शो बॅन झालेल्या कॉमेडीयन्सला दिग्विजय सिंगांनी स्वतःवर जोक मारायला बोलवलंय…

जोक ऐकायला आणि जोक करायला आपल्या सगळ्यांना आवडतंय. कॉलेज, शाळा, चौक, पान टपरी, मंद उजेडातलं टेबल अशा कुठल्याही ठिकाणी ग्रुप बसला… की कुठल्यातरी एका कार्यकर्त्यावर जोक होतोच. ते गाभडं जरा निवांत असलं, तर आपल्यावर होणाऱ्या जोकची ते सुद्धा मजा घेतं. एखादं सनकी असलं आणि त्याच्यावर जोक झाला की ते आदळाआपट करणार हे फिक्स.

सोशल मीडियामुळं आपल्या विनोदाच्या कक्षा जरा जास्तच रुंदावल्या आहेत. एका क्लिकवर आपण जगभरातले विनोद पाहतो. त्याच्यावर हसतो किंवा ऑफेंड होतो. ऑफेंड होण्याची आणि विनोद पचवण्याची प्रत्येकाची लेव्हल वेगळी असणं साहजिकच आहे म्हणा.

हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे, भोपाळमध्ये झालेला एक किस्सा. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल किंवा पेपरची सगळी पानं वाचत असाल, तर तुम्हाला कुणाल कामरा आणि मुन्नवर फारुखी ही दोन नावं फिक्स माहिती असणार. ज्यांना माहीत नसेल, त्यांनी गुगल करायला जाऊ नका, आम्ही सांगणार की.

तर कुणाल कामरा आणि मुन्नवर फारुखी हे दोघं आहेत स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स. यांच्या शोमध्ये हे स्टेजवर उभे राहतात आणि लोकांना जोक सांगतात. हे जोक कधी स्वतःवर असतात, कधी समोर बसलेल्या लोकांवर, कधी राजकारण्यांवर असतात, तर कधी पौराणिक कथांवर. हे विनोद प्रत्येकाला पचतातच असं नाही.

मुन्नवरच्या एका जोकवर भडकलेल्या भाजप कार्यकत्यानं त्याचा शो बंद पाडला होता. त्यानंतर, त्याचे शो रद्द होण्याची मालिकाच सुरू झाली. दिवंगत कन्नड अभिनेता पवनकुमारच्या ट्रस्टला मदत करण्यासाठी मुन्नवरच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बंगळुरू शहर पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली.

‘मुनव्वर ही एक वादग्रस्त व्यक्ती आहे आणि हिंदू संघटनांशी झालेल्या त्याच्या वादामुळं आम्ही या कार्यक्रमाला परवानगी नाकारत आहोत,’ असं पोलिसांनी सांगितलं. हिंदू जनजागृती समिती आणि श्रीराम सेना या संघटनांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल मुनव्वर विरोधात तक्रार दाखल केली आहे. काही महिन्यांपूर्वीच मुनव्वरला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती, त्याला जवळपास महिनाभर जेलमध्ये रहावं लागलं होतं.

या सर्व घटनांनंतर, मुनव्वरनं आपले शोज सातत्यानं रद्द होत असून आपण या सगळ्याला कंटाळलो आहोत. यामुळंच आपण कॉमेडी करणं सोडणार आहोत, अशा आशयाची पोस्ट केली होती.

आपल्या राजकीय विनोदांमुळं कायम चर्चेत असणाऱ्या कुणाल कामरालाही अशाच विरोधाला सामोरं जावं लागलंय. ‘बंगळुरूमध्ये होणारे आपले कॉमेडी शोज रद्द करण्यात आले आहेत, माझे शो दोन गोष्टींमुळं रद्द होत आहेत. ज्या हॉलमध्ये ४५ पेक्षा जास्त लोकं बसू शकतात, तिथं ४५ लोकं बसवण्याची परवानगी आम्हाला मिळत नाही. जर मी त्या ठिकाणी परफॉर्म केलं, तर तो हॉल कायमचा बंद करण्यात येईल अशी धमकीही देण्यात आली आहे.’ अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं आहे.

या सगळ्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय, तो काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्यामुळं. त्यांनी कुणाल आणि मुनव्वरला उद्देशून एक ट्विट केलंय. ते म्हणाले, ‘तुम्हा दोघांसाठी मी भोपाळमध्ये एका शोचं आयोजन करतो. सगळी जबाबदारी माझी असेल. माझी फक्त एकच अट आहे, की विनोदाचा विषय फक्त दिग्विजय सिंगच असावा. यावर तरी संघी लोकांना काही आक्षेप नसेल. तुम्हा दोघांच्या सोयीनुसार या, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत.’

आता दिग्विजय सिंगांच्या या प्लॅनवरुन राजकारण पेटलं नसतं, तर आश्चर्य वाटलं असतं. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी टीकेची तोफ डागली आहे. ‘दिग्विजय सिंग यांना कॉमेडीच करायची असेल, तर त्यांनी बटाट्यापासून सोनं बनवणाऱ्यांना घेऊन यावं. पुंजीपतीला पूजापती म्हणणाऱ्या घेऊन यावं. आमच्या मध्य प्रदेशमध्ये देवतांचा अपमान करणाऱ्यांचा कुठला शो झाला, तर त्यांची जागा जेलमध्ये असेल. आंही कुठल्याही ही किंमतीत कुणालाही आमच्या भावनांशी खेळण्याची परवानगी देणार नाही,’ असं राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधणारे मिश्रा म्हणाले आहेत.

त्यामुळं आता भोपाळमध्ये कुणाल आणि मुनव्वरचा शो होणार का? हे दोघं दिग्विजय सिंगांचं आमंत्रण स्विकारणार का? आणि यांनी दिग्विजय सिंगांवर जोक केलेच, तर ते ऑफेंड होणार का? हे पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

 

English Summary: Congress leader Digvijay Singh sent a tweet to Kunal and Munavvar. He said, ‘I am organizing a show in Bhopal for both of you. I will be responsible for everything. My only condition is that the subject of humor should be Digvijay Singh only. Sanghi people will have no objection to this. Come at your convenience, I agree to all your terms.

 

Web title: Congress leader Digvijay Singh welcomes comedians Kunal Kamra and Munawar Farooqui for show in Bhopal

Leave A Reply

Your email address will not be published.