कॉम्रेड भाऊ सखाराम पाटलांमुळं आजही महाराष्ट्रात ‘एक गाव एक गणपती’ साजरा होतो…

सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात शहरी भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वाढल्याचे सांगितले जात आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही एक गाव एक गणपती ही योजना लोकांनी स्वीकारल्याचे दिसत आहे. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना साठच्या दशकात महाराष्ट्रात मांडण्यात आली. 

सगळ्यात आधी एक गाव एक गणपती’ ही संकल्पना ,मांडली कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी. 

भाऊ सखाराम पाटील यांनी १९६१ मध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना गणेशोत्सव दरम्यान अग्रोळी या गावात मांडली. आता हे गाव नवी मुंबईचा एक भाग झाले आहे. अग्रोळी गावात मुख्यतः आगरी कोळी समाजाचे लोक राहत. मासेमारी करणे, मिठाचे उत्पादन आणि शेती हे नागरिकांचे कमाईचे साधन होते. गावातील अनेक कुटुंबे गरीब होती. मात्र गणेशोत्सव म्हटलं की बेलापूर येथील सावकारांकडून कर्ज घेऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत. 

यामुळे अनेक गावकरी कर्जबाजारी होत होते. ठाणे बेलापूर भागात १९६१ मध्ये तापाची साथ आली होती. त्यामुळे स्थानिक लोक हैराण झाले होते.  १९६१ मध्ये गणेशोत्सवाच्या आधी भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांची एक बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी ‘एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडली.

गावात अनेक ठिकाणी अथवा प्रत्येक घरात गणवपती बसवण्याची गरज नाही. संपूर्ण गावात गणेशाची एकच मूर्ती असायला हवी. ज्यामुळे सगळ्यांचा खर्च वाचेल. अशी संकल्पना भाऊ सखाराम पाटील यांनी मांडली होती. मात्र त्याच वेळी बेलापूर भागात तापाची साथ सुरु होती. देव कोपेल अशी भीती गावकऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी या संकल्पनेला विरोध केला.   

गावातील काही लोकांनी त्याला चांगलाच विरोध केला. यानंतर पाटील यांनी पुढाकार घेऊन बेलापूर भागात तापाची साथ असणाऱ्या गावात जाऊन लसीकरण करून घेतले. 

यामुळे हजारो नागरिकांचे जीव वाचले. यामुळे अग्रोळी गावातील लोकांना वाटले आपल्या मदतीला गणपती बाप्पा आले असून त्याने आपल्याला वाचविले आहे. 

त्यानंतर अग्रोळी गावातील लोकांनी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना मान्य केली. त्यावेळी अग्रोळी गावाची लोकसंख्या २५० एवढी होती. ‘एक गाव एक गणपतीसाठी’ प्रत्येक कुटुंबाने ५ रुपये वर्गणी गोळा केली. त्यातून जमा झालेल्या पैशातून गणेशाची मूर्ती आणली. यासाठी गावातील सर्व जाती समूहातील लोक एकत्र आले. १९६१ पासून सलग ६३ वर्ष अग्रोळी एकच गणपती बसविण्यात येतो.  

त्यानंतर ही संकल्पना हळूहळू महाराष्ट्राच्या इतर जिल्हयात राबविण्यात आली. 

नैसर्गिक संकटांमुळे विदर्भांतील शेतकरी नेहमीच भरडला जातो. यामुळे खर्च टाळून करण्यात येणारा एक गाव एक गणपती ही संकल्पना चांगलीच रूढ झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्य़ांत सार्वजनिक गणेशोत्सवात पैसे बचत व्हावे, गावातील वाद मिटावेत आणि लोकवर्गणीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्रम गावागावात पोहोचविण्याचे काम केले होते. 

राज्य सरकारनेही महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात एक गाव एक गणपती उपक्रमाचा समावेश करून या चळवळीला राजकीय आश्रय दिला.  

यंदाचा विचार करायचा तर राज्यात ७१ हजार ३३८ गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. एक गाव एक गणपती ही संकल्पना मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात राबविली जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.  याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजत चालली आहे. 

 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.