गुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे काँग्रेसचं गणित अवघड झालं आहे
गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील ८९ जागांवर आज मतदान होत आहे. तर उरलेल्या जागांवरील मतदान ५ तारखेला होणार आहे. या मतदानात भाजप, काँग्रेस आणि आप हे तिन्ही पक्ष गुजराती लोकांच्या मनात जागा तयार करण्यास किती यशस्वी झाले हे मतमोजणीत कळेल.
मात्र ही निवडणूक फक्त गुजरातपुरती मर्यादित नाही, तर या निवडणुकीचा आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्धा प्रभाव पडणार आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजप आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसमध्ये आपने एंट्री केलीय. परंतु राजकीय विशेलषक सांगतात की आपच्या एंट्रीचा फटका भाजपपेक्षा काँग्रेसलाच बसणार आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी गुजरातसाठी कोणते समीकरण ठरवले आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे.
गुजरातमधील लोकांमध्ये गेल्या २७ वर्षांमधील सत्ताधारी भाजप आणि विरोधी असलेल्या काँग्रेसबद्दल सत्ताविरोधी भावना वाढलेली आहे. मात्र ही भावना सत्ताधारी भाजपपेक्षा काँग्रेसच्याच विरोधात जास्त असल्याचे सांगितले जाते. त्यातच गुजरातमध्ये काँग्रेसला पर्याय असलेल्या आपची एंट्री झाल्यामुळे याचा फायदा आपला मिळू शकतो असं म्हटलं जात आहे.
पण निव्वळ सत्ताविरोधी भावनाच नाही तर यामागे तिन्ही पक्षांनी जुळलेले जातीय समीकरण सुद्धा कारणीभूत ठरतील असं म्हटलं जातंय.
१९८० च्या दशकात काँग्रेस नेते माधव सिंह सोळंकी यांनी क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम असा चार समाजांचा ‘खाम’ फॉर्म्युला जुळवलं होता. याच्याच प्रभावाने १९८५ मध्ये काँग्रेसला रेकॉर्डब्रेक १४९ जागांवर विजय मिळाला होता. मात्र काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यावर उपाय करण्यासाठी केशूभाई पटेल यांनी कोळी, कुणबी आणि मुसलमान असा ‘कोकम’ फार्म्युला आणला होता.
मात्र आपने या दोन्ही फॉर्म्युल्यांना सोडून स्वतःचा तिसरा ओटीपी फॉर्म्युला सेट केला आहे.
आपने ओबीसी, आदिवासी आणि पटेल या तीन समाजांचं समीकरण जुळवून ओटीपी समीकरण बनवलंय. यात आपच्या १८० उमेदवारांपैकी ४७ सीट्सवर पटेल उमेदवारांना तिकीट दिलंय. तर २७ जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. यासोबत महत्वाची बाब म्हणजे आपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून इसुदान गढवी या ओबीसी उमेदवाराला संधी दिलीय.
पाटीदार समाजाची लोकसंख्या १५ टक्के असली तरी गुजरातच्या जवळपास ५० जागांवर पाटीदारांचा प्रभाव आहे. यातील सर्वात जास्त जागा सौराष्ट्र भागात आहेत. २०१७ च्या निवडणुकीत सौराष्ट्राच्या ८९ जागांपैकी ४८ जागा भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या. तर ४० जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. पाटीदार हा गुजरातमधील महत्वाचा फॅक्टर आहे, पाटीदार नाराज झाल्याचा फटका २०१७ मध्ये भाजपाला सुद्धा बसला होता.
पाटीदारांसोबतच आणखी महत्वाचा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला समाज म्हणजे ओबीसी.
ओबीसी समाज हा काही एकजातीय नाही त्यामुळे ओबीसींची एकगठ्ठा मतं एखाद्या पक्षालाच मिळतील असं नाही. परंतु ओबीसी हा समाज निवडणुकीत प्रभाव ठाकतो हे मात्र नक्की. माध्यमांमधील आकडेवारीनुसार गुजरातमध्ये ओबीसींची लोकसंख्या ४८ टक्के असल्याचे सांगितले जाते.
आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी हे सुद्धा ओबीसी कॅटेगिरीमधील चारण समाजातून येतात. त्यांना खांबालिया सीटवरून तिकीट देण्यात आलं आहे. या सीटवर ओबीसी कॅटेगिरीतील अहिर आणि यादव समाजाची लोकसंख्या जास्त आहे.
पाटीदार आणि ओबीसी चेहरा असलेले अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे याचा फायदा आपला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०१७ च्या निवडणुकीत पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले हार्दिक पटेल हे भाजपच्या तिकिटावर वीरगाम सीटवर उभे आहेत. तर याच पाटीदार आंदोलनाला विरोध करणारे ओबीसी प्रवरांगातील अल्पेश ठाकोर हे सुद्धा भाजपच्याच तिकिटावर गांधीनगरमधून निवडणूक लढवत आहेत. सध्या पाटीदारांमध्ये भाजपच्या विरुद्ध राग नाही पण भाजपने प्रतिस्पर्ध्यांना तिकीट दिलं आहे त्यामुळे याचा फायदा आपला होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आपने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सौराष्ट्रात ओबीसी आणि पटेलांची मोट बांधली आहे.
आपने कुटीयाना सीटवरून भाजपच्या वाघेला समाजातील कांधल जडेजा यांच्याविरोधात ओबीसी कॅटेगिरीतील रबारीची समाजाच्या भीमाभाई मकवाणा यांना तिकीट दिल आहे. तर पोरबंदर सीटवर बाबुभाई बोखोरिया यांच्या विरोधात जीवन जुंगी या जुन्याच उमेदवाराला संधी दिलीय. या दोन्ही सीट्सवर मेहेर समाज बहुसंख्य आहे त्यामुळे आपचं पारड जड असल्याचं सांगितलं जात आहे.
ओबीसी कॅटेगिरीमध्ये कोळी हा प्रमुख समाज आहे. कोळी समाजाची लोकसंख्या ओबीसी लोकसंख्येत २४ टक्के आहे असं सांगितलं जातं. यासोबतच सोलंकी, बावडीया, अहीर, चारण या जातींची लोकसंख्या सुद्धा ओबीसीमध्ये प्रभावी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही मतं भाजप आणि काँग्रेसकडून खेचून घेण्यासाठी आपने मोठ्या प्रमाणावर ओबीसी कॅटेगिरीमधील उमेदवारांना सीट्स दिल्या आहेत.
एकीकडे गुजरातमध्ये पाटीदार हे प्रभावी असल्याचे सांगितले जाते, पण ओबीसी सुद्धा कमी प्रभावी नाहीत.
नरेंद्र मोदी हे ओबीसी कॅटेगिरीतून असून सुद्धा ते सलग १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यामुळे नरेंद्र मोदींप्रमाणे पुन्हा एकदा ओबीसी मुख्यमंत्री बनवण्याची प्लॅनिंग आपने केली आहे. पण आपच्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे हिंदू धर्मीयांमध्ये जशी पक्षाची प्रतिमा तयार झाली आहे, त्याचप्रमाणे सुरुवातीच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळे मुस्लिम समाजात सुद्धा आपचा प्रभाव आहे.
कट्टर हिंदुत्ववादी भाजपाला पर्याय म्हणून मुस्लिमांना काँग्रेससोबत आपचा सुद्धा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पारंपरिक मतदार आपला पाठिंबा देतील असं राजकीय विश्लेषक सांगतात.
हे ही वाच भिडू
- हे पाच मुद्दे दाखवून देतायत की, मोदींना पर्याय म्हणून कॉंग्रेसऐवजी ‘आप’ सक्षम होतंय..
- पत्रकार ते राजकारणी आपचे गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी कोण आहेत ?
- केजरीवाल नाही तर गुजरात आणि हिमाचलमध्ये आपचे हे ५ शिलेदार भाजपचं टेन्शन वाढवत आहेत