ते एकमेव सैनिक ठरले ज्यांनी एअर फोर्स, नेव्ही अन् आर्मीतही पराक्रम गाजवला होता…

भारतीय सैन्यात भरती व्हावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही आर्मीत जातात, काही नेव्हीत तर काही एअर फोर्समध्ये जातात. पण डोक्यात कधी असा विचार आलाय का की, एकच जवान या तीनही फोर्समध्ये सहभागी झाला तर कसं राहील.

भिडूंनो तुम्ही म्हणाल हे तर शक्यच नाही. पण शक्य नसेल अशा सुद्धा काही घटना घडतात. आता कर्नल पृथीपाल सिंग गिल यांचंच उदाहरण घ्या ना. कर्नल पृथीपाल यांनी आपल्या सैनिक करियरची सुरुवात एअर फोर्समधून केली. पण लवकरच एअर फोर्स सोडून नेव्हीत दाखल झाले. मात्र नेव्हीत सुद्धा जास्त काळ रमले नाही आणि थेट आर्मीत जॉईन झाले. त्यातच १९६५ चं युद्ध जिंकून रिटायर्ड झाले.

विश्वास बसत नाही ना!! तर चला जाणून घेऊया यामागे नेमका किस्सा काय घडला होता ?…

पृथीपाल सिंग यांचा जन्म ११ डिसेंबर १९२० रोजी पंजाबच्या पटियाला शहरात झाला होता. त्यांनी लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून विमान उडवण्याचं शिक्षण घेतलं. विमान उडवण्यात महारात असलेल्या पृथीपाल यांनी १९४२ सालात घरच्यांना काहीही न सांगता रॉयल इंडियन एअर फोर्स मध्ये पायलट म्हणून सहभागी झाले. फोर्समध्ये त्यांची पहिलीच पोस्टिंग कराची शहरात करण्यात आली होती. 

परंतु त्याच दरम्यान दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळे एअर फोर्सला युद्धात सहभागी होणे गरजेचं होतं. पण लवकरच ही गोष्ट पृथीपाल यांच्या घरच्यांना माहित झाली. हे कळताच घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जर महायुद्धात एअरक्राफ्ट क्रॅश झालं तर आपल्याला आपलं मूल गमवावं लागेल अशी भीती त्यांच्या वडिलांच्या मनात घर करत होती. 

त्यामुळेच त्यांनी आपली ओळख वापरली आणि पृथीपाल यांना एअर फोर्समधून नेव्हीत ट्रान्स्फर केलं. 

वडिलांच्या अनेक प्रयत्नानंतर एकाच वर्षांनंतर १९४३ मध्ये त्यांना इंडियन रॉयल नेव्हीत जॉइनिंग  मिळाली. पण स्वस्थ बसतील ते पृथीपाल कसले. त्यांनी नेव्हीच्या माईन स्वीपिंग शिप आणि आयएनएस मध्ये काम केलं. यासोबतच नेव्हल गनचा मोर्चा सुद्धा सांभाळला. त्यांनी नेव्हीच्या लॉन्ग रेंज गनरिचा सराव सुरु केला. त्यामुळे लवकरच त्यांनी या कोर्समध्ये कमांड मिळवली. 

याच गन चालवण्याच्या कोर्समुळे अवघ्या ८ वर्षात त्यांनी नेव्ही सोडली आणि आर्मीचा मार्ग निवडला.

१९५१ सालात ते आर्मीच्या ३४ फिल्ड आर्टिलरी रेजिमेंटमध्ये दाखल झाले. आर्मीत ते ७१ च्या मिडीयम रेजिमेंटचे कमांडर झाले. कमांडर असतांना त्यांनी १९६५ च्या युद्धात सहभाग घेतला. यात त्यांनी गनर ऑफिसर म्हणून मोर्चा सांभाळला. मोर्चावर तैनात असतांना पाकिस्तानी सैनिकांनी पृथीपाल यांच्यासोबत त्यांच्या साथीदारांच्या गन्सच्या बॅटऱ्या चोरी केल्या. 

जेव्हा याची माहिती पृथीपाल सिंग यांना मिळाली तेव्हा ते थेट पाकिस्तानी सैनिकांच्या छावणीत घुसले आणि गन्सच्या बॅटऱ्या परत आणल्या. त्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानी सैनिकांनी जबरी धूळ चारली. 

कर्नल पृथीसिंग यांनी भलेही इतका मोठा पराक्रम केला असला तरी त्यांनी याची वाच्यता मात्र कधीच केली नाही.  

अगदी त्यांचा मुलगा डॉ अजय पाल सिंग यांना सुद्धा काहीच सांगितलं नाहीय. पण त्यांच्या रेजिमेंटचे इतिहासकार ब्रिगेडियर गखल यांनी कर्नल पृथीपाल यांच्यावर लिहितांना हा सगळा इतिहास उजेडात आणला.

ते लिहितात की, “१९६५ चं युद्ध सुरु असतांना पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय रेजिमेंटच्या चार तोफा वेगळ्या झाल्या आणि पाकिस्तानच्या ताब्यात गेल्या. मात्र कर्नल पृथीपाल यांनी वैयक्तिक रित्या पुढाकार घेतला आणि त्या चार तोफा परत आपल्या ताब्यात घेतल्या. पण त्यांच्या या वीरतेसाठी त्यांना कोणताच पुरस्कार मिळाला नाही.”

पण जरी सरकारने त्यांच्या कामाची दाखल घेतली नसली किंवा त्यांनी स्वतः त्यांच्या कामाची माहिती कुणाला सांगितली नसली. तरी रेजिमेंटचा इतिहास लिहितांना त्यांच्या पराक्रमाचे किस्से आपोआप समोर आले.

कर्नल पृथीपाल सिंह गिल हे भारतीय सैन्याच्या इतिहासातील एकमेव असे सैनिक आहेत ज्यांनी सैन्याच्या तीनही दलांमध्ये सहभाग घेतलाय आणि दुसरं महायुद्ध ते १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात आपलं शौर्य दाखवलंय.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.