प्रचारसभा नाहीत म्हणून काय झालं, युपीत आता ‘भोजपुरी सॉंग वॉर’ सुरु झालंय
प्रश्न – उत्तर, उत्तर – प्रतिउत्तर, असा खेळ रोजच कुठेना कुठे चालत असल्याचं आपण बघतो. राजकारण्यांच्या एका टोल्याला किंवा वक्तव्याला दुसऱ्या एखाद्या राजकारण्यांचं उत्तर हा तर सगळ्यांच्याच स्वारस्याचा विषय झाला आहे. अगदी एखाद्या गाण्याच्या मेल व्हर्जनला फिमेल गाण्याचं मिळणारं उत्तर, असंही सोशल मीडियावर आपण बघतो. सध्या अशाच एका गाण्याला प्रतिउत्तर देणारं गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
हे गाणं व्हायरल होण्यामागे एक मुख्य कारण म्हणजे भारतातील बहुतांश लोकांच्या आवडीचा विषय यात आहे. तो म्हणजे युपी, उत्तर प्रदेश.
युपीमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच निवडणुकांच्या या खेळात आता भोजपुरी स्टाईलमध्ये एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. झालंय असं की, नुकतंच रवी किशननं योगी सरकारच्या स्तुतीत एक भोजपुरी गाणं सोशल मीडियावर रिलीज केलं होतं. आता त्या गाण्याचं उत्तरही भोजपुरी शैलीत देण्यात आलं आहे. भोजपुरी सिंगर नेहा सिंह राठौर यांनी हे गाणं गायलं आहे.
रवी किशन यांच्या गाण्याचं नाव होतं ‘यूपी में सब बा’. त्या एका गाण्याच्या माध्यमातून त्यांनी यूपीच्या भाजप सरकारचं अक्खं रिपोर्ट कार्ड लोकांसमोर ठेवलं होतं. पण आता या गाण्याला प्रतिउत्तर आलं आहे. ‘यूपी में का बा’ असं या गाण्याचं नाव आहे. आणि या गाण्याच्या माध्यमातून योगी सरकारवर धारदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
हे गाणं गाणाऱ्या नेहा सिंह राठौर आहेत कोण?
राजकीय गाण्याला राजकीय उत्तर देणाऱ्या नेहा सिंग राठौर या कोणीही राजकीय व्यक्ती नाहीये. त्या भोजपुरी गायिका असून सध्या त्यांच्या गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलीच हवा केलेली आहे. २०२० मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नेहा यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्या अनेकदा सामाजिक-राजकीय विषयांवर गाणी रचत असतात. त्यांचे यूट्यूब चॅनेलवर २.८६ लाख सब्सक्राइबर आहेत तर फेसबुकवर ३.६७ लाख फॉलोअर्स आहेत. या गाण्याच्या व्हायरल झाल्याने त्यांची फॉलोअर्स लिस्ट अजूनच वाढत आहे.
रवी किशन यांचं गाणं आल्यानंतर नेहा यांनी मनोज बाजपेयीच्या ‘बिहार में का बा’ या गाण्याच्या धर्तीवर ‘यूपी में का बा’ हे गाणे रिलीज केलं आहे. आणि सध्या सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच पसंत केलं जात आहे.
रवी किशन यांच्या गाण्यात यूपी सरकारच्या गोरखपूर एम्स, पूर्वांचल एक्सप्रेस वे, गरिबांना रेशन यासारख्या योजनांचा उल्लेख करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना नेहा याच्या गाण्यात कोरोनाच्या काळातील गैरव्यवस्थापनाचा उल्लेख असून लखीमपूर हिंसाचार आणि भाजपच्या मंदिर राजकारणाची चर्चा करण्यात आली आहे.
‘यूपी में का बा’ गाणं रिलीज होण्याच्या काही तासांपूर्वी नेहानं ट्विटरवर एक पोस्ट देखील लिहिली होती. “प्रश्न त्यांनाच विचारल्या जातील जे खुर्चीवर बसलेले आहेत. टीका त्याच्यावरंच होईल जे सत्तेत आहेत. जर तुम्ही प्रश्न विचारणार नाही तर मग आपल्या नेत्यावर आणि सत्ताधारी अधिकाऱ्यांवर आपलं नियंत्रण राहणार नाही. आपण सगळे शेळ्या – मेंढ्यांसारखे हाकलले जाऊ”,असं त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं.
नेहा यांच्या या गाण्यानं महाराष्ट्राच्याही राजकीय दुनियेत खळबळ उडवून दिली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी नेहा यांचं गाणं ट्विट केलं आहे. नवाब मलिक यांच्याशिवाय काँग्रेसचे सुरेंद्र राजपूत, आरजेडीचे अरुण कुमार यादव यांनीही हे गाणं शेअर केलं आहे. विरोधी पक्षाकडून याला पसंती तर मिळतंच आहे पण सोशलं मीडियावरही अनेक तरुण याला हमखास शेअर करताना दिसताय. या गाण्याच्या माध्यमातून योगी सरकारला ट्रोल केलं जातंय.
एक मात्र नक्की, यंदाच्या युपीच्या राजकारणाला भोजपुरी गाण्यांचा मिळणारा ठेका सगळ्यांच्याच लक्षात राहणार आहे. हे ‘सॉंग वॉर’ कुठपर्यंत जातंय आणि कोणतं नवीन वळण घेईल, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.
हे ही वाच भिडू :
- खेसारी लालने सानियावर गाणं गायलं आणि त्याला जेलची शिक्षा भोगावी लागली
- या भिडूने टाईमपासमध्ये गाडीत बसून गाणं बनवलं आणि आज तेच गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंड करतंय
- काँग्रेस नेता हाताशी धरून अखिलेश यादव युपीमध्ये जाट-मुस्लिम कॉम्बिनेशन बनवू पाहत आहेत
- योगींनी जाहीर केलेल्या गंगा एक्स्प्रेवेमुळे युपीच्या १२ जिल्ह्यांच चित्र पालटलं जाणार आहे