कोलंबस होता म्हणून तू आज मावा, गायछाप खावू शकतोस भावा…!

कोलंबस होता म्हणून तू मावा खावू शकतोस भावा. मावा खाता खाता एक मित्र ग्यान देत होता. पुढ तो म्हणाला मावाच काय तर गायछाप, खर्रा आणि सिगरेट हे सगळं कोलंबसमुळे शक्य झालं.

कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावलाय हे माहिती होतं पण मावा, गायछाप सोबत त्याचा काय संबंध. त्यातही आम्ही इतिहासाचे पिक्चर बघितलेत. त्यात किती जूनी जाणती माणसं तंबाखू मळताना दाखवलेत. खरतर तंबाखू ही जूनीच असणार आहे हे फिक्स होतं.

पण डोक्यातला किडा असा शांत होणाऱ्यातला नव्हता. 

डोक्यात आलं की ते शोधायचं आणि बोलभिडूवर लिहायचं हा आत्ता आमचा धंदाच झालाय. मग काय शोधायला चालू केलं. दोन चार जणांना विचारलं तर ते म्हणले असेल बाबा. जो माणूस अमेरिका शोधू शकतो तो काहिही करु शकतो. तरी पण लेखाला पुरावा पाहीजे तोवर काय खरं नसतय भावा.

शोधता शोधता एक पुस्तक घावलं आणि मग लक्षात आलं हे सगळं कांड अस झालय.

प्र.के. घाणेकरांच इतिहास घडवणाऱ्या वनस्पती अस या पुस्तकाचं नाव. 

तर तुम्हाला कोलंबस माहितच असेल. या कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. पण अमेरिकेला तो इंडिया समजला. पुढे अमेरिगो वेस्पुसी इथे आला आणि तो म्हणला हा इंडिया नाही हा वेगळा देश आहे. त्यामुळे अमेरिकेला अमेरिगोचं नाव मिळालं.

आत्ता तुम्ही म्हणाल अमेरिका तर पहिल्यापासूनच होता की शोध लावण्यासारखं काय आहे. तर अमेरिका खंड आहे याची ओळख जगाला नव्हती. तेव्हा जग म्हणजे फक्त युरोप होतं. थोडक्यात युरोपला जे नवीन गोष्ट दिसली त्याचा शोध जगाला लागला अस समीकरण असतय.

आत्ता आपल्या मुद्यावर येवू.

इथं पण असच प्रकरण आहे. म्हणजे काय तर तंबाखू अगोदर पण होतीच पण कोलंबस मुळं ती जगाला कळली. तिथून तंबाखू सिगरेटमध्ये आली, माव्यात आली, खर्यात आली, रिमझिम पानात आली, तपकीरमध्ये आली.

सगळ्या गोष्टीचा एकच घटक तो म्हणजे तंबाखू.

झालं अस की भारताच्या शोधात निघालेला कोलंबस १४९२ साली टोबॅगो बेटावर उतरला. तो बोटीतून बेटावर गेला तर समोर स्थानिक माणसं. ही माणसं झाडाची पानांच्या गुंडाळ्या करुन एका बाजूला आग लावून शिलगावत होती. (थोडक्यात सिगारचा आद्यपुरुष) .

तोंडात धुर ओढून तो बाहेर काढत होती. काहीजण वाळलेल्या पानांची पुडी तोंडात टाकत होते. काहीजण भुकटी करुन नाकात कोंबत होते. म्हणजे आज जे तंबाखूपासून होतं ते सगळं इथली स्थानिक लोकं करत होती.

कोलंबसला कुतूहल वाटलं. साहजिक त्याच्यासोबतच्या मंडळींनी व त्याने या पानांचा आस्वाद घेतला. दारू पिल्यानंतर बसणाऱ्या किकहून कमी असणारी नशा त्याला भारी वाटली. हे जावून लोकांना सांगितलं पाहीजे म्हणून त्याने इतर मसाल्यांप्रमाणे तंबाखूची पाने सोबत घेतली. 

१५५८ पर्यन्त ही टोबॅगो बेटावरून संपुर्ण युरोपात ही पाने पोहचली. पुढे पोर्तुगिज भारतात आले तेव्हा येताना तंबाखू घेवून आले.

याच पोर्तुगिजांनी भारतात शाबुदाणे आणले, यांनीच काजू आणला आणि यांनीच तंबाखूपण आणली.

जीन निकॉट हा पोर्तुगालमधील फ्रान्सचा राजदूत होता. १५६० मध्ये त्याने फ्रान्सला तंबाखूची ओळख करुन दिली. त्याच्या नावावरून निकोटियाना हे वनस्पतीशास्त्रीय नाव प्रख्यात शास्त्रज्ञ लिनिअसने १५६५ मध्ये दिले. टोबॅगो या मूळ बेटावरून निकोटिआना टॅबकम असे नाव प्राप्त झाले. 

धुम्रपान करण्यात यानंतरच्या काळात सुरवात झाली. इतिहास सांगतो,

अतिधुम्रपानामुळे प्रिन्स ऑफ वेल्स सातवा एडवर्ड १९१० साली, पाचवा जॉर्ज १९३६ साली, सहावा जॉर्ज १९५२ साली, आठवा एडवर्ड १९७२ साली जग सोडून गेले. हे सगळे इंग्लडचे राजे. 

इतिहासात आपण वाचतो की इंग्लड सगळ्यांचे बाप निघाले पण पोर्तुगिझ तर आतल्या गाठीचे निघाले अस म्हणता येईल. कारण फक्त तंबाखुचा शोध लावून इंग्लडचे चार राजे ढगात पाठवण्याचं काम या मंडळींनी केलय.

हळुहळु तंबाखू जगभर झाली आणि साहजिक त्यातून मावा, सिगरेट, खर्रा, गायछाप करण्याचे उद्योग आपल्या मंडळींनी केली. तर यापुढे तुम्हाला कोणी विचारलं कोलंबसने काय केलय तर त्याला सांगा,

कोलंबस भावा लय खतरीड माणूस होता…!

टिप : आम्ही व्यसनांचे समर्थन करत नाही. (नियम व अटी लागू) 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.