच प्रमुख व्यक्तिरेखा विसरणं शक्यच नाही. ‘सी.आय.डी’ मालिकेच्या सुरुवातीपासुन एक मराठी कलाकार एसीपी प्रद्युमनच्या भुमिकेत शेवटपर्यंत स्वतःचं ठळक अस्तित्व निर्माण करत राहिला. हा कलाकार म्हणजे शिवाजी साटम.

शिवाजी साटम आणि सी.आय.डी मालिका हे न तुटणारं समीकरण आहे. शिवाजी साटम यांनी मराठी रंगभूमी, सिनेमा तसेच हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची उत्तम कलाकार म्हणुन चांगली ओळख निर्माण केली होती. १९९५ दरम्यान दूरदर्शनवर ‘१००’ ही मालिका शिवाजी साटम करत होते. मालिकेच्या टीममधील एका मित्राने शिवाजी साटम यांची बी.पी.सिंग यांच्याशी ओळख करुन दिली.

बी.पी. सिंग यांनी नंतर दूरदर्शन सोडलं. त्यांनी काही मालिका दिग्दर्शित केल्या. या प्रत्येक मालिकांमध्ये शिवाजी साटम यांनी भुमिका केल्या.

१९९८ साली बी.पी.सिंग यांनी सी.आय.डी. या मोठ्या मालिकेचा घाट घातला. मालिकेतील प्रमुख भुमिकेसाठी आपसुकच त्यांनी शिवाजी साटम यांना विचारलं. शिवाजी साटम यांना सी.आय.डी.चा विषय प्रचंड आवडल्याने त्यांनी लगोलग होकार दिला. महाभारतात श्रीकृष्णाचा थोरला मुलगा म्हणजे प्रद्युम्न. या नावावरुनच शिवाजी साटम यांच्या भुमिकेला नाव देण्यात प्रद्युमन.

सुरुवातीला शिवाजी साटम यांनी ‘प्रद्युमन’ नावाचा उच्चार चुकीचा असल्याचं बी.पी.सिंग यांना सांगीतलं.

आपली मालिका सगळा देश बघणार आहे, त्यामुळे ‘प्रद्युमन’ हेच योग्य आहे, असं बी.पी. सिंग यांनी सांगीतल्यावर, शिवाजी साटम यांना पटलं.

२१ जानेवारी १९९८ ला सी.आय.डी.चा पहिला भाग प्रसारीत झाला. १९९८ साली सुरु झालेली ही मालिका सलग २० वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर असेल याची कोणीच कल्पना नव्हती केली. या मालिकेत एसीपी प्रद्युमन सारखीच अभिजीत आणि दया हि पात्रं सुद्धा प्रसिद्ध झाली. पण भिडूंनो, सुरुवातीला हि पात्रं मालिकेत नव्हती. तसंच बी.पी.सिंग यांनी शिवाजी साटम यांच्या मुलाचं नाव अभिजीत आहे, त्यावरुन इन्स्पेक्टरला कॅरेक्टरला अभिजीत हे नाव दिलं.

अभिजीत-दया या जोडीने मालिकेत अक्षरशः भाव खाल्ला.

एकदा शिवाजी साटम बी.पी.सिंग यांच्यासोबत एका सीनची चर्चा करत होते. चर्चा करत असताना शिवाजी साटम करत असलेले विशिष्ट पद्धतीचे हातवारे बी.पी.सिंग यांच्या नजरेत आले.

“साटम, हे जे तु करतोयस ना, त्याचा वापर सीनमध्ये करु शकतोस?”

बी.पी.सिंग यांनी असं म्हणताच शिवाजी साटम काहीसे गोंधळले. मराठी रंगभूमीकडून मिळालेली शिकवण असल्याने, कोणतीही गोष्ट समजावताना हातवारे करुन बोलणं हे शिवाजी साटम यांच्यासाठी नैसर्गिक होतं. सीनची तयारी झाली. बी.पी.सिंग यांच्या म्हणण्याप्रमाणे हातवा-यांचा विशिष्ट वापर करुन शिवाजी साटम यांनी एक संवाद म्हटला. सीन कट झाला..

बी.पी.सिंग यांना शिवाजी साटम यांची स्टाईल प्रचंड आवडली. पुढे हाच संवाद शिवाजी साटम मालिकेच्या प्रत्येक भागात त्यांच्या खास अंदाजात म्हणु लागले. तो डायलाॅग होता,

“कुछ तो गडबड है दया!”

सी.आय.डी. मधील एसीपी प्रद्युमन मुळे शिवाजी साटम यांना देशभर नव्हे तर जगभर अमाप लोकप्रियता मिळाली.

मालिकेच्या सुरुवातीच्या दिवसात शिवाजी साटम बँकेत नोकरी करता करता शूटींगला जायचे. एके दिवशी बँकेच्या खाली असलेल्या रस्त्यावर चार-पाच गुंडांनी घेराव घालुन एका माणसाजवळचे पैसे लुटले. शिवाजी साटम यांनी बँकेच्या खिडकीमधुन हे दृश्य बघितले. त्या माणसाने आरडाओरडा केला. शिवाजी साटम आणि आसपासची माणसं गोळा झाली. तो पर्यंत चोर त्याला लुटून पसार झाले होते.

आसपासची लोकं चोरांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी त्या माणसाला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. शिवाजी साटम सुद्धा सोबत होते.पोलीस स्टेशनमध्ये सुधीर जाधव हे इन्स्पेक्टर म्हणुन होते. पैसे लुटल्यामुळे तो माणुस बिचारा हतबल झाला होता. पोलीसांसमोरच शिवाजी साटम यांच्याकडे बघुन तो म्हणाला,

“साहेब, तुम्हीच चोरांना पकडून आणु शकता. पोलीसांचं हे काम नाही.”

त्या अवस्थेत एसीपी प्रद्युमन चोरांना पकडून आणु शकतील, असा त्या माणसाला विश्वास होता.

इन्स्पेक्टर सुधीर जाधव आणि शिवाजी साटम हे खास मित्र. त्या माणसाचं म्हणणं ऐकताच सुधीर जाधव गंमतीत म्हणाले,

“अच्छा.. बरं.. म्हणजे आम्ही नाही तर आता तु शोधुन आणणार तर गुंडांना.”

पोलीस स्टेशनमधल्या या वातावरणावर शिवाजी साटम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सी.आय.डी.मालिका रोज पाहायच्या. शिवाजी साटम यांच्यासह मालिकेच्या कलाकारांचं त्या कौतुक करायच्या. कधी सवड मिळेल तर शिवाजी साटम आणि त्यांच्या कुटूंबियांना घरी जेवायला बोलवायच्या. दिवाळीसारख्या सणांमध्ये सदिच्छा भेट पाठवायच्या. एका भागात एसीपी प्रद्युमन आणि अभिजीत एका लहान बाळासाठी गाणं गातात. हा भाग पाहिल्यानंतर ‘गाणं सुरात गायलंत’ असा अभिप्राय लतादीदींनी शिवाजी साटम यांना कळवला होता.

सी.आय.डी. मालिकेच्या नावावर एक मोठा रेकाॅर्ड आहे.

तो रेकाॅर्ड म्हणजे सलग १११ मिनीटं वन टेक मध्ये मालिकेचा एक भाग शूट झाला होता. २००५ साली संपुर्ण टीमने हा रेकाॅर्ड करुन दाखवला. यासाठी शिवाजी साटम आणि त्या भागातील सर्व कलाकारांनी कॅमेरामनसह ६ दिवस तालमी केल्या. सातव्या दिवशी अॅक्शन म्हणताच फक्त एका कॅमेराचा वापर करुन एका हाॅटेलमधील परिसरात १११ मिनीटांचा संपूर्ण एपिसोड चित्रीत करण्यात आला. २००६ च्या ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये याची नोंद आहे.

२० वर्ष प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या सी.आय.डी. या मालिकेचा शेवटचा भाग २७ ऑक्टोबर २०१८ ला प्रसारीत झाला. लवकरच या मालिकेचा पुढचा सीझन येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. सी.आय.डी. मुळे शिवाजी साटम आणि एसीपी प्रद्युमन हे एक न तुटणारं समीकरणं आपल्यासाठी बनलं आहे, हे मात्र निश्चित!

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Priyanka says

    Sagli mahiti barobar ahe pn Ramayana madhe ramachya chauthya bhavach nav shatrughna ahe praduamna Nahi.pradumna he bhagvan Krishna hyanchya mulacha ki natvacha nav ahe

Leave A Reply

Your email address will not be published.