तेव्हा कॉलेजकुमार विलासरावांच्या “जावा”वर बसायला पोरी तडफडायच्या…

आज मराठवाड्यातली पोरं शिकायला पुण्यात येतात. तशी ती पुर्वीपासून यायची. काहीतरी स्वप्न उराशी धरुन हजारों पोरं पुण्यात आहेत. विलासराव त्यातलेच एक होते. घरात देशमुखी आणि काळ १९६१ चा. तेव्हा विलासराव पुण्यात आलेले. कशाला तर शिक्षणाला. बाभूळगावातल्या जिल्हा परिषद शाळेत आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या शाळेत त्यांच शिक्षण झालं. दयानंद मध्येच त्यांनी कॉलेजला अॅडमिशन घेतलं,

पण वडिलांचा आग्रह पुण्यात जा. पुण्यात जा शिक्षण घे, मोठ्ठा हो. आज देखील मराठवाड्यातल्या मुलांचा जसा “म्हातारं” असतं तसाच त्यांचा बाप होता. ते पुण्यात आले.

पुण्यातल्या गरवारे मध्ये कॉलेज सुरू झालं. लातूरचा देशमुखी इथं गळून पडलेली. अहोजावो ची जागा अरेतुरेनं घेतली. देशमुखी जगलेल्या विलासरावांना ते झेपलं नाही. अशातच निमित्त घडलं ते पानशेतचं धरण फुटण्याचं. विलासरावांनी थेट बाभुळगाव गाठलं. गड्या आपला गाव बरा. प्रत्येकजण शहराला भितो. विलासराव देखील भिलेले. अशा वेळी पुन्हा बाप जागा होतो. महिना दोन महिना गावात राहिले आणि परत स्वारी पुण्यात आली.

विलासराव सांगतात तेव्हाची आठवण म्हणजे पुणे ते बाभुळगाव प्रवास. रात्रीची रेल्वे असायची. कधीकधी प्रचंड थंडी. मेहनत करुन उभा रहायला जागा मिळाली तरी बरं वाटायचं.

गावचा देशमुख आत्ता जमिनीवर यायला लागलेला. पुण्यात विलासरावांनी काय कमवलं अस त्यांना कोणीतरी विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते दोस्त. आपण गावखेड्यातली माणसं पुण्या-मुंबईत येतोच ते मुळी दोस्त कमवायला. विलासरावांनी देखील तेच केलं होतं.

विलासराव गरवारेतून बीएस्सी करत होते. तेव्हा विलासरावांच्या सोबत असायची ती “जावा”.

कर्वेनगरच्या एका हॉस्टेलमध्ये ते रहायचे, पुढे  MES हॉस्टेल आणि त्यानंतरच लॉ कॉलेजचं होस्टेल. विलासराव टप्याटप्याने बदलत गेले. १०-१२ वर्षाच्या पुण्याच्या प्रवासात हा माणूस आतून बाहेरून राजहंस झाला.

जयंत बर्वे, वैद्य, नागनाथ फटाले, प्रा. वर्तक अस त्यांच मित्रमंडळ. जावा आणि ते अस समीकरण होतं. जावावरून ते एकदा थेट हैद्राबादला जावून आले. हक्काच ठिकाण होतं कॅफे पॅराडाईज. तेच जिथं आजही कॉलेजची पोरं शुन्यात गेल्यासारखे जावून बसतात. तेव्हा विलासराव बुलबुल वाजवायचे. SES च्या व्हॉलीबॉल टिममधून खेळायचे. डेक्कन जिमखान्यावर असायचे. पूना कॉफी हाऊसला पडिक असायचे आणि बिनाका गीतमाला ऐकायचे. बापाच्या पैशावर शिकायला आलेल्या पोरानं जे काही करायला हवं ते सगळं त्यांनी केलं.

बीएस्सी झाल्यानंतर देशमुखीचा जोर ओसरू लागलेला. आत्ता विलासरावांना शहरांने ओळख द्यायला सुरवात केली होती. तरिही त्यांची आवडती बुलबुल जवळ असायचीच. विलासरावांनी लॉ कॉलेजला अॅडमीशन घेतलं. तिथेच नोकरी करण्यास सुरवात केली. डेमॉन्स्ट्रेटरची ती नोकरी. तस बघायला गेलं तर नोकरी करुन शिकण्याची गरज नव्हती. तरिही माणसाला शहर कळलेलं. रोज तीन तास नोकरी आणि कॉलेज असा दिवस सुरू व्हायचा. दोन वर्षात कॉलेज संपल.

गोपीनाथराव त्यांच्याबद्दल सांगताना म्हणतात, 

आमच्याकडं तेव्हा काहीच नव्हतं, विलासरावांच्याकडे जावा होती. कित्येकींना घेवून ते फिरायचे. आमच्याकडं काही नव्हतं तरी आमचं जुळलं.

विलासरावांनी लॉ पुर्ण केलं आणि ते अॅड. शिवाजीराव दुर्वें यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करु लागले. दुर्वे वकिल हे फौजदारी संभाळणारे. देशमुखांना फौजदारीचा भलताच अनुभव. झालं अशिलाला घेवून कधी पौंडच्या कोर्टात तर कधी खडकीला.  तारखा घेणं, आरोपीला सोडवणं, जामिन मंजूर करुन घेणं हि सगळी कामं सुरू झाली.

दोन अडीच वर्ष विलासराव प्रॅक्टिस करत राहिले.

कॉलेज सुटलं, वकिली सुरू झाली. गावकऱ्यांच्या नजरेत देशमुखाच्या पोरांन पुण्यात नाव कमावलेलं. आत्ता वेळ होती कायमचं काहीतरी करायची.

वडिलांचा निरोप आला आणि स्वारी पुन्हा बाभूळगावला आली. 

ते साल होतं १९७१ चं. वयाची ऐन उमेदीची वर्ष विलासरावांनी पुण्यात घालवली. जावा वरुन मोक्कार हिंडलेले. पुणे सोडण्याबद्दल ते लिहतात, 

आधी कर्वे रस्त्यावर एके ठिकाणी राहत होतो. मग एमईएसच्या हॉस्टेलवर राहिलो आणि ‘लॉ’ ला असताना तिथल्या हॉस्टेलवर. हॉस्टेलमधल्या वास्तव्याचा परिणाम म्हणून म्हणा किंवा इतर काही, पण मराठवाड्यातल्या ‘बुजरेपणा’ घेऊन आलेला मी हळूहळू सफाईदार पुणेकरच होऊ लागलो होतो.

विलासराव गावाकडं आले. कॉंग्रेसी वातावरणामुळे युथ कॉंग्रेसमध्ये काम करु लागले. ७२ ला दुष्काळ पडला होता. तेव्हा लातूरचे नगराध्यक्ष शिवराज पाटील होते. त्या काळात त्यांच्यावर पहिली जबाबदारी आली ती लातूर दुष्काळ निवारण समितीची. दुष्काळी कामांना भेटी देणं, धान्यवाटप करणं अशी कामे विलासराव करु लागले आणि जनसंपर्क वाढलां. पुण्यात दोस्त कमावरणारे विलासराव गावाकडं गेल्यानंतर देखील दुनियादारी करणारे राहिले.

१९७४ मध्ये बाभूळगावचे सरपंच झाले. पुढे झेडपी मारली. उस्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. आणि ८० सालात थेट आमदार झाले, पुढे राज्यमंत्री, मंत्री आणि थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री….!!! 

काळ बदलला. विलासराव आज हयात नाहीत. त्यांच्यासारखी पोरं मात्र पुण्यात मोक्कार आहेत. अशा गावागावातून पुण्यात आलेल्या पोरांना विलासरावांसारख व्हायला विलासरावच शिकवू शकतील हे मात्र त्यांच्याइतक मनाइतकच खरं.. 

हे हि वाच भिडू. 

सोशल मिडिया संमेलनाच्या निमित्ताने आपण सर्वजण भेटतोय. अधिक माहितीसाठी. 

Leave A Reply

Your email address will not be published.