या एका माणसाने पोलीस ट्रेनिंग केंद्रातून एन्काऊंटर स्पेशॉलिस्टची टिम मुंबई पोलीसांना दिली

१९८३ साली नाशिक पोलीस केंद्रातून PSI प्रशिक्षण घेवून बाहेर पडणाऱ्यांची नावे समजली की फ्यूजा उडतात. अस सांगतात की महाराष्ट्राच्या आजवरच्या PSI बॅच मधली ही सर्वात खतरनाक बॅच होती.

मध्यंतरी बॉबी देओलची प्रमुख भूमिका असणाऱ्या क्लास ऑफ 83 सिनेमा रिलीज झाला. त्यात तो १९८३ साली नव्याने भरती होणाऱ्या PSI लोकांचा प्रशिक्षक झाला होता. तो या सर्वांना घेवून महाराष्ट्र पोलीस दलातील आजवरची सर्वात भक्कम पोलीस फोर्स बनवण्यास सुरवात करतो अशी काही  होती.

या बॅचमधली प्रमुख नाव बघा, 

 विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, प्रदीप शर्मा, रविंद्र आंग्रे, अरुण बोरुडे, अस्लम मोमीन

मुंबई पोलीसांची ओळख एनकाऊंटर स्पेशालिस्ट अशी करून जगभर पोलीसी खाक्या निर्माण करण्याच श्रेय जातं ते प्रामुख्याने १९८३ च्या बॅचला.

आणि ही बॅच तयार करण्याचं संपूर्ण श्रेय जातं ते अरविंद इनामदार या पोलीस अधिकाऱ्यांना.

अरविंद इनामदार हे मुळचे सांगली जिल्ह्यातले. तिथल्या तडसर या गावी त्यांचा जन्म झाला तर शिक्षण पुण्यात झाल. इथल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी अर्थशास्त्रात बी. ए. ची पदवी घेतली. पुढे एम.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर UPSC ची परीक्षा पास होऊन 1964 साली ते भारतीय पोलीस सेवेत निवडले गेले.

त्यांचे वडील बंधू भैय्यासाहेब इनामदार हेसुद्धा पोलीस खात्यात अधिकारी होते.

पोलीस दलात असताना त्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे सेवा केली. १९७६ मध्ये नागपूर येथे गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी नक्षलवादी चळवळीचा कुप्रसिद्ध म्होरक्या कोडापल्ली सितारामैया याला बेड्या ठोकल्या. एक निडर ऑफिसर म्हणून त्यांना ओळखल जायचं.

1982 साली त्यांची नेमणूक नाशिक पोलीस अकादमीचे प्राचार्य म्हणून झाली.

आजही पोलीसदलात ट्रेनिंग ॲकडमीमध्ये पोस्टिंग ही एखादी शिक्षा समजली जाते. तिथून बदली व्हावी म्हणून लोक तरसतात.

पण अरविंद इनामदार यांनी हे पद आव्हान म्हणून स्विकारल. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून परीक्षा पास झालेले उपनिरीक्षक या अकादमी मध्ये ट्रेनिंग घेतात. कडक शिस्तीचे अरविंद इनामदार यांनी ठरवलं की एनडीए किंवा इतर लष्करी अकादमीच्या या  नाशिकच्या अकादमीमधल्या अधिकाऱ्यांना लष्करी पद्धतीचे प्रशिक्षण द्यायचे.

आजवर महाराष्ट्राच्या पोलिस इतिहासात अस कधी घडल नव्हत.

नाशिकच्या अकादमीच रूपडेच पालटून गेलं. अरविंद इनामदार यांनी अकादमीला शिस्त लावली. ट्रेनिंगचे नवीन साहित्य आणले. तिथल्या मेसमध्ये जेवणाचा दर्जा बघून ते भडकलेच.

जर फायटर्स घडवायचे असतील तर त्यांना जेवण सुद्धा दर्जेदार दिले पाहिजे.

त्या दिवसानंतर अकादमी मध्ये अत्यंत कमी दरात उत्कृष्ट जेवण मिळू लागल. अरविंद इनामदार यांनी अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत होते. अकादमी मध्ये वेगळाच उत्साह संचारला.

त्यावर्षीची नवीन बॅच आली, हिच अरविंद इनामदार यांची प्राचार्य म्हणून पहिली बॅच..

यात होते प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, रविंद्र आंग्रे, विजय साळसकर, अरुण बोरुडे, अस्लम मोमीन असे तरुण अधिकारी. यातले अनेक जण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते.

अरविंद इनामदार यांनी त्यांना चांगलच रगडल. प्रचंड मेहनत करून घेतली. लष्करी पद्धतीने ट्रेनिंग झालं. दंगल, स्फोट, दहशतवादी हल्ला इत्यादी वेळी काय करावं, याचं नीट प्रशिक्षण दिलं होतं, तयारी करून घेतली होती.

फक्त इतकच नाही तर अकादमीत मोठय़ा संख्येने आलेल्या ग्रामीण मुलांना जेवायचे कसे, बोलायचे कसे, कपडे कसे घालायचे, आदी धडे सुद्धा दिले. ट्रेनिंग संपल्यावर परीक्षा घेतली. प्रदिप शर्मा व विजय साळसकर यांना इनामदारांनी अकादमीमध्ये 2,000 रोपे लावण्याची जबाबदारी दिली होती ही आठवण अजूनही सांगितली जाते.

या लष्करी ट्रेनिंग  परिणाम असा झाला की, 200 जणांच्या तुकडीतील फक्त 70 जण नापास झाले होते.

अकादमीच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.

पण अरविंद इनामदार यांनी या 70 जणांना पुन्हा सहा महिने खडतर प्रशिक्षणाला सामोरे जायला लावल. त्यातही पुन्हा जे नापास झाले त्या दोघा-तिघांना त्यांनी घरीच पाठवले. अशा या अनेक खडतर प्रशिक्षणातून तलावूनसुलाखून जे अधिकारी बाहेर आले त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात वेगळाच दबदबा निर्माण केला.

आजही त्यांना 83 च्या तुकडीचे फायटर अधिकारी असं ओळखल जातं.

मुंबईमध्ये जेव्हा अंडरवर्ल्डची डोकेदुखी वाढली होती तेव्हा त्यांचा खात्मा करण्यासाठी एक स्पेशल टीम बनवण्यात आली. यात अनेक ऑफिसर हे 83 च्या बॅचचे होते. प्रदीप शर्मा, विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, रविंद्र आंग्रे यांनी दया नायक, सचिन वाझे यांच्या साथीने अंडरवर्ल्डचे पाळेमुळे उखडून टाकले.

जवळपास 1000 च्या वर गुंडांना पोलिसांनी ठोकल यात सिंहाचा वाटा 83 च्या बॅचचा होता.

मुंबई सुरक्षित झाली ती या एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यामुळे आणि त्यांना घडवण्याच श्रेय जातं अरविंद इनामदारांनां.

इनामदार यांच्यामुळेच गुन्हेगारी जगतावर दरारा निर्माण करणारा ‘टाडा’ कायदा महाराष्ट्रात प्रथमच लागू करता आला. गुन्हे अन्वेषण विभागाचे पहिले सहआयुक्त होण्याचा मान इनामदार यांच्याकडेच जातो. 1993 मध्ये मुंबईत दंगलीने कहर गाठला होता, तेव्हा तत्कालीन आयुक्त श्रीकांत बापट यांनी इनामदारांना मुंबईत बोलावून घेतले.

दगडी चाळीत शस्त्रास्त्रे सापडल्यानंतर अरुण गवळीवर ‘टाडा’अंतर्गत कारवाई करण्याची कामगिरी सुद्धा इनामदारांचीच.

36 वर्षांच्या सेवेत चक्क 29 वेळा त्यांना बदल्यांना सामोरे जावे लागले होते. पण त्यांनी आपल्या प्रतिमेला तसेच कर्तव्यनिष्ठेला कधीही तडा जाऊ दिला नाही. अशा परिस्थितीतही बजावलेल्या प्रामाणिक, धाडसी सेवेमुळे त्यांना उल्लेखनीय व विशेष सेवेबाबतची दोन्ही राष्ट्रपतिपदके सन्मानाने प्रदान करण्यात आली.

पुढे ते महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदावर असताना तत्कालीन गृहमंत्र्यांशी मतभेद झाल्यामुळे स्वेच्छानिवृत्त झाले. आपला बाणेदारपणा कधी सोडला नाही. 

सेवेत असताना प्रामाणिक आणि पारदर्शकपणे कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अरविंद इनामदार फाउंडेशनद्वारे जीवनगौरव पुरस्कार सुरू केले. अरविंद इनामदार यांची शेवटपर्यंत बांधिलकी फक्त पोलिसांशी राहिली.

अरविंद इनामदार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी, बंदुकीच्या पराक्रमासाठी फेमस होते पण कुसुमाग्रज, ग दि माडगुळकर यांचे मित्र, भगवदगीतेचे अभ्यासक अशी त्यांची हळवी बाजू अनेकांना माहिती नव्हती.

असा हा डॅशिंग पोलीस अधिकारी. हुसेन झैदी यांनी लिहिलेल्या पुस्तकावर बनणाऱ्या नेटफ्लिक्स फिल्म मध्ये इनामदार यांचा रोल करायची जबाबदारी आता बॉबी देओल वर आली होती.

हे ही वाच भिडू.

3 Comments
 1. Rosh05 says

  माझ्या माहितीनुसार डॉक्टर अरविंद इनामदार यांचे गाव सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर हे गाव आहे.

 2. Nitin Adarkar says

  Excellent article !
  An upright , honest officer and a gentleman and great human being .

 3. Vishwajeet katkar says

  Great proud of Inamdar Sir

Leave A Reply

Your email address will not be published.