सचिन सावंत यांचं ते ट्विट पडलं अन कर्नल पुरोहित पुन्हा चर्चेत आला

आज सकाळी सकाळी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट केलं अन दोन व्यक्ती चर्चेत आले. एक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे कर्नल प्रसाद पुरोहित. आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस तर कायमच काहींना काही राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असतात. पण आज असं काय नवीन आहे ? आज त्यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण जरा वेगळं आहे. 

त्यासाठी हे ट्विट बघणं महत्वाचं आहे….

हेच ट्विट करत सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या ट्विट मधल्या व्हिडीओमध्ये कोण आहे ???

माहिती काढल्यास समजते कि यात हे कर्नल प्रसाद पुरोहित नावाचे व्यक्ती दिसतायेत ते दुसरे तिसरे कुणी नसून मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी असल्याचे समजतेय. 

मालेगाव बॉम्बस्फोट संपूर्ण देशाला माहिती आहेच. २९ सप्टेंबर २००८ रोजी शुक्रवार होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक लोकं जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सुपूर्द करण्यात आले होते. 

त्यानंतर या प्रकरणात भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर याही आरोपी होत्या.  २००८ मध्ये स्फोटाच्या ठिकाणाहून त्यांच्या नावे असलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्यावर विविध प्रकारचे अत्याचार होत असल्याने आपण कॅन्सरची शिकार झाल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले होते.

प्रज्ञा ठाकूर यांच्याशिवाय या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे असं समोर आलं. याप्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे.

लेफ्टनंट कर्नल पुरोहित कोण आहे ?

लेफ्टनंट कर्नल पुरोहित हे महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबातील असून त्यांचे वडील बँक अधिकारी होते. पुण्यात जन्मलेल्या लेफ्टनंट पुरोहित यांनी शालेय शिक्षण अभिनव विद्यालयातून तर महाविद्यालयीन शिक्षण गरवारे कॉलेजमधून पूर्ण केले.

१९९४ मध्ये, पुरोहित चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून उत्तीर्ण झाल्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते नियुक्त झाले. यानंतर त्यांना जम्मू-काश्मीरला पाठवण्यात आले आणि येथे आजारी पडल्यानंतर त्यांची मेडिकल लेवलमध्ये डाऊनग्रेड करण्यात आले. यानंतर त्यांना येथून मिलिटरी इंटेलिजन्समध्ये हलवण्यात आले. २००२ ते २००५ पर्यंत, पुरोहित लष्कराच्या इंटेलिजेंस फील्ड सिक्युरिटी युनिट MI-२५ शी संबंधित होते आणि जम्मू आणि काश्मीरमधील महत्त्वाच्या दहशतवादविरोधी कारवायांचा एक भाग बनले.

पुरोहित यांना नाशिकमधील देवळाली येथे लायजन युनिट ऑफिसर म्हणून पाठवण्यात आले आणि त्याचवेळी ते निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्या संपर्कात आले. उपाध्यायही या स्फोटातील आरोपी होते. 

पुरोहितवर काय काय आरोप आहेत ?

कर्नल श्रीकांत पुरोहित हे अभिनव भारत नावाच्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. असं सांगितलं जातं कि, कर्नल पुरोहितने तथाकथित हिंदू राष्ट्रासाठी वेगळी राज्यघटना, वेगळा ध्वज बनवला आहे. यासोबतच त्यांनी मुस्लिम अत्याचाराचा बदला घेण्याचीही चर्चा केली. पुरोहितने संघटनेच्या बैठकांना उपस्थित राहून स्फोटके गोळा करण्याचे मान्य केले आणि तोच मालेगाव स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता असं समोर आलेलं.

तसेच पुरोहित यांच्यावर लष्कराकडून ६० किलो आरडीएक्स चोरल्याचा आरोप होता आणि त्यातील काही भाग मालेगाव बॉम्बस्फोटात वापरण्यात आला होता. २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. स्फोटात बांधलेल्या मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार झाले.

पुरोहितला अटक होताच लष्करातील पुजारीविरुद्ध न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आणि त्यानंतर त्याला लष्करातून काढून टाकण्यात आले होते. 

मालेगाव बॉम्बस्फोटा घडली आणि इथून पुढे हिंदू दहशतवादाचा मुद्दा अनेकांनी उचलला. त्यामुळे अजूनही काँग्रेस असो की राष्ट्रवादी यावरून भाजपवर शरसंधान साधायची संधी सोडत नाहीत. आता देखील या ट्विट मधून सावंत यांनी हिंदू दहशतवादाचा मुद्दा समोर केलाय. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. कारण हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कुठला आहे याचे तपशील सावंत यांनी हा ट्विट मध्ये दिलेले नाहीयेत त्यामुळे आता फडणवीस यावर उत्तर देतील कि नाही ते पाहणं महत्वाचं आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.