मागची निवडणूक जवळपास जिंकणारी काँग्रेस गोव्यात आता एका आमदारापुरती उरलीय
टेकनिकली २ आमदार आहेत पण विश्वजित राणेंचं काय खरं दिसत नाहीए
अवघे ४० आमदार आणि २ खासदार असलेल्या गोव्यात जेवढा ड्रामा चालू आहे तेवढा उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यांना पण लाजवण्यासारखा आहे. ममतादीदी आणि केजरीवालांच्या एन्ट्री नंतर तर गोव्यात नुसता धिंगाणा माजलाय. रोज कोणीतरी एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये उडी मारतोय. फोडाफोडीच्या राजकारणानं गोव्यात कळस घातलाय. याचा सगळ्यात मोठा फायदा झालाय भाजपाला आणि सगळ्यात मोठा तोटा मात्र काँग्रेसला.
गोव्यामध्ये जेवढी काँग्रेसची वाताहत झाली असेल तेवढी देशात कुठंच झाली नसेल. २०१७ च्या निवडणुकीत ४० सीट्स असलेल्या गोवा विधानसभेत काँग्रेसला १७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता.
मात्र बहुमताला लागणाऱ्या ४ जागांचा पाठिंबा मात्र काँग्रेसला मिळवता आला नाही.
१३ जागा जिंकणारा भाजप अपक्ष आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या साह्याने सत्तेत बसला. मात्र काँग्रेसच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ इथेच थांबणारं नव्हतं.
पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या गोव्यात हॉटेल, रिसॉर्ट, कॅसिनो इत्यादींची मालकी बऱ्यापैकी राजकारण्यांकडे आहे. खाणकामतूनही राजकारणी मोठा फायदा काढतात. मात्र या धंद्यांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी राजकारण्यानं सत्तेचा आसरा पाहिजे असतो.
त्यामुळं गुलाल तिकडं चांगभलं असा गोव्याच्या राजकारणाचा जुना पॅटर्न आहे.
सत्तेसाठी याआधीही आमदारांनी पक्ष बदललं आहे. मात्र २०१७ नंतर काँग्रेसची जी हालत झाली आहे त्याना जुने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
ऑक्टोबर 2018 मध्ये, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे या काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसला गळती लागायला सुरवात झाली. मात्र ह्यापेक्षा पण बुरे दिन काँग्रेसला यायचे होते.
जुलै 2019 मध्ये, तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवलेकर यांनी आणखी दहा आमदार घेऊन पक्ष सोडला.
या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजप आता स्वबळावर पक्ष स्थापन करू शकलं.काँग्रेस फोडण्यात भाजपाच आघाडीवर होतं असं नाही. अगदी निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसनं लुईजिन्हो फलेरियो या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनाच आपल्या पक्षात ओढलं. काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचा नावाचं घेत नाहीए. आता माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनीहि काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये शामिल झालेत. अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को या आमदाराने तर आता काँग्रेसनं विधानसभेचं तिकीट दिल्यांनतरही राजीनामा दिलाय.
आताच्या घडीला काँग्रेसमध्ये फक्त दोन आमदार राहिलेत. दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे हे दोन माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये आहेत.
त्यातही प्रतापसिंह राणे यांचा मुलगा विश्वजीत राणे भाजपच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळं प्रतापसिंह राणे यांच्या भाजपा प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं बोललं जातंय. स्वतः प्रतापसिंह राणे मात्र पण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं सांगतायत. मात्र भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीच राणे कुटुंबीयांबरोबर जेवण घेतल्यांनंतर प्रतापसिंह राणे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बोलून दाखवलेय.काँग्रेसनं पण प्रतापसिंह राणे यांना विधानसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव दिले नाहीए.
काँग्रेसनं आता विजय सरदेसाई यांच्याबरोबर युती करून लढायचं ठरवलंय. मात्र आप आणि तृणुमल काँग्रेसच्या पारंपरिक मतांवर डल्ला मारेल आणि काँग्रेससाठी हि निवडणूक अवघड जाईल असा कयास राजकीय विश्लेषक बांधतायत. ‘त्यामुळं मी पुन्हा येइन ‘ची घोषणा फडणवीस गोव्यात खरी करून दाखवतील अशी चर्चा गोव्याचा राजकीय वर्तुळात आहे.
Webtitle: Congress in goa : largest party congress on the verge of reducing to just one mla in goa