काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या बायोडेट्याचे कागद मुंबईतल्या भेळवाल्याकडे सापडले होते

निवडणुका जाहीर झाल्या की कोणत्याही पक्षश्रेष्ठींना एक गोष्ट खूप जिकिरीची वाटते, ती म्हणजे तिकीट वाटपाची. हा तिकीट वाटपाचा पेच म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही मोठा असतो. आता या तिकिटासाठी बरेच नेतेमंडळी आस लावून बसतात आणि त्यासाठी हे मोठे मोठे बायोडेटे पक्षश्रेष्ठींकडे जातात. 

तिकीट वाटप झाल्यानंतर या बायोडेट्यांच काय होत माहितीय का ? सरळ रद्दीत जातात.

असेच काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे बायोडेटे मुंबईतल्या भेळच्या दुकानात सापडलेले. त्याचाच हा किस्सा.

तर ३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधींचा खून झाला आणि देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तयार होऊ लागलं. त्यावेळी नगर जिल्ह्याच्या उत्तरेत बाळासाहेब विखे आणि दक्षिणेत चंद्रभान आठरे पाटील विद्यमान खासदार होते.

मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादांनी यशवंतराव गडाख यांच्या नावाचा नगरच्या दक्षिण मतदारसंघासाठी विचार केला असावा. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गडाख सहज म्हणून दादांना भेटायला गेले. दादा वर्षा बंगल्यावर होते. एरव्ही मुख्यमंत्र्यांना वेगळ्या कार्यालयात भेटावं लागतं. पण दादांचं सारं कामच वेगळं होतं. त्यांच्या घरातील अगदी बेडरूमपर्यंत सर्वांना मुक्तद्धार असे.

गडाख गेले तेव्हा वर्षावर अगदी निवांत वातावरण होतं. दादांचे पी.ए. यशवंत हाप्पे तिथं होते. आत दादांची मालीश चालू होती. त्यांनी मला गडाख यांना आत बोलावलं आणि म्हणाले की, बस, मी अंघोळ उरकून येतो. मग आपण नाश्ता करू. अंघोळ करून परत आलेले दादा अचानक म्हणाले की,

यशवंतराव, तुम्हाला लोकसभेला उभं राहावं लागेल. मी राजीव गांधींशी बोलून आलो आहे. तयारी सुरू करा. कामाला लागा.

दादांनी रामकृष्ण मोरे यांना नगरला निरीक्षक म्हणून बैठकीसाठी पाठवलं. जवळच्या वीस-पंचवीस कार्यकर्त्यांची मीटिंग गडा खांच्या बंगल्यावरच झाली. खासदारकी नको असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं मत पडलं. जे मिळतं ते घेऊन टाकावं असं जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचं मत पडलं. मात्र गडाख द्विधा मन:स्थितीत होते.

खासदारकी पाहिजेच असं काही त्यांच्या मनात नव्हतं. तरी शेवटी दादांचा सल्ला मानून गडाखांनी काँग्रेस कमिटीकडे रीतसर अर्ज केला. चंद्रभान पाटलांनीही अर्ज केलेला असल्याने दोघांतच स्पर्धा होती. महाराष्ट्र प्रांतिकने निश्चित निर्णय न घेता दोघांचीही नावे दिल्लीला पाठवली. दोन्हीकडची मंडळी दिल्लीला ठाण मांडून बसली. 

आणि नेमकी त्यावेळची परिस्थिती काय होती हे यशवंतराव गडाखांनी आपल्या अर्धविराम या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय.

त्यावेळी निवडणुकांचं तिकीट वाटप ही काँग्रेसमधील मोठीच गंमतीशीर गोष्ट होती. ज्येष्ठ पुढाऱ्यांची निवडणूक समिती असायची. या समितीचं मत कलुषित होईल अशा तऱ्हेनं प्रतिस्पर्ध्यावर आरोप केले जायचे. दोन्ही बाजुंनी खोटीनाटी माहिती पुरवली जायची.

प्रत्येकजण आपल्या आपल्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन शक्तीप्रदर्शन करायचा. समितीकडं बायोडाटा पोहोचता करण्याची प्रत्येकाची घडपड असायची. जन्मतारीखे पासून ते गल्लीतल्या तरुण मंडळाच्या अध्यक्षपदापासून केलेल्या व न केलेल्या अनेक उद्योगांच्या माहितीने भरलेले ते भेंडोळे घेऊन अनेकजण इकडून तिकडे फिरायचे.

आणि शेवटी या भेंडोळ्यांचं काय व्हायचं ? तर हे कागद रद्दीत जायचे. अशाच त्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या बायोडाटाचे कागद एकदा मुंबईला भेळवाल्याकडे सापडले होते.

अशाप्रकारे कागद सापडले ही वेगळी गोष्ट पण इच्छुकांची परीक्षा पण इंटेलिजन्स ब्युरोकडून घेतली जायची.

गडाख लिहितात.

ते तिकिटासाठी फार उत्सुक नव्हतेच. ते एकदा टॅक्सीची वाट बघत उभा होते. तेवढ्यात कुठूनतरी एकजण त्यांच्याकडे आला. त्यानं गडाख यांच्याशी राजीव गांधींविषयी बोलायला सुरुवात केली. राजीव गांधी कसा माणूस आहे, त्यांना पंतप्रधानपद झेपेल का, या स्वरूपाचे प्रश्न तो विचारत होता. गडाख सुद्धा मनमोकळेपणानं उत्तरं देत होते.

देशाला आता तरुण आणि नवख्या विचारांच्या राजीव गांधी यांच्यासारख्या पंतप्रधानाचीच गरज असल्याचं ते त्या व्यक्तीला सांगत होते. गडाख आणि त्या व्यक्तीचं बोलणं जवळपास दहा एक मिनिटं चाललं होतं. बोलून झाल्यावर तो गृहस्थ आला तसा निघून गेला. तो जाताना गडाख त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. त्याची चालण्याची ढब, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचं बोलणं यावरून त्यांच्या अचानक लक्षात आलं की अरे हा तर इंटेलिजन्सचा माणूस दिसतोय.

इच्छुकांना अशा अनेक प्रकारांनी त्याकाळी तपासलं जायचं.

हे हि वाच भिडू

 

Webtitle : Congress aspiring candidates Biodata were found at bhelwala in mumbai

Leave A Reply

Your email address will not be published.