खुद्द सरकार सांगतंय,” भारतात पुन्हा एकदा लोडशेडिंग सुरु होऊ शकत !”
जगभरात ड्रग्ज सोडून खूप सारे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे आजकाल कोणाला कळेनासच झालंय. भारतात पेट्रोल वाढलंय, डिझेल वाढलंय, घरगुती गॅस सिलेंडर वाढलाय. सगळीकडं कसा नुसता दरांचा भस्मासुर वाढलाय. हे कमीच आहे सोडा.
आता तर वीज पण महागणार आहे. नाहीतर मग ९०च्या काळात कसं लोडशेडिंग होतं, तशी अवस्था होण्याची शक्यता आहे.
आता हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात होतंय. युरोपमध्ये विजेचे दर वाढू लागलेत. चीनने वीज कंपन्यांना देशाची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच चीनमध्ये विजेच्या वापरावर निर्बंध लादण्यात आलेत.
तर दुसरीकडे, इंग्लंड मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या कमतरतेमुळे लोक चिंतेत आहेत. येथील 90% पेट्रोल पंप कोरडे झाले आहेत. भारतातही पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाच्या किंमती जगभरात वाढत आहेत.
अस अचानक सगळ्या जगाला काय झालंय ? वीज नाही तेल नाही. अचानक असा तुटवडा का निर्माण झालायं ?
तर सुरुवात आपण आपल्या घरापासून म्हणजे भारतापासून करूया. का वीज महागणार आहे ?
कोरोनाच्या काळात जे उद्योग धंदे बंद होते ते दुसऱ्या लाटेत धडाडीने सुरु झाले. त्यामुळं औद्योगिक क्षेत्रात विजेची मागणी वाढली. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर विक्रमी पातळीवर वाढलेत. तर दुसरीकडे देशात कोळशाच्या किंमती खूप कमी आहेत.
याच फरकामुळे आयातीच्या अडचणी वाढल्यात. देशातील कोळसा उत्पादनात ८० टक्के वाटा असलेल्या कोल इंडियाचे म्हणण आहे की,
जागतिक कोळशाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आपल्याला देशांतर्गत कोळसा उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. मागणी आणि पुरवठा यातील दरीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकदम विस्ताराने आणि आकड्यात बघायचं झालं तर,
देशातल्या वीज क्षेत्रात कोळशावर तयार होणाऱ्या वीज प्रकल्पांचा वाटा ७० टक्के आहे. रॉयटर्स या जागतिक वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, २९ सप्टेंबरला देशातील १३५ कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांपैकी १६ प्रकल्पांचा कोळसा प्लांट्सचा साठा संपला होता. अर्ध्याहून अधिक प्लांट्समध्ये ३ दिवसांपेक्षा कमी स्टॉक शिल्लक होता, तर ८०% प्लांट्समध्ये एका आठवड्यापेक्षा कमी स्टॉक शिल्लक आहे.
आता चिन्यांचं बघूया, त्यांना वीज का कमी पडते आहे ते ?
फक्त भारतच नाही तर चीन पण सर्वात जास्त वीज कोळशापासूनच तयार करतं. पण सध्या बीजिंगच्या कोळसा खाणींमध्ये सुरक्षा तपासणी सुरू आहे. आणि यामुळे तिथलं कोळशाच उत्पादन बंद आहे. साहजिकच कोळशाच्या कमतरतेमुळे विजेच उत्पादन पण कमी झालयं.
कोळशाचे उत्पादन कमी झाल्यामुळं स्थानिक औष्णिक कोळशाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. औष्णिक कोळशाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे अनेक वीजनिर्मिती केंद्रे बंद करावी लागली. यामुळे येथे विजेचे संकट उभं राहिलं आहे.
युरोपीमधलं विजेचे संकट काय आहे ?
युरोपियन युनियनच्या देशांमध्ये मागच्या काही आठवड्यांमध्ये वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्पेनमध्ये तर वीजेचे दर तिप्पट झालेत. युरोपमधील या वीज संकटामागे बरीच स्थानिक कारणं आहेत. यात मग नैसर्गिक वायू साठा आणि परदेशी शिपमेंटमध्ये घट, तसेच देशातील सौर शेती आणि पवनचक्क्यांमधून कमी झालेल उत्पादन यांचा समावेश आहे.
आता हे संकट टळावं म्हणून स्पेन, इटली, ग्रीस, ब्रिटनसह सर्व युरोपियन देश वेगवेगळे उपाय करत आहेत. यामध्ये सबसिडी देण्यापासून किंमतींवर अप्पर कॅप लावण्यापर्यंतच्या उपायांचा समावेश आहे. जेणेकरून लोकांच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील
पण सध्या तरी दर काही कमी नाहीत. विजेचे दर असेच राहिले तर युरोपमध्ये येणाऱ्या हिवाळ्यात लोकांचं जगणं खूप कठीण होऊ शकतं. कारण हिवाळ्यात विजेची मागणी सर्वाधिक असते. लोकांना त्यांच घर उबदार ठेवण्यासाठी विजेची गरज असते.
आता मागे तर अशी बातमी होती की, यूकेमधील ९०% पेट्रोल पंपांवर तेल संपलयं.
गेल्या काही दिवसांपासून इंग्लंड मध्ये पेट्रोलचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांच्या अफवांमुळे, तिथल्या लोकांनी घाबरून पट्रोल खरेदीला सुरूवात केली. परिस्थिती एवढी गंभीर बनली कि, देशातील ९०% पेट्रोल पंपांना ‘तेल संपलय’ असा बोर्ड लावावा लागला. पेट्रोल पंपावर तर हाणामारीची स्थिती निर्माण झाली.
पण नंतर काही बातम्या आल्या, त्या पण खऱ्या खऱ्या..
यूकेमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची कमतरता नाही. पण तरी पण अशी परिस्थिती ओढवली कारण तिथं असणाऱ्या ट्रकवाल्यांची कमतरता. हे ट्रकवाले पेट्रोलियम उत्पादने रिफायनरी ते किरकोळ विक्रेत्यापर्यंत नेतात. पण कोरोनामुळे ट्रक चालकांचं प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण स्थगित केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली.
थोडक्यात काय तर सगळीकडेच पेट्रोल, डिझेल, वीज महागलंय. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे त्यामुळे येणाऱ्या लोडशेडींगला सगळ्यांनी तयार राहावं.
हे हि वाच भिडू
- भले जीएसटीमुळे पेट्रोल ७५ रुपयांना मिळेल, पण अजित पवारांचा विरोध आहे.
- आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय?
- आत्ता पेट्रोल दरवाढीमुळे परंतू 2002 मध्ये पेट्रोल पंप घोटाळ्यामुळे भाजप अडचणीत आले होते.