तरुण नेते जात आहेतच पण ज्यांनी आपली उभी हयात पक्षात घातली तेही काँग्रेस सोडतायेत
“तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आलं. तर ज्यांना कोणताच अनुभव नाहीये असे नेते पक्षाचा कारभार पाहू लागले.”
सोनिया गांधींना लिहलेल्या ५ पाणी राजीनामा पत्रात असे अनेक आरोप करत गुलाम नबी आझाद यांनी आज अखेर काँग्रेसचा आज राजीनामा दिला.
अखेर म्हणण्याचं कारण म्हणजे फेब्रुवारी २०२१ ला पक्षाने जेव्हा त्यांना राज्यसभेची नवीन टर्म नाकारली होती तेव्हापासूनच आझाद पक्ष सोडणार अशा चर्चा होत्या. राज्यसभेतील फेअरवेलच्या भाषणात आझादांना रडू कोसळलं होतं आणि नरेंद्र मोदींसहित भाजपातील इतर नेत्यांनी त्यावेळेस आझाद यांच्या सार्थनार्थ भाषणं केलं होती.
त्यात आझाद काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी काँग्रेसनेतृत्वा विरोधात स्थापन केलेल्या G -२३ गटाचा देखील ते भाग होते. मात्र एवढा सगळं असूनही काल परवापर्यंत ते राहुल गांधींबरोबर प्रदर्शनात सहभागी झाली होते आणि आज अखेर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
गुलाम नबी आझाद काँग्रेसच्या जेष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक होते ज्यांनी इंदिरा गांधींपासून गांधी घराण्याच्या सर्व पिढ्यांबरोबर काम केलं आहे.
गुलाम नबी काँग्रेस नेतृत्वाच्या जवळ पोहचले जेव्हा ते संजय गांधींच्या काळात युथ काँग्रेसमध्ये काम करत होते. इमर्जन्सीनंतर काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी जेव्हा आणीबाणीच्या काळात झालेल्या कुकर्मांसाठी युथ काँग्रेसला जबाबदार धरलं होतं तेव्हा अनेक युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलं मात्र नबी चिटकून राहिले.
त्यावेळी दिल्लीत राहत असताना आझाद हे केवळ पाव आणि केळ्यांवर आपली भूक भागवत असत.
अनेकदा तेही नं मिळाल्याने गुलाम नबी आझाद यांच्या आतड्याना त्या काळात जखमा झाल्या आणि त्यांना त्यावेळी झालेली हि बाधा पुढे देशाचे हेल्थ मिनिस्टर झाल्यानंतर अगदी नामवंत डॉक्टरांकडून उपचार घेऊनही बारी झाली नाही.
अशा काठीन काळात पक्षाबरोबर असणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी पुढे जाऊन पक्षातर्फे खासदारकी १९९६ ते २०२१ पर्यंत राजसभेची खासदारकी त्याचबरोबर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री पुढे केंद्रात कॅबिनेट मंत्री आणि सत्ता गेल्यानंतर रिटायर होईपर्यंत राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद अशी पद त्यांनी पक्षनिष्ठेच्या जोरावर मिळवली.
मात्र अखेर त्यांनी जवळपास ५ दशकांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीनंतर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. येत्या काही महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे कॅप्टन अमरिंदर यांच्यासारखेच ते आपली स्वतंत्र पार्टी काढतील असं बोललं जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग
मात्र गेल्या काही वर्षात गुलाम नबी आझादांसारखंच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बाहेरची वाट धरली आहे. अशीच निवडणुकीच्या आधी पक्ष सोडला होता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी.
“ना थकलो आहे , ना निवृत्त होत आहे ”
अमरिंदर सिंग यांनी 2 नोव्हेंबर २०२१ रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास भाग पाडल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला तेव्हा ठामपणे सांगितले होते.
२०१७ मध्ये मोदी लाट एकहाती थांबवत अमरिंदर तिसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेसमधले एक हेवीवेट नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पटियाला राजघराण्याचे वंशज असणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागही घेतला होता. १९८० मध्ये राजीव गांधींशी अगदी डून स्कुलपासून असलेल्या मैत्रीमुळे ते राजकारणात आले.
अमरिंदर सिंग 1980 मध्ये काँग्रेसचे खासदार बनले आणि ऑपरेशन ब्लूस्टार होण्यापूर्वी पंजाबला मदत वाटाघाटीत सामील देखील झाले.
मात्र 1984 सुवर्ण मंदिरात आर्मी घुसवल्यानंतर त्यांनी खासदारकी आणि पक्ष या दोन्हींचा राजीनामा दिला. 1998 मध्ये सिंग पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. सोनिया गांधींनी त्यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष बनवलं आणि त्यानंतर पंजाब काँग्रेस म्हणजे अमरिंदर असं इक्वेशन बनलं. ते 2002 मध्ये पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ केला. एका दशकानंतर 2017 मध्ये, ते पुन्हा सत्तेवर आले.
काँग्रेसमध्ये असताना जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या दिग्गजांनी गांधी नेतृत्वाला आव्हान दिले तेव्हा तेव्हा अमरिंदर गांधी कुटुंबाच्या समर्थनार्थ उभे राहिले.
मात्र आपल्या राजानाम्याच्या पत्रात त्यांनी लिहलं होतं की ” सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्या वागण्याने मला “खूप दुःख” झाले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मी लहानपनापासून ओळखतो कारण त्यांचे वडील माझे लहानपानपासून मित्र होते” म्हणजे शेवटी आझादांसारखाच नबी यांनी गांधी घराण्यावर टीका करून राजीनामा दिला होता.
कपिल सिब्बल
अजून एका जेष्ठ नेत्याचा यामध्ये समावेश होतो तो म्हणजे कपिल सिब्बल. ” काँग्रेसशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला असल्याने मी आता काँग्रेसबद्दल काही बोलणार नाही. पक्ष संघटना सोडल्यानंतर पक्षाबद्दल काही बोलणं आपल्या राजकीय संस्कृतीला धरून नाही असं म्हणत कपिल सिब्बल यांनी पक्ष संघटनेचा राजीनामा दिला”
त्यानंतर त्यांनी जरी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभा मिळवली असली तरी त्यांनी पक्षात प्रवेश केला नाही. कपिल सिब्बल यांनी राजकारणातील आपल्या जेष्ठतेला अनुसरुन पक्ष सोडताना आपली हयात घातलेल्या काँग्रेसवर टीका करणं टाळलं. मात्र पक्षात असेपर्यंत अनेकदा पक्षाला शालजोडीतून देत होते. पक्ष नेतृत्वाच्या विरोधात संतपण झालेल्या G-२३ चे ते सक्रिय सदस्य होते.
”गांधींनी बाजूला सारून दुसऱ्या नेत्याला पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी…… मला ‘सब की काँग्रेस’ हवी आहे. काहींना ‘घर की काँग्रेस’ हवी आहे” असं वक्तव्य पक्ष सोडण्याची काही महिने आधी कपिल सिब्बल यांनी केलं होतं. यावरून पक्षात जोरदार गदारोळ उडाला होता.
मात्र शेवटी ३० वर्षे पक्षासाठी दिल्यानंतर कपिल सिब्बल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
जुलै 1998 मध्ये राजदच्या उमेदवारीवर सिब्बल पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2004 आणि 2009 मध्ये चांदनी चौकातून ते लोकसभेचे खासदार होते. त्यानंतर त्यांनी मग राज्यसभेची वाट धरली. UPA-1 च्या काळात त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री बनवण्यात आले आणि UPA-2 मध्ये त्यांना आधी HRD आणि नंतर दूरसंचार मंत्री करण्यात आले.
त्याचबरोबर काँग्रेसच्या लीगल टीमचा कपिल सिब्बल अविभाज्य भाग होते. मात्र पक्षात डावललं जात असल्याचं पाहून त्यांनी अखेरच्या क्षणी आपल्या इतर पक्षातील कॉन्टॅक्टस वापरून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
अश्विनी कुमार
यामध्ये चर्चा नं झालेलं पण जेष्ठ नेत्यांमधील अजून एक नाव म्हणजे अश्विनी कुमार. “माझ्या या प्रकरणाचा विचारपूर्वक विचार केल्यावर, मी असा निष्कर्ष काढला आहे की सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेला अनुरूप, मी पक्षाच्या बाहेरील देशाची सेवा करू इच्छितो” असं गोलमटोल कारण देत अश्विन कुमार यांनी काँग्रेस सोडली त्यामुळे त्याची एवढीं चर्चा झाली नाही.
पान राजकीय जाणकारांसाठी हा धक्का होता.
ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कट्टर निष्ठावंत होते आणि चार दशकांहून अधिक काळ पक्षात काम करत होते.
G 23 नेत्यांनी त्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये त्यांना पत्र लिहून पक्षात व्यापक बदल करण्याचे आवाहन केले तेव्हा त्यांनी गांधींचा जोरदार बचाव केला होता.
1976 मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सहसचिव म्हणून कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एका दशकानंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1990 मध्ये चंद्रशेखर सरकारने त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले तेव्हा ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.
केंद्रात त्यांची एंट्री झाले जेव्हा ते 2002 मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले आणि 2016 पर्यंत ते राज्यसभेत राहिले. ते UPA I आणि UPA II या दोन्हींमध्ये मंत्री होते. गांधी घराणं सांगतील तीच ऊत्तर दिशा मानणाऱ्यांपैकी एक ते होते.
मात्र राजीनाम्यानंतर त्यांनी देखील इतर नेत्यांसारखंच मत व्यक्त केलं.
”पक्षाला सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी जेष्ठता आणि गुणवत्ता यांचा मेळ घालण्यात यावा. पक्षातील ज्येष्ठांना डावललं जाऊ नये”
असा सल्ला त्यांनी दिला होता. काँग्रेसमधून अलीकडच्या काळात ज्योतिरादित्य सिंधिया,अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल, आरपीएन सिंग, कुलदीप बिश्नोई, राजू परमार, कोमाती रेड्डी राजगोपाल रेड्डी, जयवीर शेरगिल या तरुण नेत्यांनी काँग्रेसमध्ये राजकीय भवितव्य नसल्याने राजीनामा दिला आहे.
त्यामुळं जेष्ठांना डावललं जातंय आणि तरुणांना भविष्य नाही अशी काँग्रेसची एकंदरीत विचित्र अवस्था झाल्याचं दिसतंय.
हे ही वाच भिडू :
- २४ वर्षानंतर काँग्रेसला नॉन-गांधी अध्यक्ष मिळू शकतोय, हे आहेत ५ पर्याय
- घर-घर तिरंगा फडकवण्याचा अधिकार देणारे मोदी नव्हते तर काँग्रेसचा हा खासदार होता..
- योगी आणि महाराजांना पहिल्यांदा संसदेत कोणी एंट्री दिली असेल तर ती काँग्रेसनेच