सुभाषबाबूंच्या मुलीच्या शिक्षणासाठी काँग्रेस दर महिन्याला जर्मनीला मदत पाठवत राहिली.

सुभाषचंद्र बोस म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगते पर्व. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन हजारो सैनिक आझाद हिंद सेनेत दाखल झाले आणि भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी चलो दिल्लीला चा नारा देत ब्रिटिशांशी भिडले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षे पूर्ण झाली मात्र आजही आझाद हिंद सेनेच्या पराभवापासून ते सुभाषबाबूंच्या मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींबद्दल वाद सुरूच असतात.

याला एक कारण म्हणजे नेताजींच्या भोवती असणारे गुढतेचं वलय.

आपल्यापैकी अनेकांना वाटत असते की सुभाषबाबूंच्या मृत्यू मागे नेहरूंचा हात होता. गेल्या काही वर्षांपूर्वी मोदींजींच्या नेतृत्वाखाली सुभाषबाबूंच्या मृत्यूसंबंधीच्या गोपनीय फाईल उघडून काँग्रेसचे षडयंत्र जगासमोर आणायच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र फाईल्स उघडल्या तरी त्यात तसं काही सापडलं नाही.

सुभाषचंद्र बोस हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते. त्यांची पक्षात तुफान लोकप्रियता होती. कम्युनिस्ट विचारांनी भारावून गेलेल्या सुभाषचंद्र आणि जवाहरलाल नेहरू या समवयस्क नेत्यांमध्ये अगदी जिवलग मैत्री होती.

मात्र महात्मा गांधींचे अहिंसावादी विचार नेताजींना पटत नव्हते.

यातून त्यांनी काँग्रेस सोडून वेगळा पक्ष काढला. इंग्लंडच्या शत्रू राष्ट्रांना भारतच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करायला मन वळवण्यासाठी त्यांनी युरोप दौरा केला होता. हिटलर वगैरे नेत्यांची भेट घेतली.

जर्मनी मध्ये असताना नेताजी द इंडियन स्ट्रगल नावाचा ग्रंथ लिहीत होते तेव्हा तिथे टाईपिस्ट असलेल्या एमिली शेंकल या ऑस्ट्रियन मुलीशी ते प्रेमात पडले. दोघांनी लग्न केले होते.

Subhas Chandra Bose and Wife Emilie Shenkl with German Shephard 1937

त्यांना एक मुलगी देखील झाली तीच नाव अनिता असे ठेवण्यात आले.

१९४२ साली जन्मलेली अनिता दोन महिन्याची असताना सुभाषबाबूंना जपानला जावे लागले. तिथे जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची सूत्रे आपल्या हाती घेतली. मात्र जपान, जर्मनी यांचा पराभव झाल्यामुळे भारताला स्वतंत्र करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.

१९४५ साली झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पत्नी व मुलीशी त्यांना अखेरची भेट देखील घेता आले नाही.

अनिताला तिच्या आईनेच वाढवले. एमिली यांनी दुसरे लग्न केले नाही.

त्यांची परिस्थिती अत्यन्त हलाखीची बनली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी जर्मनीच्या एका ट्रंककॉल ऑफिसमध्ये नोकरी केली. या तुटपुंज्या पगारातून आपल्या मुलीचे पालनपोषण व आईचा औषधपाण्याचा खर्च भागवला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान बनले तर सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री व उपपंतप्रधान बनले.

नेहरूंचा व पटेलांचा सुभाषबाबूंच्या स्वातंत्र्याच्या मार्गाविषयी आक्षेप होता मात्र त्यांच्या विषयी आकस नव्हता. खुद्द सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेना बनवली तेव्हा त्यात गांधी ब्रिगेड व नेहरू ब्रिगेड बनवली होती.

आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर जेव्हा खटले दाखल केले होते तेव्हा खुद्द नेहरूंनी वकिलीचा वस्त्रे चढवून त्यांची बाजू लढली होती.

जेव्हा स्वातंत्र्यानंतर नेहरूंना सुभाषबाबूंच्या पत्नी व मुलीबद्दल कळले तेव्हा त्यांनी वल्लभभाई पटेलांना पत्र पाठवून त्यांना कशी मदत करता येईल याचा सल्ला मागितला होता.

खरे तर वल्लभभाई पटेलांचे सुभाषबाबूंशी असलेले वाद सर्वश्रुत होते मात्र तरीही त्यांनी त्यांच्या मुलीला मदत करायचे सर्वोतोपरी प्रयत्न केले.

२१ जुलै १९४८ ला पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात वल्लभभाई म्हणतात,

“आजाद हिंद फौज के बारे में आपका १५ जुलाई का पत्र प्राप्त हुआ. मैं आपकी इच्छा के अनुसार ५० हजार रुपए की धनराशि जुलाई-सितंबर महीनों के खर्च के लिए और भेज रहा हूं. मेरा सुझाव है कि एक अक्टूबर को जो भी पैसा ‘शेष रहता है, उसे सुभाष बाबू की बेटी की मदद के लिए ट्रस्ट में डाल दिया जाए, जिसके बारे में कुछ समय पहले हमारे बीच पत्र-व्यवहार हुआ था. ऐसा नहीं लगता है कि ‘शरत बाबू सुभाष बाबू के बड़े भाई उनकी कुछ मदद कर पाएंगे.”

वल्लभभाई पटेल यांच्या सल्ल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या वतीने सुभाषबाबूंच्या मुलींसाठी दोन लाख रुपयांचा ट्रस्ट बनवण्यात आला. २३ मे १९५४ रोजी या ट्रस्टच्या कागदपत्रांवर नेहरूंनी सही केली. पुढची दहा वर्षे काँग्रेस पक्ष या ट्रस्ट तर्फे अनिता बोस यांना दर महिन्याला ५०० रुपये प्रमाणे वर्षी ६ हजार रुपये पाठवत राहिला.

२०१६ साली भारत सरकारने ओपन केलेल्या गोपनीय फाईल्समध्ये ही माहिती उघड झाली होती.

अनिता बोस यांच्या आईला देखील मदत पाठवण्यात आली होती पण त्यांनी हे पैसे नाकारले. अनिता बोस यांनी अर्थशास्त्र या विषयात आपले शिक्षण घेतले. जर्मनीच्या ऑग्सबर्ग यूनिवर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून त्या नोकरीला लागल्या. प्रोफेसर मार्टिन फाफ यांच्याशी त्यांनी विवाह केला.

लग्नानंतर त्यांनी भारतातून मदत घेणे थांबवले. आता त्या ७६ वर्षाच्या आहेत.

त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत
नेताजी सुभाषचन्द्र बोस एण्ड जर्मनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यांना पीटर अरुण, थॉमस कृष्णा व माया कॅरीना ही तीन मुले आहेत. अनिता यांंचे पती जर्मन राजकारणात सक्रिय आहेत.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. SHANTANU+RAKTATE says

    वरील सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित शोध घेऊन लिहल्या असतील असं जरी मान्य केलं तरी…

    वकीलाचे कपडे चढवून आझाद हिंद मधल्या युद्ध कैद्यांची बाजू मांडण्यासाठी नेहरू नीं जे कार्य केले तेच कार्य भारत स्वतंत्र झाल्यावर आझाद हिंद फौजेतील सैन्याला भारतीय सैन्यात सामील करून घेण्यात का दिसले नाही….त्यांना वाऱ्यावर का सोडले गेले….?

    सुभाषचंद्र ह्यांच्या मुली साठी ट्रस्ट स्थापन करून दर महिना मदत ही सुभाषबाबू जिवंत असावेत ह्या कारणाने केली जात नसेल कशावरून?

    ज्या पद्धतीने सुभासचंद्र बोस ह्यांच्या लोकांच्या मनातल्या स्मृती पुसण्याच काम तत्कालीन काँग्रेस ने केलं ते तुम्ही नाकारू कसे शकता.?

    कधीतरी …..सुभाषचंद्र बोस जिवंत असते तर आधुनिक भारत कसा असता ह्यावर देखील विचार होऊन एखादा लेख यायला पाहिजे, अशी भावना……..

Leave A Reply

Your email address will not be published.