युपीमध्ये एकेकाळी बलस्थान असलेले ब्राम्हण चेहरे काँग्रेस आता गमावून बसलीय..

उत्तर प्रदेशात आगामी वर्षात विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी पासून रणनीती आखण्यापर्यंत सर्वच पक्ष तयारीला लागलेत. मात्र, निवडणुकीपूर्वी जसं राजीनाम्याचं, सत्तांतराचं सत्र दरवेळी पाहायला मिळत. तसंच काहीसं आताही पाहायला मिळतंय. ज्यात नेहमीप्रमाणं काँग्रेस आघाडीवर आहे.

गेल्या आठवड्यात चार पिढ्यांपासून सोबत असलेल्या त्रिपाठी घराण्यानं काँग्रेससोबतचे आपले संबंध तोडले. ललितेश पती त्रिपाठी यांनी काही दिवसांपूर्वीचं पक्षातल्या सगळ्या पदांवरून राजीनामा दिला होता. त्यांनतर त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट काँग्रेसला राम- राम ठोकत असल्याचं सांगितलं.  त्रिपाठी यांचा पूर्व उत्तर प्रदेशात दबदबा होता.

आता त्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा फटका तर बसलाचं आहे. पण सोबतच पक्षाने उत्तर प्रदेशात  आपला आणखी एक  ब्राह्मण चेहरा गमावलायं. 

गेल्या पाच वर्षांत, रिटा बहुगुणा जोशी, जितिन प्रसाद आणि दिवंगत एन डी तिवारी यांच्यासोबत अनेक प्रभावी ब्राह्मण नेत्यांनी त्यांच्या समर्थकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत पक्षातून बाहेरची वाट पकडली. ज्यात नुकताच ललितेश पती त्रिपाठी यांचंही नाव जोडलं गेलं.

ललितेश पती त्रिपाठी हे उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे पणतू. म्हणजे कमलापती  यांच्या पासून सगळ्या पिढ्या काँग्रेससोबत होत्या. कमलापती यांचा मोठा मुलगा लोकपती त्रिपाठी हे देखील उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनतर लोकपती यांचा मुलगा राजेश पती यूपीमध्ये एमएलसी होते. नंतर २०१२ मध्ये राजेश यांचा मुलगा ललितेश काँग्रेसच्या तिकिटावर मिर्झापूरमधून आमदार झाले. 

ललितेश यांचा कार्यकर्ता गट खूप मोठा आहे. ते प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.  पण पक्षात आपल्याकडे दुर्लक्ष केले जातेय, असं म्हणत ललितेश  यांनी काँग्रेस सोडली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हंटलं कि,

“जेव्हा कठीण काळात पक्षाच्या पाठीशी उभे राहिलेले समर्पित कार्यकर्ते बाजूला केले जात आहेत, तेव्हा अशा परिस्थितीत, पक्षात राहण्याचे कोणतेही औचित्य नाही.सामायिक इतिहासामुळे हा एक कठीण निर्णय होता.”

प्रसाद कुटुंब

त्याच वर्षी, यूपी काँग्रेसचा आणखी एक ब्राह्मण चेहरा – जितिन प्रसाद यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांचं पक्षातून बाहेर जात भाजपमध्ये जाणं लकी ठरलं.  कारण आता योगी आदित्यनाथ यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे. भाजप त्यांना विधान परिषदेत निवडून आणणार आहे.

पण,  माजी केंद्रीय मंत्री जितिन हे एकेकाळी राहुल गांधींचे निकटवर्तीय होते. एवढंच नाही तर त्यांचे वडील जितेंद्र प्रसाद हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते. ते राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंह राव या दोन माजी पंतप्रधानांचे राजकीय सचिव होते. १९९५  मध्ये ते UPCC चे अध्यक्षही होते. सोबतचं जितेंद्र प्रसाद  यांनी सोनिया गांधींच्या विरोधात २००० मध्ये पक्षाध्यक्षांची निवडणूक लढवली होती.

तर, जितेंद्र यांचे वडील ज्योती प्रसाद हे काँग्रेसचे एमएलसी होते. 

त्यानंतर आता जितीन प्रसाद हे काँग्रेसच्या बाजूने आखाड्यात होते. २००४ मध्ये जितीन याना पहिल्यांदा तिकीट मिळाले, आणि त्यांनी निवडणूक जिंकली. २००८ मध्ये, यूपीए -१  च्या काळात त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आले. यूपीए २ मध्ये त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आले. पण २०१४ ते २०१९ दरम्यान ते सलग तीन निवडणुका हरले. यूपी काँग्रेसचे प्रमुख होण्याची शक्यता असलेल्यांमध्ये त्यांचे नावही होते, परंतु पक्षाने त्यांची निवड केली नाही.

जितिन प्रसादच्या जाण्यामागचे कारण ‘टीम प्रियांका’ असल्याचे म्हंटले जाते. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे सहकारी  सतत जितीन यांना बाजूला करत होते.

बहुगुणा कुटुंब
सध्या भाजप खासदार असलेल्या रीता बहुगुणा जोशी यांनी २०१६ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला. २००७ ते २०१२ दरम्यान त्या UPCC च्या प्रमुख होत्या.

रीता हेमवती नंदन बहुगुणा यांच्या कन्या आहेत, सध्याचे उत्तराखंड प्रदेशाचे ते नेते होते. ज्यांनी १९७३ ते १९७५ अविभाजित यूपीचे मुख्यमंत्री होते. १९७७ मध्ये, जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि लोकसभेच्या नव्याने निवडणुका घेण्याचे आवाहन केले, तेव्हा बहुगुणांनी काँग्रेस सोडलं आणि बाबू जगजीवन राम आणि नंदिनी सतपथी यांच्यासह काँग्रेस फॉर डेमोक्रेसी (CFD) हा नवीन पक्ष स्थापन केला. १९८४ मध्ये त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अमिताभ बच्चन यांच्या विरोधात भारतीय लोक दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले.

हेमवती नंदन यांचा मुलगा विजय बहुगुणा २०१२ ते २०१४ पर्यंत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. ते टिहरी गढवालमधून दोन वेळा खासदारही होते. २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि नंतर त्याच वर्षी रीताही काँग्रेसमधून बाहेर पडल्या. आता दोघेही भाजपमध्ये आहेत.

असे म्हंटले जाते कि, रिटा आणि विजय दोघेही सतत दुर्लक्ष होत असल्याच्या कारणाने पक्षात नाराज होते. 

एन डी तिवारी निरोप

उत्तराखंड भागातले आणखी एक दिग्गज नारायण दत्त तिवारी.  जे तीन वेळा उत्तर प्रदेश आणि एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, त्यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. तिवारी हे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते जे आंध्र प्रदेशचे राज्यपालही राहिले होते.

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या राजवटीत त्यांचा मुलगा रोहित शेखर यूपी परिवहन विभागाचा सल्लागार म्हणून नियुक्त झाला. पण, २०१७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या थोड्या वेळापूर्वीच तिवारी, त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आता, हे सगळे दिग्गज नेते उत्तर प्रदेशातले मोठे ब्राम्हण चेहरे मानले जायचे. ज्यामुळे राज्यातील ब्राम्हण वोट आपल्याकडे खेचायला पक्षाला सोपं पडतं होत.  या कुटुंबांमुळे संपूर्ण राज्यात काँग्रेसची ब्राह्मण मतांवर पकड होती. काँग्रेस ही ब्राह्मणांची पहिली पसंती होती, पण आता पक्षातले बहुतेक ब्राह्मण नेते पक्ष सोडून गेले आहेत.

 काँग्रेसने  आपला फोकस बदलून ओबीसीवर हलवल्याचे बोलले जातेय.

पक्षात आता ब्राम्हण नेत्यांच्या नावाने फक्त प्रमोद तिवारी, त्यांची मुलगी आराधना मिश्रा आणि राजेश मिश्रा उरले आहेत. पण या नेत्यांची पकड फक्त आपल्या मतदार संघापुरती आहे.

त्यामुळे राज्यात पक्षाला ब्राह्मणा मतांसाठी धडपड करावी लागणार हे मात्र नक्की. 

हे ही वाचं भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.