हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याच्या पत्रिका वाटणारे कॉम्प्युटर बाबा !!!

सन १९९८, देशभरात तंत्रज्ञानाच युग आलेलं.काँप्युटर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे लोकांना दिसू लागले होते. लोकांना इतक्या जलद काम करणार यंत्र म्हणून काँप्युटरचं कौतुक वाटत होतं. त्याचं दरम्यान मध्यप्रदेशातील नृसिंहपुरमध्ये जेष्ठ साधू मंडळाच एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. याच संमेलनात एक तरुण साधू आपल्या बोलण्यातून लोकांवर प्रभाव पाडत होता. त्याच डोकं इतकं चतूर त्या तरूण साधूनं एकाच वेळी तीन वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्याचं बोलणं ऐकून भक्त इतके प्रभावित झाले की त्यांनी या तरुणाचं नाव पाडलं काँप्युटर बाबा.

गोष्ट खरी खोटी हे या बाबांना आणि त्यांच्या भक्तांनाच माहित. कोण म्हणतं त्यांच डोकं काँप्युटरपेक्षा जलद आहे म्हणून कॉंप्युटर बाबा तर कोण म्हणतं ते नेहमी कॉंप्युटर घेवूनच असतात म्हणून कॉंप्युटर वाले बाबा. तर या महाराजाज आत्ता चर्चेत आलेत कारण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या महाराजांसहीत अन्य तिघांनी थेट राज्यमंत्री पदाचा दर्जा देवू केलाय.

नर्मदा बचाव आंदोलनासाठी असणाऱ्या समितीमध्ये सदस्य म्हणून स्थान देत साधू महंताना राज्यमंत्री करण्याचं पुण्यकाम शिवराज चौहान यांनी केलं आहे. त्यात या कॉम्प्युटर वाले बाबांचा देखील समावेश आहे. कॉम्पुटर बाबा हे खासकरुन आपल्या राहणीमानासाठी ओळखले जातात.

कुंभमेळ्याच्या दरम्यान त्यांनी आपलं जहाज घाटावर उतरून द्यावं यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती. नेहमीच हेलिकॉप्टर मधून फिरणाऱ्या या महाराजांनी कुंभमेळ्याच्या आयोजनानंतर थेट हेलिकॉप्टर मधून पत्रिका वाटायचं देखील काम केलं होतं अशा या महाराजांचा राजकिय भूतकाळ सांगायचा तर हे महाराज २०१४ साली आपच्या तिकीटावर लोकसभेसाठी उभा राहणार होते. त्यानंतर नर्मदा बचाव संबधात त्यांनी शिवराज सिंग चौहान यांच्यावर कडवी टिका करत नर्मदा बचाव रथ यात्रेचं आयोजन देखील केलं होतं. या बाबांनी शिवराज चौहान यांना अनेकदा फैलावर घेण्याचं पुण्य काम केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे शिवराज सिंग चौहान यांना फैलावर घेण्याचं हे काम अगदी कालपरवा पर्यन्त महाराजांकडून अगदी नेटानं चालू होतं. ३१ मार्चला म्हणजेच मार्च एन्डला हे महाराज शिवराज सिंग चौहान यांना भेटून नर्मदेबाबत दम टाकून आलेले अस भक्त सांगतात.

विशेष म्हणजे आज ४ एप्रिल आहे. या दिवशी सन १९७५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना करण्यात आली होती आणि आजच्याच दिवशी भारतात कॉम्पुटर बाबांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याची बातमी आल्यानं रिबुट झाल्याची भावना मनात दाटली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.