त्या क्षणापासून अशोककुमार आणि सिगरेट हे समीकरण फिक्स झालं.

भारतीय चित्रपटसृष्टीचे दादामुनी अशोक कुमार. भारतातले पहिले सुपरस्टार. नैसर्गिक अभिनयाचा पहिला पाठ त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला शिकवला. अशोककुमार यांना आठवलं कि एकच चित्र डोळ्यासमोर उभे राहते, हातात स्टायलीश  पाईप किंवा सिगरेट घेऊन उभे असलेला राजबिंडा अशोक कुमार.


हातातली सिगरेट ही अशोक कुमारची ओळख होती, ती सिगरेट त्याच्या हाती कशी आली…?


अशोक कुमारच खर नाव कुमुद्लाल गांगुली. तो जेव्हा मुंबईला आला तेव्हा त्याने आपण सिनेमामध्ये हिरो होऊ असं कधी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत. अभिनयाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. वकीलीचं शिक्षण घेताना अनेक वेळा नापास झाल्यामुळे मुंबईला बहिणीकडे राहण्यासाठी आला होता.

त्याच्या बहिणीचे पती शशाधर मुखर्जी हे बॉम्बे टॉकीज या सिनेमा प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करत होते. तिथे त्यांनी आपल्या या नापास मेहुण्याला लॅब असिस्टंट म्हणून चिकटवले.

बॉम्बे टॉकीजमध्ये तेव्हा ‘जीवन नय्या ‘नावाच्या सिनेमाच शुटींग सुरु होत. पण या दरम्यान सिनेमाची नायिका आणि प्रोड्युसरची बायको देविका राणी सिनेमाचा हिरो नजमुल हसन याच्या सोबत पळून गेली. शशाधर मुखर्जी यांच्या मध्यस्थी मुळे ती परत आली.

देविका राणीच्या नवऱ्याने म्हणजेच बॉम्बे टॉकीजचे मालक हिमांशू रॉयने तिला परत सिनेमामध्ये घेतले पण नजमुल हसनची कायमची सुट्टी करण्यात आली. 

सिनेमाचं बऱ्यापैकी शुटिंग झालं होतं. बराच खर्च झाला होता. आता ऐनवेळी हिरो कुठून आणायचा आणि त्याचा मोठा खर्च कसा भागवायचा या विचारात डायरेक्टर पडला होता. अखेर प्रोडक्शन मध्ये काम करणारा एक मुलगा आवडला. तो शशाधर मुखर्जीचा मुखर्जीचा मेहुणा कुमुद्लाल होता.

त्याला हिरो म्हणून उभा करण्यात आलं आणि नाव दिल गेलं अशोक कुमार. 


असा हा अशोक कुमार, तो जेव्हा सिनेमामध्ये आला तेव्हा त्याला ना हिरोचा लुक होता ना अभिनयाचा गंध होता. सुरवातीला तर तो पडद्यावर खूप अवघडलेला दिसे. अभिनयाचं प्रशिक्षण वगैरे गोष्ट त्याकाळात खिजगणतीतही नव्हती.  एकलव्याप्रमाणे स्वतःच्या चुकामधून शिकायचं होत.

नया संसार या बॉम्बे टोकीजच्या सिनेमाची तयारी सुरु होती. अशोक कुमार रिकाम्या वेळेत बॉम्बे टॉकीजच्या लबमध्ये आपल्या अभिनयाचे रशेस बघत बसायचा. तेव्हा त्याला जाणवलं की अभिनय करताना आपले हात एकदम बांधल्यासारखे दिसतात. या हाताना काही तरी हालचाल दिली पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं.

नया संसार मध्ये त्याचा पत्रकाराचा रोल होता. पत्रकार हिरो असणारा हा भारतातला पहिलाच चित्रपट. अशोक कुमारने या भूमिकेसाठी हातात सिगरेट धरण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्याचे हात अवघडल्यासारखे वाटणार नव्हते.

अशोक कुमारच्या अभिनयात सिगरेट मुळे सहजता आली. प्रेक्षकांनाही ही स्टाईल आवडली. इथून पुढे अशोक कुमार आणि भारतीय सिनेमामधले पत्रकार यांच्या हातात सिगरेट ही कंपल्सरी बनली. 

सिगरेटने अशोक कुमारच्या अभिनयात रंग भरले. एक रंग त्याच्या महल या सिनेमामध्ये दिसला. पुनर्जन्म या संकल्पनेवरची ही पहिली भारतीय फिल्म. या सिनेमामध्ये नायक एका महालात येतो. तिथे त्याला एक फोटो दिसतो. तो फोटो त्या महालाच्या पूर्व मालकाचा असतो. तो दिसायला सेम नायकासारखा असतो. यामुळे भयभीत आणि आश्चर्यचकित झालेल्या नायकाला आयेगा आनेवाला या गाण्याचे सूर ऐकू येतात आणि एक तरुणी (मधुबाला) दिसते.

या  गाण्याच्या दरम्यान अशोक कुमारला एकही संवाद नाही. फक्त हातात सिगरेट धरून सतत गायब होणाऱ्या मधुबालाचा शोध घेण्याचा त्याने अप्रतिम अभिनय केला आहे. स्मोकिंगचा वापर आपली अस्वस्थता आणि भय दाखवण्यासाठी त्याने खुबीने केला आहे.

१९६२ साली अशोककुमारने आरती या सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका केली होती. या चित्रपटात नायिका (मीनाकुमारी) आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरकडे विनवणी करते. डॉक्टरची भूमिका करणारा अशोक कुमार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करतो. सौभाग्य वाचवण्यासाठी ती त्यासाठीही तयारही होते. यामुळे डॉक्टर एकदम आनंदून जातो पण काही क्षणातच आपण जे करतोय त्याची लाज त्याला वाटते. आपला निर्णय बदलून हातातली जळती सिगरेट बुटाखाली चिरडून विझवतो. 

वासनेची आग चिरडून टाकल्याचे दाखवण्यासाठी अशोक कुमारने सिगरेटचा वापर केला. त्याच्या सिनेमामध्ये सिगरेट सुद्धा महत्वाच्या रोल मध्ये असल्यासारखी असायची . सिगरेट हीच त्याच्या अभिनयाची मुख्य ताकद होती असं त्यान अनेक मुलाखतीमध्ये मान्य केल होत.

आज सिनेमामधल्या स्मोकिंगच्या दृश्यासाठी सेन्सॉरबोर्डने अनेक निर्बंध घातलेले आहेत.  दादामुनी आज असते तर त्यांना हातातल्या सिगरेटशिवाय आपल्या अभिनयातले रंग त्याच प्रभावीपणे दाखवता आले असते का हे कोणीच सांगू शकणार नाही. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.