या घटनेपासून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली.

महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा चर्चेत आलायं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात या मुद्दयांवर विधानसभेत मोठं रणकंदन झालं.

त्याचा पुढचा अंक आज बघायला मिळाला.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं ‘सावरकरांना भारतरत्न देण्यास आपला पाठिंबा आहे’ असं म्हटल्याचं वृत्त ‘लोकसत्ता’नं छापलं. मात्र त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी तात्काळ खुलासा करत आम्ही अशी मागणी कदापि केलेली नाही, आणि त्या बातमीत तथ्य नसल्याचं सांगितलं. 

वरचेवर देखील काँग्रेसची ही सावरकर विरोधी भूमिका सातत्याने पाहायला मिळते, मग यात राहुल गांधींन पासून सेवादलापर्यंत सगळे विरोधी वक्तव्य करत असल्याचं दिसून येत. थोडक्यात काय तर फार आधी पासूनच काँग्रेस आणि सावरकरांच्यात उभी फूट आहे.

मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि सावरकर यांच्यात ही फूट नक्की कोणत्या घटनेपासून पडली हे बघायला हवं.

या प्रश्नाचं उत्तर शोधायला मुळाशी गेल्यानंतर सुरुवातीला काँग्रेस आणि सावरकर यांचे खूप चांगले संबंध असल्याचं दिसून येतं. हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते मानले जाणाऱ्या सावरकरांनी फक्त लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी यांच्याविषयीच नाही तर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल वेळोवेळी प्रशंसनीय उद्गार काढले होते.

तसचं काँग्रेसला ‘आजादी की मशाल वाहक आहे असं देखील म्हंटल्याचे संदर्भ आढळतात. 

तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिश प्रशासनानं सावरकरांची काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटका करण्यास नकार दिला होता. त्यावर १९२० मध्ये महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक या नेत्यांनी सावरकरांना कोणत्याही अटी आणि शर्तीसह सोडण्याची मागणी केली होती.

मग हे संबंध नेमके कुठे बिघडले? 

याला कारणीभूत ठरली होती एक घटना आणि एक बातमी.

वैभव पुरंदरे लिखित ‘सावरकर: द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्व’ या पुस्तकानुसार,

सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या बलुचिस्तानमध्ये एका हिंदू युवतीला मुस्लिम समुदायाच्या लोकांकडून जबरदस्ती नेण्यात आलं. मात्र लोकांच्या विरोधानंतर तिला सोडून देण्यात आलं. अशातच काही मुस्लिम नेत्यांनी संबंधित युवतीला परत मुस्लिम समाजाकडे परत पाठवण्याची मागणी केली, आणि त्या भागात मोठी दंगल भडकली.

हिंसेनंतर कथितरित्या आणखी काही हिंदू युवतींच अपहरण करण्यात आलं. या प्रकरणात ब्रिटिश प्रशासनानं मुस्लिम समाजाच्या हिंसेविरोधात कारवाई केली, त्यावर ब्रिटिश पोलिसांचा निषेध करण्यात आला, त्यांचा विरोध होऊ लागला. ब्रिटिशांचा विरोध करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांचा पण समावेश होता.

हे वातावरण एवढं तणावपूर्ण झालं होतं की, या घटनेबद्दल देशभरात बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यापैकीच एक बातमी आली की,

काँग्रेसचे नेते आणि सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान यांचा भाऊ जफ्फार खान यांनी संबंधित मुलींनी मुस्लिम समाजाकडे परत जायला पाहिजे, असं म्हंटल. तसचं काँग्रेसच्या नेत्यांनी खान यांच्या या म्हणण्याचं समर्थन केलं असल्याची देखील बातमी आली. संपूर्ण देशात या बद्दल चर्चा होऊ लागली. 

या सगळ्या बातम्यांवर आणि घटनांवर प्रतिक्रिया देताना मिरज मधील भाषणात सावरकरांनी समर्थन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचा भरसभेत ‘नामर्द’ म्हणून उल्लेख केला. त्यामुळे काँग्रेस पक्षात आणि पक्षाबाहेर बरीच नाराजी पसरली. 

हा उल्लेख करण्याच्या काही दिवस आधीच म्हणजे १९३६-३७ च्या दरम्यान सावरकर रत्नागिरीमधून नजरकैदेतून बाहेर येणार होते. त्यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विविध शहरांमध्ये सावरकरांच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. पण या वक्तव्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

या संपूर्ण प्रसंगाचा उल्लेख पुरंदरेंनी आपल्या पुस्तकात केला आहे.

पुण्यात सावरकरांच्या स्वागत कार्यक्रमाची जबाबदारी काँग्रेसचे नेते नरहर गाडगीळ यांच्यावर होती. पण त्यानंतर गाडगीळांनी या जबाबदारीचा राजीनामा दिला. आणि म्हंटले कि,

सावरकरांनी ज्या बातमीवर एवढी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे ती बातमी खोटी आहे.  डॉ. खान साहेब या नावानं प्रसिद्ध अब्दुल जफ्फार खान यांनी असं कोणतंही विधान केलेलं नाही. हि बातमी त्यांच्या नावानं भले छापली गेली, पण ती खोटी आहे.

गाडगीळ यांच्या या खुलाश्यानंतर पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. सावरकरांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खान साहेबांच्या नावानं छापलेली बातमी खोटी असेल तर त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त आनंद आणखी कोणालाच होणार नाही.

पुरंदरे लिहितात,

सावरकरांनी या मुद्द्यावर पुढे अनेक प्रकारची स्पष्टीकरण दिली, आणि काँग्रेससोबत पण चर्चा केली, पण सावरकरांना काँग्रेसनं ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. त्यानंतर सावरकरांचे जे काही कार्यक्रम व्हायचे तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन विरोध प्रदर्शन करायचे. 

या घटनेपासून सावरकर आणि काँग्रेसमध्ये परत कधीच जमलं नाही. सावरकरांनी बाबासाहेब आंबेडकर सोडून वेळोवेळी नेहरू, गांधी आणि इतर सगळ्याच काँग्रेसी नेत्यांवर टीका केली तिकडे काँग्रेस देखील संपूर्ण ताकदीनं सावरकरांच्या विरोधात उभी राहिली. आणखी एका पुस्तकातील संदर्भानुसार सावरकरांच्या ७५ व्या जन्मदिनी आणि त्यांच्या मृत्यूवेळी काँग्रेसचा कोणताही महत्वाचा नेता सहभागी झाला नव्हता.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.