अन् कोका कोलाला अस्सल भारतीय ‘थम्स अप’ विकत घ्यावं लागलं.

गोष्ट आहे 1977 सालची. भारतात नुकताच सत्ताबदल झाला होता. आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींचा पराभव करून जनतेने जनता पार्टी सरकार निवडून आले होते.

मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली विरोध पक्ष एकत्र येऊन बनलेलं हे सरकार आर्थिक धोरणांच्या बाबतीत समाजवादी पगड्याचं होतं.

विशेषतः अमेरीकन कंपन्यांवर त्यांनी अनेक निर्बंध  लादले.

याचाच परिणाम भारतातून आयबीएम सारखी आयटी कंपनी आणि कोकाकोला ही सॉफ्ट ड्रिंक वाली कंपनी देश सोडून निघून गेली.

कोकाकोला हा जगातला सर्वात मोठा ब्रँड होता. नुकताच भारताला या सॉफ्ट ड्रिंक ची सवय लागत होती.  दिल्ली मुंबईसारख्या महानगरातले तरुण कोकच्या बॉटल घेऊन पिताना दिसत होते.

कोक त्यांच्यासाठी स्टाईल स्टेटमेंट होता.

पण कोकच्या जाण्याने भारतात सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.

तरुणांच्यात नाराजी निर्माण झाली. कोकाकोलाला वाटत होते की भारतीय सरकार नाक घासत त्यांना परत बोलवेल पण तसं घडलं नाही.

अनेक भारतीय उद्योजक कोक ची जागा भरून काढण्यासाठी धडपडत होते. यात आघाडीवर होते कॅम्पा कोला, किंगफिशरवाल्या युबी ग्रुपची मॅकडोवेल क्रश.

खुद्द मोररजींच्या जनता सरकारने डबल सेवन नावाचे एक कोल्ड्रिंक लॉन्च केले होत.

पण कॅम्पा कोला वगळता हे सगळे प्रयोग प्रचंड फसले. अशातच ग्लुको बिस्कीट बनवणाऱ्या पार्ले कंपनीने आपला कोल्ड्रिंक लॉन्च केलं, त्याच नाव होतं

“THUBS UP”

मुंबईतल्या चौहान बंधूच्या पार्लेने बिस्कीट आणि चॉकलेट क्षेत्रात अक्षरशः मोनोपॉली बनवली होती. त्यांचे लिम्का आणि गोल्ड स्पॉट सारखे कोल्ड्रिंक्स मार्केट मध्ये होते. त्यांचा बऱ्यापैकी खप देखील होत होता.

याच अनुभवाच्या जोरावर पार्लेच्या रमेश चौहान यांनी कोक सारखे कोल्ड्रिंक बनवण्याचा घाट घातला.

ते स्वतः वेगवेगळे प्रयोग करून हे कोल्ड्रिंक बनवत होते. हे कोल्ड्रिंक बनवण्यासाठी कोलानटचा अर्क आफ्रिकेतील देशातून आयात करावा लागणार होता, जे की परवडणारं नव्हतं.

रमेश चौहान यांनी त्याच्या ऐवजी चहाचा अर्क वापरला

सर्वसामान्य भारतीयांना देखील त्याची चव आवडायला हवी यासाठी त्यांनी दालचिनी, वेलची आणि जायफळ हे कोल्ड्रिंक मध्ये वापरलं.

याचाच परिणाम हे कोल्ड्रिंक थोडंस तिखट बनलं.

पार्लेवाल्यांनी मुद्दामहून आपलं कोल्ड्रिंक फिझी ठेवलं होतं, त्यामुळे दूरवरच्या खेडेगावात जिथे फ्रीज नाही अशा दुकानातही हे विक्रीला ठेवणे शक्य होत.

ऑल द बेस्ट म्हणताना आपण अंगठा वर करतो तोच अंगठा या कोल्ड्रिंकचा लोगो होता. भारतीयांना उच्चाराला सोपं जावं म्हणून नावातला b देखील कमी केला. तसही इंग्लिश उच्चारात b सायलंट होता.

नवीन नाव होतं थम्स अप.

रमेश चौहान यांची आयडिया क्लिक झाली. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातही तरुणाईत थम्स अप आवडू लागलं. देशभरातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक दुकानात थम्स अप दिसू लागले.

नुकताच भारतात रंगीत टीव्हीचे आगमन झाले होते. पार्लेने थम्स अपची जाहिरात आक्रमकपणे केली. त्यासाठी त्यांनी तब्बल 20 लाख रुपये खर्च केले जी त्याकाळच्या मानाने मोठी रक्कम होती.

रमेश चौहान यांनी तरुणांना डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंना जाहिरातीसाठी करारबद्ध केलं.

thums up cricket ad

पाकिस्तानचा इम्रान खान आणि भारताचा सुनील गावस्कर थम्स ची ऍड करताना दिसू लागले.

अशोक कुरियन नावाच्या ऍड गुरूने थम्स अपची happy days are here again ही टॅग लाईन बदलली. नवीन टॅग लाईन होती,

“Thums Up, taste the thunder”

खरोखर भारतात थम्स अपच एक नवीन वादळ आलं होतं.

थम्सची इमेजच यामुळे बदलली. थम्स अप एक टफ रांगड  कोल्ड्रिंक म्हणून ओळखल जाऊ लागलं. एवढंच काय महाराष्ट्रातील मनमाड येथील एका डोंगराच्या सुळक्याला आपल्या आकारामुळे थम्स अप नाव पडलं.

बाकीचे कोल्ड्रिंक थम्स अपच्या वादळात वाहून गेले. बाकीच्यांच सोडा खुद्द पार्लेच्या लिम्का, गोल्ड स्पॉटला सुद्धा थम्सचा फटका बसला होता.

भारतात तरी सॉफ्ट ड्रिंकच दुसरं नाव थम्स अप अस पडलं होतं.

साधारण 1985 नंतर चा काळ. भारतात राजीव गांधींच्या रुपात तरुण पंतप्रधान मिळाला होता. कॉम्प्युटर्सची स्वप्न दाखवणारे राजीव गांधी भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याच्या दिशेने पावलं टाकत होते.

याच काळात जगातली कोकाकोलाच्या खालोखालची दोन नंबरची कोल्ड्रिंक्स बनवणारी कंपनी पेप्सी भारतात आली. शेती विषयक रिसर्च सेंटर बनवण्याच्या नावाखाली पेप्सीने भारतात प्रवेश केला.

पेप्सीवरून प्रचंड वाद झाले, संसदेपर्यंत याची चर्चा झाली.

अखेर होय नाही करत 1988 साली पेप्सीने भारतात कोल्ड्रिंक विकायला सुरवात केली. पेप्सीने क्रिकेटर असो की फिल्म स्टार भारतातले सर्वात मोठे सेलिब्रिटी जाहिराती साठी करारबद्ध केले.

अजूनही तेव्हाची मिस वर्ल्ड ऐश्वर्या आणि आमिर खान यांची किंवा सचिन अझरुद्दीनची जाहिरात अनेकांना आठवत असेल.

या पेप्सीचा ऍडस तुफान फेमस झाल्या पण भारतात पेप्सीची चॉईस राईट ठरलीच नाही.

 

अतिआत्मविश्वासात भारतात आलेल्या पेप्सीचा भारतीयांनी पोपट केला होता, त्यांनी थम्स अपलाच पसंती दिली होती.

पेप्सीचे रोज लाखोंचे नुकसान होत होते. याच दरम्यान नरसिंह राव यांच्या सरकारातील मनमोहन सिंग या अर्थमंत्र्यांनी  अर्थव्यवस्था खुली केली होती. अनेक परदेशी कंपन्या भारतात परतत होत्या.

1977 साली अपमानित होऊन भारतातून निघून गेलेली कोकाकोला कंपनी भारतात परतली.

कोका कोला आणि पेप्सीची जगभरातली भांडणं फेमस होतीच पण भारतात या दोघांच्या पेक्षाही  थम्स अपच्या रूपाने एक मोठा ब्रँड अस्तित्वात होता.

कोकने ओळखलं की भारतात तरी थम्स अपशी स्पर्धा करणे आपल्याला शक्य नाही. मग त्यांच्या पुढे एकमेव पर्याय उरला, थम्स अप विकत घेणे.

कोककडे प्रचंड पैसा होता, जगातल्या अनेक देशाच्या बजेट पेक्षाही जास्त उलाढाल ते करत होते.

सामदाम दंड भेद वापरण्याची त्यांची तयारी होती. दोन मोठ्या हत्तींच्या भांडणात आपण चिरडले जाणार हे रमेश चौहान यांनी ओळखले.

अखेर मनावर दगड ठेवून त्यांनी कोकाकोलाला थम्स अप विकण्याचा निर्णय घेतला.

हा व्यवहार नेमका किती रुपयात झाला हे आजही कोणाला नक्की माहीत नाही पण त्याकाळी जगातल्या सर्वात मोठ्या डीलपैकी एक अस याच वर्णन करता येईल.

coke parle agreement1

अंदाजे 60 मिलियन डॉलर्स ला थम्स ची विक्री झाली असावी असा कयास आहे.

कोकाकोलावाले महाहुशार होते. त्यांनी रमेश चौहान यांच्या चवीच्या फॉर्म्युल्यात कोणतीही छेडछाड केली नाही.

कोकने थम्स अपला पेप्सीच्या स्पर्धेत उतरवलं.

सलमान खान, अक्षय कुमार, रणवीर सिंग यांच्या स्टंट वाल्या थम्स अपच्या जाहिराती आजही भारतीयांना आज कुछ तुफानी करते है म्हणायला भाग पाडत आहेत.

images

थम्स अप पिणारा व्यक्ती इतर कोल्ड्रिंक्स कडे एखाद्या सरबत सोड्या पेक्षा जास्त किंमत देत नाही. ते काही का असेना अस्सल स्वदेशी थम्स अपची जागा कोणीही घेऊ शकत नाही हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.