बिप्लब देब फक्त त्यांच्या बोलण्यामुळं त्रिपुराचे ‘माजी’ मुख्यमंत्री झालेत

१४ मे हा दिवस त्रिपुराच्या राजकारणासाठी खूपच नाट्यमय राहिला. दुपारी साधारण चार वाजेनंतर देशभर एकच बातमी व्हायरल झाली ती म्हणेज – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी पदाचा राजीनामा दिला. या घटनेच्या २ तासात अपडेट मिळाली की,

त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून माणिक सहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आतापासून ते हा पदभार सांभाळतील.

माणिक सहा यांची नियुक्ती झाली हे ठीक मात्र बिप्लब देब यांनी अचानक राजीनामा का दिला? याचं कारण जाणून घेणं जास्त गरजेचं होतं.

बिप्लब देब यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना द्यायला भाग पाडलं आहे. भाजप नेतृत्त्वाकडून देव यांना पदावरून दूर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर देव यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना पाठवला.

त्याबद्दल प्रतिक्रिया देताना “पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती मी सांभाळेन” असं देव म्हणाले.

मग अजूनच उत्सुकता वाढली की पक्षाने त्यांना का राजीनामा देण्यास सांगितलं? त्याचं कारण म्हणजे… त्रिपुरा भाजप संघटनेत बिप्लव देब यांच्याबाबत नाराजी आहे. यामुळेच दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता, असं सांगण्यात येतं. तर एका वर्षात राज्यात विधानसभा निवडणुकी होणार आहेत. अशात भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. म्हणून त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला.

भाजपच्या एखाद्या मुख्यमंत्र्याला या कारणाने पद सोडावं लागण्याची किंवा सोडा असा आदेश होण्याची ही तशी काही पहिली वेळ नाहीये. याआधीही उत्तराखंड, गुजरात आणि कर्नाटकात पक्षाचे अन्य कार्यकर्ते नाराज असल्याने भाजपने मुख्यमंत्र्यांना पदावरून पायउतार केलंच आहे.

मात्र बिप्लव देब यांच्याबद्दलची पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजीचं कारण आहे.  ते म्हणजे – बिप्लव देब यांची वादग्रस्त आणि लॉजिक विरहित विधानं.

आजवर त्यांनी इतके वादग्रस्त आणि लॉजिक नसलेले विधान केले आहेत की, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते संतापले आहेत आणि अशा वागण्याने पक्षाची इमेज खराब होईल, अशी नेहमीच आशंका वर्तवण्यात आली आहे. यामुळेच २ वेळा कार्यकर्त्यांनी त्यांची तक्रारही केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. मात्र वागण्यात सुधारणा न झाल्याने अखेर त्यांना आता पद गमवावं लागलं आहे.

अशीच त्यांची लॉजिक विरहित विधानं बघुयात…

१) इंटरनेट आणि सॅटेलाईट हे महाभारताच्या काळापासून अस्तित्वात आहेत.

२०१८ मध्ये बिप्लव देब यांना पदावर येऊन फक्त २ महिने झाले होते.  त्यावेळी त्रिपुराची राजधानी आगरतळा इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं. यामागे त्यांचं लॉजिक होतं की, महाभारतातील संजय हे पात्र दरबारात बसून धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती देत होता. म्हणजे भारत तेव्हापासून इंटरनेट आणि सॅटेलाईट ही टेक्नॉलॉजी जाणत होता.

२) १९९७ च्या डायना हेडेन या मिस युनिव्हर्स बाबतीत विधान

२०१८ मध्येच ‘प्रजना भवन’ याठिकाणी हँडलूम आणि हॅण्डिक्राफ्ट संदर्भात एका कार्यक्रमाला संबोधताना त्यांनी ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाली याचं कौतुक केलं होतं. मात्र डायना हेडेन ही भारतीय वंशाची महिला मिस युनिव्हर्स कशी झाली, हे मला समजत नाही, असं ते म्हणाले होते. ना तिच्याकडे रंग आहे ना रूप, तरी तिला हा किताब दिला असं ते म्हणाले होते. भारतीय महिलेने लक्ष्मी आणि सरस्वती सारखं दिसावं, असं त्यांचं म्हणणं होतं.

३) ‘सिव्हिल सर्व्हिस एक्झॅम’ फक्त सिव्हिल इंजिनिअर्सनंच द्यावी

नागरी सेवा दिनानिमित्तच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी “मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘सिव्हिल सर्व्हिस’ परीक्षा देऊ नये, फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांनीच ती द्यावी” असं म्हटलं होतं. यामागे त्यांचं कारण होतं की, सोसायटीने प्रगती करणं गरजेचं आहे आणि याच ज्ञान फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना असतं असं त्यांचं म्हणणं होतं.

४) त्रिपुराचे शिक्षित युवक हे पान टपरी आणि गाय सांभाळून श्रीमंत होऊ शकतात

डिग्री झालेल्या आणि चांगलं शिक्षण घेतलेल्या तरुणांनी सरकारी नोरकी मिळावी म्हणून नेत्यांच्या मागे फिरण्याची गरज नाही. त्यांना श्रीमंत व्हायचं असेल तर त्यांनी पान टपरी उघडावी. त्यांना ५ लाख मिळतील. तर त्यांनी गाय घेऊन दुधाचा बिजनेस केला तर १० लाख आरामात मिळतील असं त्यांचं म्हणणं होतं.

५) ऑक्सिजनसाठी प्रत्येक कुटुंबाने बदकं पाळावीत. 

कारण “जेव्हा बदके पाण्यात पोहतात तेव्हा पाण्यात ऑक्सिजनची पातळी आपोआप वाढते”. म्हणून देब म्हणाले की, ज्यांची घरे पाणवठ्यांजवळ आहेत अशा गावकऱ्यांना ५०,००० बदकांची पिल्ले वाटप करण्याची सरकारची योजना आहे.

६) रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचं नोबेल प्राईज परत केलं होतं

उदयपूरमध्ये  रवींद्रनाथांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी असं देखील स्टेटमेंट केलं होतं की, जालियानवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेलं नोबेल प्राईज ब्रिटिशांना परत दिलं होतं. हे ते कोणत्या आधारावर बोललेले हे त्यांनाच माहिती, मात्र सत्य तर असं आहे की १९१३ टागोरांना गीतांजली या ग्रंथासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी तो परत केला नव्हता तर १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी नाइटहूड स्वीकारण्यास नकार दिला.

७) पंजाबी आणि जाट लोकांना मर्यादित बुद्धी असते

२०२० मध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले होते की, पंजाबी लोकांकडे ताकद असते मात्र त्यांच्याकडे बुद्धी कमी असते. तर जाट लोकांच्या ताकदीला तोड नसतो मात्र त्यांच्याकडे देखील मर्यादित बुद्धिमत्ता असते.

अशाप्रकारे एक ना अनेक कारणांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री नेहमीच वादात आणि हास्याचा विषय म्हणून राहिले आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी माफी देखील मागितली नसल्याने त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना अनेक अडचणी येत होत्या. अशा नेतृत्वाने हानीच होईल, असं त्यांचं म्हणणं होतं.

आता मात्र त्रिपुराला नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत, तेव्हा त्यांचा कार्यकाळ कसा राहील, हे तर येणारा काळच सांगेल.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.