प्रियांका गांधींची प्रतिज्ञा काँग्रेसला तारणार का?

उत्तर प्रदेशचं राजकारण नेते, सत्ता, पैशे, धर्म या गोष्टींसोबतच आणखी एका गोष्टीभोवती फिरतं ती म्हणजे यात्रा. पार राम जन्मभूमी आंदोलनापासून सुरू असलेला हा यात्रांचा दबदबा आजही सुरूच आहे. आता २०२२ चं इलेक्शन तोंडावर असताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांनी प्रचाराची सुरुवात यात्रेद्वारे केली आहे.

प्रियांका गांधी काढणार ‘प्रतिज्ञा यात्रा’

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांनी शनिवारी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडत प्रतिज्ञा यात्रेला सुरुवात केली. याआधीच ४० टक्के उमेदवार महिला असतील, अशी घोषणा करत त्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ बाराबंकीपासून केला.

सात आश्वासनं

आता इलेक्शन म्हणलं की आश्वासनं तर आलीच. प्रियांका गांधींनीही या यात्रेला सुरुवात करताना सात मुख्य आश्वासनं दिली आहेत. यात ४० टक्के महिला उमेदवारांसोबतच, शाळकरी मुलींना ई-स्कुटी आणि मोबाईल फोन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, गरीब कुटुंबांना प्रतिवर्षी २५ हजार रुपयांची मदत, सर्वांसाठी अर्धं वीज बिल आणि कोविड कालावधीतील प्रलंबित वीज बिलांना पूर्ण माफी अशा आश्वासनांचा समावेश आहे.

राज्यात २० लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणं, गहू आणि तांदळाला प्रति क्विंटल २५०० रुपये किमान आधारभूत किंमत आणि कोविड-१९ चा फटका बसलेल्या कुटुंबांना ऊसासाठी ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळेल.

काँग्रेसचा चेहरा

आगामी निवडणुकांसाठी प्रियांका गांधी हा काँग्रेसचा चेहरा आहेत. त्यांनी बाराबंकी येथून यात्रेला सुरुवात करताना तिथल्या महिला शेतकऱ्यांशी संवांदही साधला. त्यांच्या कामाची परिस्थिती समजून घेत, त्यांच्या मुली शिक्षण घेत आहेत का आणि महिला शेतकरी मुलींना शिक्षण देण्यास समर्थ आहेत का? याची चौकशीही त्यांनी केली. महिला सबलीकरणाचा प्रमुख मुद्दा घेऊन काँग्रेस या निवडणुकीत उतरली आहे. २०१७ च्या इलेक्शनमध्ये त्यांना जबरदस्त अपयश आलं होतं. त्यांनी १०५ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यातले फक्त सात उमेदवार निवडून आले. यावेळी भाजप, बसप, सपा आणि काँग्रेस अशी चौरंगी लढाई आहे. त्यात काँग्रेसचं आव्हान टिकवण्याचं शिवधनुष्य प्रियांका गांधी यांना पेलावं लागणार आहे.

अशी असणार आहे प्रतिज्ञा यात्रा

ही यात्रा २३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत पार पडेल. उत्तर प्रदेशमध्ये एकूण १२ हजार किलोमीटरचा प्रवास पार पडेल. या रॅलीत पत्रकार परिषदा, नुक्कड सभा, मंदिर भेटी, रोड शो आणि जनसभा होतील.

प्रतिज्ञा यात्रेचा पहिला टप्पा बुंदेलखंडमधल्या बाराबंकीपासून सुरू होईल आणि लखनौ, उन्नाव, फतेहपूर, चित्रकूट, बांदा, हमीरपूर, जालौन या मार्गानं झाशी इथं संपेल.

राज्याच्या पश्चिम भागात यात्रा सहारनपूरपासून सुरू होऊन मुझफ्फरनगर, बिजनौर, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायूं, अलिगड, हाथरस, आग्रा असा प्रवास करत मथुरेत समाप्त होईल. त्याचप्रमाणं, अवध प्रदेशात, वाराणसीपासून सुरू होणारी यात्रा चंदौली, सोनभद्र, मिर्झापूर, प्रयागराज, प्रतापगड, अमेठीमार्गे जाऊन रायबरेलीला पोहोचेल.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची रॅली, भाजपचा आक्रमक प्रचार यासमोर प्रियांका गांधींची प्रतिज्ञा यात्रा काँग्रेसला तारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.