पापा मोदींच्या त्यागामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद टिकलंय…

महाराष्ट्रानं २०२० च्या निवडणुकांमुळं अनेक वेगवेगळ्या घडामोडी अनुभवल्या. भाजप आणि शिवसेनेचं बंधुत्व तुटेल, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना एकत्र येतील असं भल्याभल्या राजकीय पंडितांनाही वाटत नव्हतं. पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतोय.

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांना सहा महिन्यांत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहावर निवडून जाणं बंधनकारक होतं. विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या  ठाकरे यांची बिनविरोध निवड होईल असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला. महाविकास आघाडीनं त्यादृष्टीनं प्रयत्नही सुरू केले होते.

हे यशस्वीपणे पार पडण्यासाठी काँग्रेसनं एकच उमेदवार उभा करणं अपेक्षित होतं. मात्र राजेश राठोड यांच्यासह काँग्रेसनं राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळं उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून येण्यात अडचणी तयार झाल्या.

मुदत संपत आल्यानं चिंतेत आणखी वाढ झाली. काँग्रेस आणि पापा मोदी काय निर्णय घेतायत याकडे शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विशेषतः भाजपचं लक्ष होतं. काँग्रेसनं अंतर्गत सूत्रं हलवली आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची उमेदवारी मागं घेत असल्याचं सांगितलं.

पापा मोदी यांनी उमेदवारी मागं घेतली नसती, तर ठाकरे बिनविरोध निवडून येण्यात अडथळा निर्माण झाला असता. निवडून येण्याची मुदत संपत आल्यानं त्यांच्या पदाला धोका होता. मात्र पापा मोदी यांनी विधान परिषदेत जाण्याच्या स्वप्नाचा त्याग केला आणि ठाकरे यांचा मार्ग मोकळा राहिला.

संविधानाचा नियम काय सांगतो?

संविधानानुसार, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यानं शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्यत्व मिळवावं लागतं, यात अपयश आलं तर राजीनामा द्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना २८ मे २०२० या दिवशी पदग्रहण करून सहा महिने पूर्ण झाले. विधानपरिषदेची निवडणूक २१ मे रोजी पार पडली आणि पापा मोदी यांनी माघार घेतल्यानं उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून आले.

पापा मोदी सध्या चर्चेत का आलेत?

पापा मोदी हे बीड जिल्ह्यातलं मोठं नाव. ते बीड काँग्रेसचे अध्यक्ष आणि जालना जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. त्यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेक राजकीय तज्ज्ञांच्या मते हा काँग्रेससाठी मोठा धक्का असून, राष्ट्रवादीचं बळ आणखी वाढणार आहे.

हे ही वाच भिडू:

 

1 Comment
  1. Suryaji Sankpal says

    Beed congress che Adhyaksh ani Jalna z p che member……..

Leave A Reply

Your email address will not be published.