डोकं पाहून म्हणावं वाटतं, गहलोत हे कॉंग्रेसचे अमित शहा आहेत

काँग्रेसमध्ये हायकमांड सिस्टीम आहे. पक्षातले जे कुणी या हायकमांड सिस्टीमच्या विरोधात जातात त्यांना एक तर पार्टीतून काढलं जातं. नाही तर ते नेते हकालपट्टी व्हायच्या आत काँग्रेस सोडतात…पण याला अपवाद ठरलेत ते नेते म्हणजे देशभरात चर्चेत असणारे अशोक गेहलोत. काही केलं तरीही अशोक गेहलोत काँग्रेस हायकमांडच्या कंट्रोलमध्येच येत नाहीयेत. किंबहुना गेहलोत यांच्याच कंट्रोल मध्ये काँग्रेस हायकमांड असल्याचं चित्र दिसतंय…

राजस्थान काँग्रेसमधला राडा पाहता अगदी काल-परवा पर्यंत वाटत होतं काँग्रेस हायकमांड गेहलोत यांना सांगेल तुम्ही गप्पगुमान काँग्रेस अध्यक्ष बना आणि सचिन पायलट याना मुख्यमंत्री पद द्या…पण ऐकतात ते गेहलोत कुठले…

गेहलोत यांना उगाच जादूगार म्हणत नाहीत, डाव पलटवणं त्यांच्या डाव्या हातचा मळ आहे…तसाच त्यांनी परवा रात्रीतून सगळा डाव पलटवला. त्यांनी त्यांच्या समर्थक १०२ आमदारांकडून पक्षावर दबाव आणत एक प्रकारचं बंडच केलं ज्यातून त्यांना हायकमांडने क्लीन चिट दिली, त्यांचं CM पदही कायम ठेवलं आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीतही ते कायम असल्याची चर्चा आहे. 

हायकमांडलाही भारी पडणारे अशोक गेहलोत यांचा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमधले ‘अमित शहा’ म्हणून उदय होतोय..

या चर्चांमागे काँग्रेसमधील सद्द्यस्थिती तर कारणीभूत आहेच शिवाय गेहलोत यांचा मजबूत असा राजकीय इतिहास आहे..

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक आणि राजस्थान सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा निर्णय, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित झाल्या आहेत. अशोक गेहलोत यांना काँग्रेसचं अध्यक्षही बनायचंय आणि मुख्यमंत्रीपदही कायम ठेवायचंय..तर इकडे सचिन पायलट यांचा संयम सुटत चाललाय…हा राजकीय तिढा सुटत नाहीये कारण अशोक गेहलोत हे हायकमांडवर भारी पडत आहेत…कशाच्या जोरावर गेहलोत काँग्रेसमधील शक्तिकेंद्र बनत आहेत ?  त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं..

पहिली गोष्ट म्हणजे, अशोक गेहलोत देशातील दोन काँग्रेसशासित राज्यांपैकी एका राज्याचे मुख्यमंत्री. त्यातही गाय पट्ट्यातील बऱ्यापैकी मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ५ वेळा खासदार, ३ वेळा कॅबिनेट मंत्री आणि ३ वेळा राजस्थान काँग्रेसचे प्रमुख आणि ३ वेळा मुख्यमंत्रीपद असा स्ट्रॉंग CV असलेले अशोक गेहलोत आहेत.. 

गेहलोत यांच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आधी आपण त्यांच्या इतिहासात मारून येवूया म्हणजे अंदाज लागेल. 

अशोक गहलोत केंद्रात नरसिंह राव सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा राव यांचे अध्यात्मिक गुरू होते चंद्रास्वामी. तेच चंद्रास्वामी ज्यांनी इंग्लडच्या पंतप्रधान मार्गोरेट थेचर होतील, राव पंतप्रधान होतील अशा भविष्यवाण्या केलेल्या होत्या.. गहलोत हे स्वत: जादूगार होते. म्हणजे त्यांचे वडिल प्रोफेशनल जादूगार होते आणि तेव्हा गहलोत त्यांच्यासोबत जादू दाखवत फिरायचे. आत्ता अशा जादूगार माणसाला हातचलाखी माहितच असते. त्यांनी काय चंद्रस्वामीला भावच दिला नाही. त्यामुळे स्वामीबाबांचा इगो दुखावला. त्यांनी राव यांच्यातर्फे गहलोत यांचा पद्धतशीर कार्यक्रम झाला…आणि गेहलोत राजस्थानमध्ये परतले.. 

तेंव्हा राजस्थानमध्ये हरिदेव जोशी, परसराम मदेरना, शिवचरण माथूर असे तीन गट होते.  या गटातटाच्या राजकारणात १९९३ च्या निवडणूका काँग्रेस हरली. सगळ्यांना मागे टाकत गेहलोत स्वत: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले. अशातच १९९८ च्या निवडणूक लागल्या आणि १५३ जागांवर काँग्रेस निवडून आली. बरीच फिल्डिंग लावून राजस्थान काँग्रेसचे मुख्यमंत्री पद गेहलोत यांनी मिळवलं. त्यानंतर २००८ मध्ये येऊ. सीपी जोशी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. ते राज्याचे मुख्यमंत्री होतील असं म्हणलं जात होतं पण सीपी जोशींचा पत्ता कट झाला. गहलोत यांनी फिल्डिंग टाईट केली आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. 

ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले त्या घडामोडी देखील इंरेस्टिंग घडल्या..

२०१८ मध्ये सचिन पायलट यांना मिळणारं मुख्यमंत्रीपद अशोक गेहलोत यांनी स्वतःकडे खेचून घेतलं.

२०१३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला त्याचा परिणाम म्हणजे काँग्रेसने २०१८ च्या विधानसभा निवडणूक सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली लढवली. २०० पैकी १०० जागा मिळवत काँग्रेस जेंव्हा जिंकून आली. भाजपच्या ७३ जागा निवडून आल्या. राजस्थानच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे २००. म्हणजे बहुमताचा आकडा सिद्ध करायला आकडा लागत होता १०१ चा…

आता मुख्यमंत्री सचिन पायलटच होतील असं चित्र असतांना अशोक गेहलोत यांनी राजकीय खेळी केली ती म्हणजे- एक तर अपक्षांना सोबत घेतलं. जे मुख्यमंत्री पदासाठी गेहलोत यांच्या बाजूने होते. ११५ आमदारांची संख्या असल्याचा दावा करत गेहलोत यांनी शक्तीप्रदर्शन केलं. 

राहुल गांधींचा कल हा पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या बाजूने होते तर सोनिया गांधीचा कल हा गेहलोत यांच्या बाजूने होता..शेवटी गेहलोत यांनी पायलट यांना मात देत आपला स्ट्रॉंग CV दाखवत अनुभवाच्या जोरावर मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली आणि हायकमांडमधलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

अशोक गेहलोत काँग्रेसमधील शक्तिकेंद्र बनत गेलेत त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे, 

२०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत गेहलोत यांना टक्कर देण्यासाठी पंतप्रधान मोदींना मैदानात उतरावं लागलं होतं.

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांना काँग्रेस प्रभारी बनवलं होतं. या निवडणुकीत गेहलोत यांनी ४ गोष्टी साधल्या, पहिलं म्हणजे प्रोफेशनल कंपनीज ला हाताशी धरून प्रचार तर केला. दुसरं इथे पक्ष मजबूत केला. तिसरं म्हणजे हार्दिक पटेल सारखे तरुण नेते काँग्रेसमध्ये आणले. चौथं म्हणजे- काँग्रेसची हिंदुत्वविरोधी प्रतिमा मोडून काढली.

तुम्हाला आठवत असेल तर गुजरात निवडणुकीपूर्वी अशोक गेहलोत यांनीच राहुल गांधींना सोमनाथ मंदिरासह गुजरातच्या सगळ्या मंदिरांमध्ये नेलं. 

गेहलोत यांची तयारी बघून पंतप्रधान मोदी गुजरात निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. 

भले इथं भाजप निवडून आली तरीही गेहलोत यांच्या ‘मिशन गुजरातमुळे’ १५० जागांचा दावा करणारा भाजप पक्ष ९९ जागांवर निवडून आला. तेच काँग्रेसने २०१२ मध्ये इथे १६ जागा जिंकल्या होत्या, त्या १६ जागांवरून काँग्रेस २०१७ मध्ये ७७ जागा जिंकत आघाडीवर आला. गेहलोत यांच्या रणनीतीमुळे हे शक्य झालं म्हणूनच काँग्रेसने येत्या २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी पुन्हा एकदा अशोक गेहलोत यांनाच दिलीय. थोडक्यात राहूल गांधींनी राजेश पायलट यांची ताकद मान्य केली म्हणायला लागेल.

२०१७ मधील आणखी एक उदाहरण म्हणजे- 

अहमद पटेलांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी जो डाव रंगला होता त्याचं क्रेडिट जातं अशोक गेहलोत यांना. 

२०१७ च्या ऑगस्टमध्ये गुजरातमध्ये राज्यसभेच्या ३ जागांसाठीची निवडणूक सुरु होती. अहमद पटेलांना काँग्रेसच्या एकूण ५१ आमदारांपैकी ४५ आमदारांचा पाठिंबा होता. पण निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ६ आमदारांनी शंकरसिंह वाघेला यांच्या नेतृत्वात बंड केलं, त्यातले ३ आमदार भाजपमध्ये गेले. त्यात भाजपकडून ३ जण रिंगणात होते, अमित शहा, स्मृती इराणी आणि काँग्रेसचे बंडखोर आमदार बलवंत सिंह राजपूत. अमित शहा, स्मृती इराणी हे जिंकणार हे फिक्स होतं. अहमद पटेल यांना पाडण्यासाठी भाजपने त्यांच्या विरोधात बलवंत सिंग यांना उमेदवारी दिली होती.

पटेलांना ४५ मतं मिळणार नाहीत अशी स्थिती होती, कारण काँग्रेसचे आणखी २ आमदार भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग करण्याची खबर होती…मग काँग्रेस हायकमांडने अशोक गेहलोत यांना गुजरातला पाठवलं. 

मग खेळ सुरु झाला… 

काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी भाजपच्या समर्थनार्थ क्रॉस व्होट केले, पण मतदान केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मतपत्रिका भाजपच्या पोलिंग एजंटला दाखवल्या. तर नियमांनुसार ते फक्त काँग्रेस पोलिंग एजंटलाच आपले मत दाखवू शकत होते. अखेर काँग्रेसच्या आव्हानानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही बंडखोर आमदारांची मते रद्द केली एकूण मतांची १७६ वरून १७४ वर आली.  पटेलांना आता ४५ ऐवजी ४४ मतांची गरज होती. त्याच वेळी जनता दल युनायटेडचं १ मत,  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं १ मत असं मिळून अहमद पटेल जिंकून आले.

या रणनीतीमागे अशोक गेहलोत होते. सोनिया गांधींच्या जवळचे त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेलांना राज्यसभेत पोहचवून अशोक गेहलोत हायकमांडसाठी महत्वाचे बनले. 

त्यानंतरचं उदाहरण म्हणजे, 

गेल्या जून महिन्यात झालेली राजस्थानच्या राज्यसभेची निवडणूक

इथे ४ जागांसाठी निवडणूक झालेली. इथे सत्ताधारी काँग्रेसकडे १०८ आमदार, भाजपकडे ७१ आमदार तर अपक्ष आमदारांची संख्या आहे १३. छोट्या पक्षांचं संख्याबळ पाहायचं झालं, तर रालोपकडे ३, माकप आणि बीटीपीकडे प्रत्येकी २ आणि रालोदकडे १ आमदार आहे…त्यामुळे जिंकून येण्यासाठी ४१ मतांची गरज होती.  काँग्रेसच्या २ आणि भाजपची १ जागा फिक्स होती. पण चौथ्या जागेसाठी चुरस रंगलेली. काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात भाजपनं अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला होता.

चौथ्या जागेसाठी घोडेबाजाराची पूर्ण शक्यता होती. या निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वतःकडे घेतली. काँग्रेसनं सुरुवातीलाच आपल्याकडे १२६ आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा केला होता. गेहलोत यांनी रिसॉर्ट पॉलिटिक्सची स्कीम वापरत काँग्रेसचे आमदार, त्यांचे सहयोगी आमदार, अपक्षांची मोट बांधत फिल्डिंग सेट केली. तरीही आणि जे आमदार क्रॉस व्होटिंग करु शकतात अशा आमदारांना त्यांनी सर्वात आधी मतदान करायला लावलं. 

या सगळ्या रणनीतीचं फळ म्हणजे काँग्रेसचं एकही मत फुटलं नाही. वरून सुभाष चंद्रा यांना पराभवाआधीच क्रॉस व्होटिंगचा धक्का बसला. आणि या निवडणुकीत रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि मुकुल वासनिक हे काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी तर ठरले. याचं क्रेडिट अशोक गेहलोत यांना गेलं, त्यांची जादू पुन्हा एकदा चालली. 

अलीकडच्या घडामोडी पाहिल्या तर, गहलोत यांचा मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा होती पण त्यांची सोनिया गांधींसोबत फोनवरून चर्चा झाली. क्लिन चिटही मिळाली त्यामुळे पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

गेहलोत यांच्या सगळं मनासारखं होतंय मात्र यामुळे सचिन पायलट समर्थक गप्प बसणार नाहीत. त्यांना कंट्रोल करणं आणि सचिन पायलट यांना टिकवून ठेवणं हे काँग्रेस हायकमांडला गरजेचं आहे. मात्र या सगळ्यात कुठेच कॉम्प्रमाइज न करणारे अशोक गेहलोत काँग्रेसमधले एक चाणक्य म्हणून सिद्ध झालेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.