हा जो सांताक्लॉज आहे तो “कोका-कोला” कंपनीने जन्माला घातलेला आहे.
दुनियाभरची लहान मुले त्याची वाट पाहतात. ख्रिसमसच्या आदल्या मध्यरात्री नॉर्थ पोलच्या बर्फातून एक शुभ्र दाढीवाला लाल कपड्यामधला गोलमटोल आजोबा रेनडियरच्या रथातून येतो. आपल्या पाठीवर अडकवलेल्या झोळीमधून खेळणी खाऊ असे नाना प्रकारच्या गंमती लहान मुलांना वाटतो अशी अख्यायिका आहे. सगळ्या लहानथोरांमध्ये सांताक्लॉजची हीच प्रतिमा अगदी घट्ट बसली आहे.
असा हा सगळ्यांचा लाडका सांताक्लॉजचा सध्याचा अवतार ही कोकाकोलाच्या जाहिरातीची देन आहे, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर?
इसवीसणाच्या तिसऱ्या शतकात ग्रीसच्या मायरा शहरात सेंट निकोलस म्हणून एक ख्रिश्चन धर्मगुरु होते.
ते लहानमुलांना सिक्रेट गिफ्ट द्यायचे यामुळेच सेंट निक यांची लोकप्रियता खूप होती. यांच्या पुण्यतिथी दिवशी इंग्लंडमध्ये ६ डिसेंबरला फादर ख्रिसमस यांचा फेस्टिवल म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. अमेरिकेमध्ये याच सेंट निकोलस यांना शोर्ट फॉर्म मध्ये सांता क्लॉज म्हणून त्यांचा उत्सव ६ डिसेंबर वरून नाताळच्या दिवशी जोडण्यात आला.
पूर्ण जगभरात या फादर ख्रिसमसची अनेक रूपे होती. याच सेंट निकोलसला काही ठिकाणी लाडाने सेंट निक तर काही ठिकाणी सांताक्लॉज तर काही भाषेत सिंटरक्लास म्हणायचे.
तो तपकिरी रंगाचे कपडे घालायचा.
पण एकोणीसाव्या शतकात न्यूयॉर्कमध्ये एक पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याच नाव होत “ओल्ड सांताक्लोज विथ मच डीलाईट”. आजच्या मॉडर्न सांताक्लॉजच्या आयडिया या पुस्तकातून आल्या. त्याच काळात अमेरिकेत एक सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते, थॉमस नास्ट त्यांनी एका वर्तमानपत्रामध्ये लाल कपड्यातल्या सांताक्लॉजच कार्टून रेखाटल. तसच त्यांनी अमेरिकच्या झेंड्याच्या वेशात आणि हिरव्या वेशात सुद्धा सांता रेखाटला होता.
तरी सुद्धा सांताच्या सध्याच्या रूपाचे श्रेय कोका कोलाला का जाते?
साधारण विसाव्या शतकात नाताळच्या सुट्ट्या आणि गिफ्ट घेऊन येणारा सांताक्लॉज हळूहळू फेमस होत होता. याचा फायदा उठवायचं कोकाकोला कंपनीन ठरवलं. १९३१ साली हॅडॉन सँडब्लोम नावाच्या कलाकारान कोकाकोलाच्या जाहिरातीसाठी सांताक्लॉजची चित्रे काढली. यासाठी त्याने थॉमस नास्टच्या चित्रांचा अभ्यास केला. स्वतःच म्हातार रूप कसं असेल असा विचार करून त्याने सांताक्लॉज बनवला.
कोकाकोलाच्या फेमस लाल रंगाच्या थीम मध्ये सांता बरोबर बसला. लाल फरचे कपडे शुभ्र दाढी पांढऱ्या गोंड्याची लाल टोपी घातलेला होहोहो करून हसणारा सांताक्लॉज ही हॅडॉनची कृपा होती.
कोकाकोलाने आक्रमकपणे जाहिरात केली. हॅडॉनची चित्रे खूप गाजली. लोकांच्या मनात सांताक्लॉजचे रूप ठसून गेले. सांताक्लोजला कोकाकोलाने जास्त फेमस केले आणि कोकाकोला लहान मुलांच्यात सांताक्लॉजच्या जाहिरातीमुळे फेमस झाला.
तिथून पुढे दर हिवाळ्यामध्ये सांताक्लॉज हाच कोकाकोलासाठी ब्रँड अॅम्बेसेडर ठरला. महायुद्धनंतरच्या काळात कोकाकोला बरोबर सांताक्लॉज देखील सगळ्या जगभर पसरला. सांताच्या आख्यायिकादेखील कोक बरोबर चवीने चर्चिल्या गेल्या. जगभरातली लहान मुले सांताक्लॉजच्या नावाने गिफ्ट मिळणार म्हणून गंडविली जाऊ लागली. या सगळ्याची सुरवात कोकाकोलाच्या एका जाहिरातीने झाली.
हे ही वाच भिडू.
- हिटलर नसता, तर तुम्हाला आज फँँटा प्यायला मिळाला नसता.
- पांचजन्य मधून नारा दिला : तुमचा शाहरुख तर आमचा ह्रितिक
- ठंडा मतलब कोका कोला बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का.?