फिनाईलचा ब्रँड आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना नवं आयुष्य देतोय, पण त्यापलीकडची गोष्टही भारी आहे

नुसतं गडचिरोली असं एक नाव घेतलं तरी बहुतेकांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि त्यांच्याकडून एकच प्रतिक्रिया येते.

“बापरे नक्षलवादी!! महाराष्ट्रातलं अफगाणिस्तान…”

अनेक जण गडचिरोली जिल्ह्याचा उल्लेख अफगाणिस्तान म्हणून करतात. परंतु गडचिरोली जिल्ह्यात सध्या काय अवस्था आहे, याचा मागोवा घेतल्यावर लक्षात येतं की, गडचिरोली जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत बराच बदल झालाय.

१९८० च्या दशकात तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यातल्या कमलापूर गावात नक्षलवादाची ठिणगी पडली. त्या ठिणगी बरोबरच गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट हिरवं जंगल नक्षलवादाच्या लाल झेंड्याच्या आड गेलं. 

आता गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापानेला ४० वर्ष पूर्ण होताना, जिल्ह्यावर असलेलं लाल झेंड्याचं सावट  दूर होताना दिसतंय. वेगवेगळ्या कारणांनी नक्षलवादी चळवळीत सहभागी झालेले लोक आता आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.

 त्यांच्या आत्मसमर्पणातून एक नवीन प्रवास सुरु झालाय. तो प्रवास आहे नवजीवन वसाहतीचा…

२२ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी क्लीन १०१ ब्रॅण्डच्या फिनाईल बॉटल्स असलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी बनवलेल्या फिनाईल बॉटल्स, गडचिरोली शहरात असलेल्या रिलायन्स सुपर मार्केट मध्ये विकल्या जाणार आहेत. परंतु ही गोष्ट निव्वळ एका फिनायलच्या ब्रॅण्डची नाही.

ही गोष्ट आहे गेल्या १७ वर्षांपासून चालत आलेल्या नक्षलवादी आत्मसमर्पणाची.

नक्षलवादी चळवळ निव्वळ महाराष्ट्रातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातच नाही. ही चळवळ देशामधील १० राज्यातील एकूण ९० जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. गेल्या १७ वर्षांपूर्वी या चळवळीची व्याप्ती आणखी मोठी होती. 

त्यामुळेच शासनाने या समस्येवर उपाय करण्यासाठी बंदूकीबरोबरच बक्षिसाची सुद्धा सुरुवात केली.  २००३ पासून आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना बक्षीस दिलं जाऊ लागलं होतं. मात्र २००५ मध्ये या बक्षीस वाटपाचं रूपांतरण आत्मसमर्पण योजनेमध्ये करण्यात आलं. 

२००५ मध्ये ही आत्मसमर्पण योजना अस्तित्वात आणि त्यामुळे अनेक नक्षलींचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली.  

अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे नक्षलवादी संघटनेत सहभागी होतात. काही जण आपल्या मर्जीने संघटनेत जातात, काही जण भीतीपोटी जातात तर अनेकांना बळजबरी चळवळीत नेलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती नक्षलवादी संघटनेत सहभागी होते.

 तेव्हा त्यांचे परत सामान्य आयुष्यात जाण्याचे मार्ग वेगवेगळ्या पद्धतीने बंद केले जातात. 

संघटनेतून परत गेल्यास त्यांच्यासह अख्ख्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली जाते. संघटनेत आलेल्या मुलीने जर घरी जाऊन विवाह केला, त्यांनतर तिला मुलंबाळं झाली तर ती चळवळीत परत यायला नकार देईल. त्यासाठी संघटनेत सहभागी होणाऱ्या मुलींची नसबंदी केली जाते. 

परंतु नक्षलवादी चळवळीने एवढे प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा पोलीस विभागाच्या आत्मसमर्पण योजनेची माहिती चळवळीतील लोकांना पटली. तेव्हा अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. 

परंतु नक्षलवादी आत्मसमर्पण करतात तेव्हा नेमकं काय होतं?

ज्या व्यक्तीला नक्षलवादी चळवळ सोडून सामान्य आयुष्यात परत यायचं आहे ते नक्षलवादी पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण करतात. त्यात वैयक्तिक आत्मसमर्पण, समूहाने आत्मसमर्पण, जोडप्याने आत्मसमर्पण आणि हत्यारांसोबत आत्मसमर्पण असे वेगवेगळ्या पद्धतीने आत्मसमर्पण केले जातात. २०२२ या वर्षात ६ जणांनी आत्मसमर्पण केलंय.  

राज्य शासनाने ही आत्मसमर्पण योजना २००५ सालात सुरु केली. ही योजना सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण ६५५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. जेव्हा नक्षलवादी आत्मसमर्पण करतात तेव्हा त्यांना त्यांच्या पदानुसार बक्षीस दिलं जातं.

त्यात स्थानिक गुरिल्ला दलम मधील सदस्य आणि कमांडरला अनुक्रमे २ ते ३ लाख रुपये, प्लाटून दलांमधील सदस्य आणि कमांडरला अनुक्रमे २.५ ते ४ लाख रुपये, कंपनी दलम आणि प्लाटून मधील सदस्यांना २.५ लाख तर कमांडरला ५ लाख रुपये दिले जातात. 

४-९ जणांच्या समूहाने आत्मसमर्पण केल्यास ४ लाख अधिकचे मिळतात. १० पेक्षा जास्त सदस्यांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यास १० लाखरुपये अधिकचे मिळतात. तर पती पत्नीने एकत्र आत्मसमर्पण केल्यास १.५ लाख अतिरिक्त मदत मिळते.

याच्यापेक्षा मोठ्या पातळीवरील विभागीय पातळीवरील सदस्य आणि सचिवाला अनुक्रमे ६ ते १० लाख, राज्य समितीमधील सदस्य आणि सचिवाला अनुक्रमे ८ ते १२ लाख, स्पेशल झोन समितीतील सदस्य आणि सचिवाला अनुक्रमे १० ते १५ लाख, रिजनल ब्युरोतील सदस्याला १६ लाख, केंद्रीय कमेटीमधील सदस्याला १८ लाख आणि पोलीट ब्युरो सदस्याला सर्वाधिक २० लाख रुपये बक्षीस दिलं जातं.

राज्य शासनाच्या या बक्षिसांबरोबरच केंद्र सरकारकडून मिळणारं २.५ आणि ५ लाख रुपयांचं बक्षीस वेगळंच असतं. 

वैयक्तिक आत्मसमर्पणाबरोबरच नक्षलवादी स्वतःचं हत्यार सुद्धा समर्पित करत असेल. तर त्याचं वेगळं बक्षीस दिलं जातं. त्यात एके ४७ बंदुकीवर १ लाख तर एलएमजी रायफल वर १.५ लाख रुपये बक्षीस दिलं जातं.

निव्वळ बक्षीस दिल्यामुळे आत्मसमर्पण परब होत नाही. तर सोबतच आत्मसमर्पितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनर्वसन योजना सुद्धा राबवली जाते.      

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींना स्वतःचं घरं बांधण्यासाठी गडचिरोली शहरात नवजीवन वसाहतीची स्थापना करण्यात आलीय. त्यांना या वसाहतीमध्ये १२६ चौरस मीटरचा भूखंड दिला जातो. तसेच त्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी सरकारच्या घरकुल योजनेतून घरकुल मंजूर करून दिलं जातं.

वसाहतीमधील प्रत्येक घराला वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जातात. एक-दीड वर्षांपूर्वी वसाहतीमध्ये पक्क्या नाल्या आणि रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झालंय.

आत्मसमर्पितांवर चालू असलेले सगळे खटले काढून घेतले जातात. त्यांना लागणारी वेगवेगळी कागदपत्रे जसे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, रेशन कार्ड यांसारखी सगळी कागदपत्रे पोलीस विभागाच्या वतीने काढून दिली जातात. 

खटले गेले, घर झालं, कागदपत्रे मिळाली पण रोजगाराचं काय?  

घर आणि कागदपत्रं दिल्याने पोट भरत नाही. त्यामुळे आत्मसमर्पितांची आवड आणि क्षमता बघून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. रोजगारासाठी दुकान चालवणे, लघुउद्योग उभारणे, वेगवेगळ्या वस्तू बनवणे, साबण बनवणे असे प्रशिक्षण दिले जाते. 

आदिवासी विभाग आणि शासनाच्या विविध योजनांमधून किराणा दुकान, पानटपरी, गृहउद्योग असे व्यवसाय दिले जातात. तर आवड आणि क्षमता असलेल्यांना होम गार्ड, पोलीस विभागात गार्ड अशा नोकऱ्या दिल्या जातात. 

रोजगारासोबत पोलीस विभागाकडून २७ लोकांची मुक्त विद्यापीठात एडमिशन करून देण्यात आलीय. तर आत्मसमर्पितांच्या अपत्यांच्या शिक्षणाची सोय सुद्धा करून देण्यात आली आहे.   

त्यातीलच नवजीवन बचत गटाकडून क्लीन १०१ फिनाईल बनवण्याचं काम केलं जातंय. 

जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांसाठी जय सेवा बचत गट आणि नवजीवन बचत गटाची स्थापना करण्यात आलीय. बचत गटांना सक्षम करण्यासाठी उद्योग उभा करण्याची कल्पना मांडण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १.१ लाख रुपयांचा निधी मागण्यात आला. 

त्या निधीच्या माध्यमातून बचत गटाच्या लाभार्थ्यांना वर्ध्याच्या लाईवलीहूड बिजनेस इन्क्युबेटर केंद्रातून फिनाईल बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. तर उरलेल्या निधीचा वापर करून फिनाईल बनवण्याचा प्रकल्प सुरु करण्यात आला. या प्रकल्पातून गेल्या महिन्यात ६०० लिटर फिनाईलची विक्री झालीय. तसेच नुकतीच २४० लिटर फिनाईलची पहिली ऑर्डर रिलायन्स मार्टला देण्यात आलीय. 

फिनाईल निर्मितीच्या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बोल भिडूने गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्याशी संपर्क साधला. 

या प्रकल्पाबद्दल माहिती देतांना पोलीस अधीक्षक अंकित गोयल सांगतात कि, 

“विभागाच्या वतीने आत्मसमर्पितांना फिनाईल बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर फिनाईल बनवण्यासाठी उद्योग संस्थेची निर्मिती करण्यात आली. यातून निर्माण होणार फिनाईल यापूर्वी पोलीस कॅन्टीन आणि दुकानामध्ये विकला जात होता.”

याबद्दल आणखी माहिती देतांना एसपी अंकित गोयल सांगतात कि, “पोलीस विभागातून प्रतिसाद मिळाल्यानंतर हे फिनाईल रिलायन्स मार्ट मध्ये विकण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. ही सुरुवात आहे, भविष्यात व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच दुसऱ्या शहरातील मार्केटमध्ये फिनाईल विकण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जातील.” असं एसपी अंकित गोयल म्हणाले 

रोजगाराच्या समस्येसोबत आणखी एक मोठी समस्या असते. ती म्हणजे आत्मसमर्पितांच्या विवाहाची. 

नक्षलवादी चळवळीत प्रामुख्याने तरुण सहभागी होता. चळवळीत सहभागी झाल्यानंतर तरुणींनी विवाह करून मुलबाळ जन्माला घालू नये यासाठी त्यांची नसबंदी केली जाते. परंतु आत्मसमर्पण केल्यानंतर तरुणींची नसबंदी शस्त्रक्रिया मोकळी केली जाते. 

नसबंदी मुक्त केल्यांनतर स्थानिक गोंडी किंवा हिंदू धार्मिक पद्धतीने तरुण-तरुणींचा विवाह लावून दिला जातो. पोलीस विभागाकडून आजपर्यंत १६ जोडप्यांचा विवाह करून देण्यात आलाय. त्यामुळे आत्मसमर्पितांना मुक्त आणि परिपूर्णपणे आयुष्य जगण्याची संधी मिळते. 

दिवसेंदिवस आत्मसमर्पितांची संख्या वाढत आहे आणि अनेक नक्षलवादी हत्यार त्यागून परत समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. त्यामुळे आता समाजाने त्यांना मोकळ्या मानाने स्वीकारावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे.  

हे ही वाच भिडू  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.