अडवाणींचा संबंध नाही पण लक्ष्मण यांना कॉमन मॅन सुचला कसा ?

कॉमन मॅन ! आम आदमी. जीवनमरणाची लढाई लढून दमलेला. लोकलने फिरणारा, सरकारी ऑफिसच्या बाहेर उभा असलेला, नेत्यांच्या सभा भाषणांना अप्रूपते हजर राहणारा. त्याची स्वतःची काही मते नसतात, कोणाला त्याच्या मताची किंमत देखील नसते म्हणा पण सगळ्या जगाकडे या कॉमन मॅनच बारीक लक्ष असतं.

याच कॉमन मॅनला पेपरच्या पहिल्या पानावर आणायचं काम केलं सुप्रसिद्ध कार्टूनिस्ट आर के लक्ष्मण यांनी.

२४ ऑक्टोबर १९२१ साली मैसूर येथे आर. के. लक्ष्मण यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव रासिपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण. वडील शाळेत मुख्याध्यापक. मोठा भाऊ आर. के. नारायण एक उत्तम लेखक. त्यांची ‘मालगुडी डेज’ ही कादंबरी लोकप्रिय आहे.

वडील आणि मोठा भाऊ दोघेही प्रतिभावंत असल्याने आर.के.लक्ष्मण यांच्या आयुष्यावर सुद्धा त्यांचा प्रभाव पडला.

वडील मुख्याध्यापक असल्याने त्यांच्या घरी देशी – विदेशी भाषेमधील नियतकालिके येत. आर.के. खूप वेळ त्या मासिकांमधील चित्र पाहण्यात गुंग होऊन जात. आपण सुद्धा अशीच चित्र काढून पाहावी, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.

आर.के. यांना इतके मित्र नव्हते. किंबहुना ते माणसांमध्ये इतके रमायचे नाहीत. पण तरीही प्रत्येक माणसाचं निरीक्षण करण्याचा त्यांचा स्वभाव होता.

कधीही कुठेही कोणत्याही हॉटेलमध्ये जेवायला गेले, तर तिथे सुद्धा त्यांचे डोळे आणि विचार सुरूच राहत असत. आजूबाजूंच्या लोकांची पर्वा न करता ते हॉटेलमधल्या वेटरशी गप्पा मारत. त्याची थट्टामस्करी करत. नानाविध तऱ्हेच्या माणसांशी बोलल्यामुळे त्यांच्या मनात विविध प्रकारच्या माणसांच्या प्रतिमा, त्यांचे स्वभाव असं चित्र तयार होत असे. मनात उमटलेल्या प्रतिमा आर.के. व्यंगचित्रातून उतरवत असत.

प्रत्येक कला ही माणसाला अभिव्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. व्यंगचित्र ही सुद्धा अशीच एक कला. आर. के. लक्ष्मण यांनी या कलेचा वापर करून राजकीय आणि सामजिक परिस्थितीवर ताशेरे ओढले.

पण आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की आर.के.लक्ष्मण यांना कॉमन मॅन सुचले कसं ?

‘कॉमनमॅन’ ची कल्पना कशी सुचली, याची बहारदार हकीकत लक्ष्मण यांनी आत्मचरित्रात सांगितली आहे. व्यंगचित्रात केवळ मंत्री, पुढारीच काढायचे नसतात, तर त्यांची धोरणे, भाषणे, निर्णय याचा परिणाम ज्यांच्यावर होणार ती सामान्य माणसेही दाखवायची असतात. भारतीय माणसं दाखवायची, तर पंजाबी, केरळी, मराठी, गुजराती, मद्रासी अशी कितीतरी काढायला लागायची. त्यामुळे व्यंगचित्र वेळेवर तयार व्हायला उशीर व्हायचा. तेव्हा या माणसांची संख्या लक्ष्मण कमी करू लागले. हळूहळू ही माणसं त्यांनी आणि कमी केली आणि शेवटी एकच उरला.

टक्कल असलेला, फुगीर नाकाचा, आखूड मिशांचा, चष्मेवाला, धोतर व चौकडीचा कोट घातलेला आणि चेहऱ्यावर सतत भांबावून गेल्याचा भाव असलेला, तोच हा ‘कॉमन मॅन’!

अनेक जण म्हणतात तो कॉमन मॅन लालकृष्ण अडवाणींसारखा दिसतो. पण लक्ष्मण सांगतात अडवाणी यांचा या कार्टूनशी काही संबंध नाही. 

कधी हातात छत्री, अंगावर घातलेलं शर्ट वजा कोट, पायामध्ये धोतर, डोळ्यांवर चष्मा, केसाला टक्कल असं कॉमन मॅन चं अस्सल रूप त्यांनी चितारलं. जवळपास ५० वर्ष टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात त्यांचा कॉमन मॅन सभोवतालच्या परिस्थितीवर तिरकस अंगाने भाष्य करत होता.

पुण्यात सिम्बायोसिस या संस्थेत कॉमन मॅनचा पुतळा उभा आहे.  आज आर.के.लक्ष्मण हयात नाहीत पण कॉमन मॅन आजही सर्व सामान्यांच्या मनामनात जिवंत आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.