आचारसंहितेच्या काळात लग्न करत असताना घ्यावयाची काळजी.

आहा, लोकांच्या भावनेला हात घालावा तर तो बोलभिडूनेच. बाकी कुणाचं काम नाही. उन्हातान्हाचा लग्नाचा विषय काढला आणि कुणीतरी हळूच फुंकर मारल्यासारखं वाटलं. तुळशीचं लग्न झाल्या झाल्या लग्नाच्या मौसमानं वेग पकडला. निवडणुका येतील म्हणून अनेकांनी लवकर आपटलं. यात अंबानी साहेबांनी देखील पोरगीचं उरकून घेतलं.

पण आपल्यासारखे पोह्यात मीठच कमी होतं पासून, पप्पा पुण्यात फ्लॅट पाहीजे तो पण स्वत:चा. म्हणणाऱ्या अनेकांचा अनुशेष राहिला. आत्ता आचारसंहितेच्या ऐन टायमाला एखादा प्लॅटवाला सापडला असेल. हा गेला तर परत बसा बोंबलत म्हणून प्रत्येकानं गडबड केली असेल आणि असाच अलगत क्षण शोधून एखादा शासकिय कर्मचारी तुमच्या कानात पुडी सोडून गेला असेल, आचारसंहिता आहे हो. जरा जपून. 

मग वधु पक्ष, वर पक्ष यांच्यासह इतर मध्यस्थी मित्रमंडळाच्या चेहऱ्यावर नेमका प्रश्न आला असेल की आचारसंहितेत लग्न करायचं पण अवघड असतय का? आणि काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं. तर अशा प्रश्नचिन्हासाठी सुबक हप्यामध्ये आम्ही कंटेंट आणला आहे. हा वाचा आणि लग्नाच्या तयारीला लागा. 

लग्नपत्रिकेत काड्या केल्या तर चालतील का? 

सध्या मार्केटमध्ये प्रेमी लोकांचा ऊत आला आहे. मोदी भक्त, साहेब भक्त, फक्त ह्यो, फक्त त्यो टाईप प्रत्येक बाजूच्या हार्डकोर इसमास यत्र तत्र सर्वत्र राजकारण दिसत आहे. लग्नासाठी शे पाचशे- हजार लोकं येणार म्हणल्यानंतर अशा लोकांना त्यांच्यामध्ये मतदार दिसत असतात. मग हे लोकं काय करतात पत्रिकेत यंदा अमक्या ढमक्या दादा, काका, मामा, साहेब यांना मतदान करण्याची छापील गळ घालतात.

स्वत:कडे मुद्दे नसणारे समोरचा अमका ढमका किती वाईट आहे हे देखील छापीलमध्ये सांगतात. इतर वेळी असा प्रकार ठिक असतो. पण आचारसंहितेच्या काळात असला अगावूपणा नडू शकतो. पक्षाचं चिन्ह, उमेदवाराचा फोटो लग्नपत्रिकेवर छापलात तर बिनकामाचं घोळ होवू शकतो. म्हणजे यावर काय होवू शकतं ते कलेक्टर साहेब तुम्हाला वेगवेगळ्या कलमांखाली सांगू शकतातच पण आपण असा छापील उद्योग करणं टाळावं इतकच. 

लग्न कुठे घ्यायचं, कस घ्यायचं? 

लग्न कुठे घ्यायचं याचं त्रिकालबाधीत उत्तर म्हणजे तुम्ही मुलीकडे असलात तर पोराकडे लग्न ढकलायचं असतं आणि पोराकडे असलात तर पोरीकडे लग्न ढकलायचं असत. महागाई वाढलेय हल्ली परवडत नाही. असो पण इथ मुद्दा वेगळा आहे. म्हणजे शासकिय मैदान, गावाचा चौक, घरापुढं जोरात वगैरे ठिकाणी घेतलं तर चालेल का? 

तर लक्षात ठेवा घेतलेलं चालतं. पण कस असत १० वी, १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षेला जसं भरारी पथक असतं तसच आचारसंहितेच असत. ते मोक्याच्या क्षणी येवून तुम्हाला वेगवेगळ्या नियमांची फाईल दाखवू शकतात. बर हि गोष्ट देखील कलेक्टरच्या स्वविवेकावर आधारित असते. म्हणून काय करायचं की, थेट मंगलकार्यालयात लग्न घ्यायचं. कसय या मोसमात टेन्शन नको. 

आमदार, खासदार, भावी आमदार, भावी खासदार, युवा नेते यांना लग्नात बोलवलं तर चालत का? 

बोलवा की, आपल्याकडे फक्त लग्न आणि मयतं करुन आमदार खासदार होणारे लोकं पोत्यानं आहेत. ते पण तयारीतच असतेत. त्यात या प्रचाराच्या काळात तर हात धूवून येतील. फक्त लग्नात येवून भाषण ठोकलं तर गोत्यात याल. म्हणजे अशा वेळी तो उमेदवार गोत्यात येवू शकतो पण कुणाचं लग्न म्हणून साक्षीदार टाईप तुम्हाला कोर्टाच्या कचेरीपासून ते व्हॉटसएपच्या ग्रुपवरच्या चर्चेत सहभागी व्हायला लागलं तर उगीच कामांचा लोड येवू शकतो. तसही उमेदवार शहाणे असतात. पण कधी कुणाला काय वाटेल ते सांगता देखील येत नाही.

सो सरळ सांगायचं, घरचं लग्न आहे एक वाटी मट्टा प्या शांत रहा पण राजकिय भाषणबाजी करू नका. आत्ता तुम्ही म्हणाल, लग्नात कोण भाषण करत का? तर कार्यकर्त्यांनो आपल्याकडं अशा लोकप्रतिनिधींची अजिबात कमतरता नाही याची जाणिव ठेवत चला. 

लग्नाच्या मिरवणुका डॉल्बी लावून काढायच्या होत्या, चालेल का? 

कशाला तो डॉल्बी. आपल्या पोरानं लग्न करून असे काय दिवे लावलेत. वास्तविक हा मुळ प्रश्न आहे तरिही आपणाला आनंद साजरा करायचा असेलच आणि त्यासाठी डॉल्बीची नितांत आवश्यकता असेल तर एकदा विचार करा. एकतर कस आहे डॉल्बीला पोलीस परवानगी देत नाहीत. आणि आचारसंहितेत अशी गावभर मिरवणुक काढायला परवानगी घ्यावी लागते. आत्ता ती उमेदवाराने घ्यावी लागत असली तरी आपणाला हि गावभर काढण्यात येणारी खाजगी मिरवणुक आहे हे तरी सांगण्याचे किमान कष्ट घ्यावे लागतात.

आणि अशा गोष्टींना आचारसंहितेच्या काळात तरी परवानगी मिळत नाही. आत्ता यातूनही मिरवणुक काढणारे द ग्रेट आनंदवीर आपल्यामध्ये असतील. पण लक्षात ठेवा हा प्रकार प्रत्येकजण आपआपल्या जीवावर करत असतो. तुमचा तितका जीव असेल तर आणा डॉल्बी आणि उडवा बार. नाय जमलं तर खावा मार. आमचं काहीच जाणार नाही. 

संपादकीय सल्ले.  

आत्ता थोडक्यात संपादकीय सल्ले. पहिली गोष्ट म्हणजे गाड्या. लग्नाच्या वेळेस तुम्हाला ऐन टाईमाला भाड्याने गाड्या मिळणं अवघड होईल. सगळ्या गाड्या जवळजवळ प्रचारासाठी बुक करुन ठेवलेल्या असतात. त्यामुळे काय करायचं. ओळखीतल्या गाड्यांची जुळणी अगोदरच करुन ठेवायची.

दूसरी गोष्ट आचाऱ्याची. आचारी देखील साहेबांच्या बंगल्यावर बुक असतोय. त्यामुळे योग्य मुहूर्त काढतं आचाऱ्याला इसारत देवून गोड बोलून खेळवत ठेवायचां. साहेब साहेब म्हणून आचाऱ्याला रिस्पेक्ट द्यायचा. आणि सर्वात महत्वाच म्हणजे आपण ज्यांच्या घरची पोरगी करतोय किंवा ज्यांच्या घरात पोरगी देतोय अशा लोकांची पार्टी कुठलीय ते पण अगोदरच खडा टाकून पहायचं. काय होतं ऐन मंडपास साहेब की दादा म्हणून राडे चालू झाले तर बिचाऱ्या पोराचा संसार अर्ध्यावर मोडू शकतो. 

विशेष सुचना : काळजी घ्या. लग्न करा. आहेर देत चला आणि आम्हाला लग्नाला बोलवत चला. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.