या घटना सांगतात, काँग्रेस अहमद पटेलांनंतर संकटमोचक म्हणून प्रियांका गांधींकडे बघतीय…
अहमद पटेल यांना काँग्रेसचा शातीर दिमाग म्हणून ओळखलं जायचं. काँग्रेसवर कोणतही संकट आलं तर ते परतवून लावणारे संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. मात्र गतवर्षी त्यांचं निधन झालं आणि काँग्रेसमधील संकटमोचक म्हणवला जाणारा चेहरा गायब झाल्यासारखी स्थिति झाली होती.
पण आता अहमद पटेल यांच्यानंतर काँग्रेसच्या संकट मोचक म्हणून एक चेहरा समोर आला आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. या चेहऱ्याचं नाव म्हणजे,
प्रियांका गांधी.
असं म्हणण्याचं कारण ठरलं आहे ते म्हणजे मागच्या काही काळात घडलेल्या अडचणीच्या घटना, आणि त्या प्रसंगांमधून पक्षाला बाहेर काढण्याचा प्रियांका गांधी यांनी केलेला प्रयत्न. आता देखील अशीच एक नवी जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. ती म्हणजे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुक जिंकण्याची.
माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी नुकतीच माहिती दिली कि, आगामी उत्तरप्रदेश निवडणुका काँग्रेस प्रियांका गांधींच्या नेतृत्वात लढणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रियांका गांधी काँग्रेसच्या संकटमोचक म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला उत्तरप्रदेशमध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही.
आता सध्या भाजप, त्याआधी समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष अश्या पक्षांनी उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. काँग्रेसला मात्र १९८९ सालापासून तिथली विधानसभा जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदाची विधानसभा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रियांका गांधींच्या नेतृत्वात उतरणार आहे.
या व्यतिरिक्त प्रियांका गांधी यांनी कोणकोणत्या प्रसंगांमध्ये संकटमोचक म्हणून भूमिका पार पाडली आहे ते बघणं महत्वाचं ठरत.
१. सचिन पायलट – अशोक गेहलोत संघर्ष :
मागच्या जवळपास १ वर्षापेक्षा जास्त काळापासून राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात सत्तासंघर्ष आणि वर्चस्ववाद सुरु आहे. पायलट यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड उघडलं होतं. याच संघर्षाच्या सुरुवातीनंतर पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.
त्यानंतर असं वातावरण होतं कि सचिन पायलट पक्षात कोणत्याही नेत्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर त्यांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी राज्यव्यापी दौरा देखील काढला होता.
मात्र याच दरम्यान पायलट यांनी दिल्ली दौरा देखील केला होता. त्यावेळी असं सांगितलं गेलं कि या भेटीत पायलट यांची अजय माकन, प्रियांका गांधी यांच्यांशी भेट झाली. त्यानंतर पायलट यांनी आपलं बंड शांत केलेलं पाहायला मिळालं होतं. आज पायलट काँग्रेसमध्येच असून राजस्थान सरकार देखील स्थिर आहे.
२. कॅप्टन अमरिंदर सिंग – नवज्योत सिंग सिद्धू संघर्ष :
पंजाब काँग्रेसमध्ये देखील जुलैमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला होता. त्यावेळी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला होता. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वर्चस्ववाद सुरु झाला होता. सिद्धू यांच्या नियुक्तीला पक्षातूनच विरोध झाल्याचं बघायला मिळालं होतं.
मात्र राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सिद्धू यांना अध्यक्षपद मिळवं यासाठी आग्रही होते. आणि अखेरीस त्यांच्याच समर्थनामुळे सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर सरकार देखील वाचल होतं.
अलीकडेच सिद्धू सातत्यानं राज्य सरकारच्या विरोधातच वक्तव्य करत असल्याने पुन्हा एकदा प्रियांका गांधी सिद्धू भेट झाली होती. त्यानंतर मागच्या १५ दिवसांपासून सिद्धू शांत आहेत. त्यांनी अधिवेशनात देखील सहभाग घेतला होता.
३. छत्तीसगड संघर्ष :
मागच्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये देखील वर्चस्ववाद सुरु होता. राज्यात ९० पैकी काँग्रेसचे ७० आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थिर आहे. मात्र सिंह देव यांनी बघेल यांना हटवण्यासाठी मोर्चा उघडला होता. त्यांचा दावा होता कि २०१८ मधील वचनानुसारअडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद त्यांना मिळावं.
मात्र १५ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी ऍक्टिव्ह झाल्या आणि त्यांनी भेटीगाठी सुरु केल्या. बघेल आणि प्रियांका गांधी यांची पहिली भेट झाली होती, १० जनपथवरील सोनिया गांधी यांच्याशी. त्यानंतर १२ तुघलक रोडवरील राहुल गांधी यांची देखील भेट झाली. जवळपास ३ तास चाललेल्या या भेटींच्या सत्रानंतर अजून तरी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदावर भूपेश बघेलच आहेत.
त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा उत्तरप्रदेशमधील प्रियांका गांधी यांच्या कामगिरीवर लागलं आहे. या अडचणींच्या काळात जशा प्रियांका गांधी धावून आल्या, तशाच त्या उत्तरप्रदेशमध्ये देखील यशस्वी होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
हे हि वाच भिडू
- प्रियांका गांधी यूपी निवडणुकांच्या आधी तिथे महाराष्ट्र मॉडेलचा प्रयोग करणार आहेत..
- विलासराव देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचा नाही
- शिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा केलीय, पण त्यांची ताकद किती?