मोदींची मर्सिडीज मेबॅक आणि बायडेन भाऊंची द बीस्ट, कुणाची गाडी भारी आहे भिडू…

देशात सध्याचा ट्रेंडिंग विषय म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीन मर्सिडीज गाडी. मोदींच्या ताफ्यात नवी कोरी मर्सिडीज मेबॅक आली आणि बातम्यांपासून कट्ट्यांपर्यंत सगळीकडे याचीच चर्चा रंगू लागली. गाडीची किंमत, त्याचे फीचर्स यावरुन चांगल्याच गप्पा रंगतायत.

सकाळी सकाळी आम्ही पण चहाच्या टपरीवर एक चर्चा ऐकली. एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला म्हणला, ‘अरे आपल्या मोदीजींनी १२ कोटींची गाडी घेतली.’ समोरचाची रिऍक्शन लय वाढीव होती. तो म्हणाला, ‘फक्त १२ कोटी? भारताचे पंतप्रधान आहेत राव, किमान ५० कोटींची तरी गाडी पाहिजेच. त्या अमेरिकेच्या प्रेसिडेंट लोकांची गाडी कसली बाप आहे, ती जास्त भारी असणार.’ पहिल्या कार्यकर्त्याला मात्र मोदींवर एकदम प्राऊड होता. तो म्हणाला, ‘नाय नाय मोदीजींचीच गाडी भारी असणार.’

आम्ही विचार केला, की या दोन कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आणखी किती जणांना पडलेला असेल, त्यामुळं आपण विषय क्लिअर करुन टाकावा.

सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीबद्दल. मर्सिडीज मेबॅक एस650 गार्ड ही गाडी नुकतीच नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात दाखल झाली. या गाडीची किंमत आहे १२ कोटी रुपये. या मर्सिडीजची हवा होण्यामागचं कारण ना तिचा रंग आहे, ना तिचा लांबलचक आकार. ही मर्सिडीज हिट ठरली, ती त्यामध्ये असलेल्या सुरक्षेमुळे. या गाडीत दहास्तरीय सुरक्षा आहे. आतापर्यंत उत्पादन झालेल्या गाड्यांपैकी ही सगळ्यात टॉपची सुरक्षा असणारी गाडी आहे, असं म्हणलं जातंय.

या गाडीच्या खिडक्याही काय साध्यासुध्या नाहीत. अगदी एके-47 च्या बुलेट्स आदळल्या तरी काचा फुटू शकत नाहीत. सुरक्षा वाढवण्यासाठी या खिडक्यांवर पॉलिकार्बोनेटचा एक लेअरही लावण्यात आला आहे. समजा गॅस हल्ला झाला, तर लोकं बसली आहेत त्या केबीनमध्ये वेगळा एअर सप्लाय सुरू होतो. चाकं फ्लॅट झाली तरी गाडी सनाट पळू शकते. दोन मीटर अंतरावर १५ किलो टिएनटीचा स्फोट झाला, तरी गाडीत बसणाऱ्यांना काहीही होणार नाही, एवढी या गाडीत पॉवर आहे. हेलिकॉप्टर बनवताना वापरली जाणारी सामुग्री या गाडीचा फ्युएल टॅंक बनवताना वापरण्यात आली आहे. त्यामुळे टॅंकला गोळी लागली आणि भोक पडलं, तरी ते आपोआप सील होऊ शकतं.

गाडी जितकी बाहेरुन तगडी आहे तितकीच आतूनही. गाडीत सेपरेट केबिन करता येतं, लाईव्ह टीव्ही पाहता येतो, जर थकवा आला तर मसाज सीटचीही सोय आहे. गाडीला 6.0 लीटर ट्विन-टर्बो V12 इंजिन  आहे. हे इंजिन ५१६ बीएचपी पॉवर आणि ९०० एनएम टॉर्क जनरेट करतं. गाडीचा टॉप स्पीड आहे १६० किलोमीटर प्रतितास. हे झालं, मोदी यांच्या गाडीबद्दल.

आता बोलुयात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वापरतात त्या द बीस्ट या गाडीबद्दल.

द बीस्ट हे नाव ऐकूनच आपल्या मनात एक प्रतिमा तयार होते. ही गाडी आहेच तशी. द बीस्ट ही खास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वापरासाठी बनवलेली गाडी आहे. या कॅडिलॅक गाडीची किंमत आहे १.१ मिलियन युरोज म्हणजे जवळपास ९ कोटी ३० लाख रुपये. (म्हणजे आपल्या मोदीजींची गाडी जास्त महाग आहे.) पण मेन विषय असा आहे, की अमेरिकन सरकार अशा १० ते १२ गाड्या बनवतं. यातल्या काही गाड्या जेव्हा महत्त्वाचे नेते अमेरिकेत येतात तेव्हा त्यांच्यासाठी वापरल्या जातात. मात्र राष्ट्राध्यक्ष जिथे जातील, तिथे त्यांच्यासाठी बनवलेली ‘द बीस्ट’ असतेच. ही ४ टनांहून अधिक वजनाची गाडी न्यायला सेपरेट विमानही आहे.

या द बीस्टमध्ये काय फीचर्स आहेत?

बीस्टच्या काचा पाच लेअर्सच्या आहेत. त्यामुळे गाडीच्या दरवाजाचं वजन विमानाच्या दरवाजाइतकं आहे. गाडीच्या खिडक्या अर्थातच बुलेटप्रूफ आहेत. गाडीच्या खाली जरी ब्लास्ट झाला, तरी काहीही फरक पडत नाही. गॅस किंवा केमिकल्सच्या हल्ल्यांमधूनही गाडी सुरक्षित राहू शकते. समजा कुणी आगाऊपणा करुन गाडीचं चाक उघडायचा प्रयत्न केला, तर त्याला इलेक्ट्रिक शॉक देता येऊ शकतो. ही गाडी फक्त १५ सेकंदामध्ये ६० मैल प्रतितास असा वेग पकडू शकते.

गाडीत बसणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तर लय जबरदस्त सोयी आहेत. गाडीत लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे, ऑक्सिजन टॅंक आहे आणि ब्लड सप्लाय करता येईल अशी सोयही. थोडक्यात काय तर, अमेरिका कणभरही धोका पत्करत नाही. एखादा अडचणीचा प्रसंग समोर आलाच, तर गाडीच्या पुढं अश्रूधूराचे टॅंक आहेत, इतकंच नाही तर इनबिल्ट शॉटगन्सही आहेत. समजा काय लफडं झालंच… तर गाडीतून डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंटला आणि पेंटॉगॉनला डायरेक्ट संपर्कही साधता येऊ शकतो.

थोडक्यात काय, तर देशातल्या मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दोन्ही गाड्या भारी आहेत. द बीस्टमध्ये मेबॅकपेक्षा काही सुविधा जास्त आहेत. पण तुम्हाला या दोन्हीमधली कुठली गाडी भारी वाटली, हे तुम्हीच विचार करुन ठरवा… बीस्ट असेल किंवा मेबॅक दोन्ही गाड्या खुंखार आहेत, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

1 Comment
  1. Atul Kalbende says

    Details nahi aahet modi cha car cha Pudge Rahul Gandhi cha next pm

Leave A Reply

Your email address will not be published.