काँग्रेसने विमानतळाला केम्पेगौडाचं नाव दिलं तर भाजपने पुतळा बांधला, त्यामागे हे गणित आहे
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगलोर विमानतळासमोर बनवण्यात आलेल्या केम्पेगौडाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. केम्पेगौडाचा हा पुतळा १०८ फूट उंच असून यासाठी १२० टन स्टील आणि ९८ टन काशाचा वापर करण्यात आला आहे.
ऐतिहासिक संदर्भांनुसार केम्पेगौडा हे बंगलोर शहराचे संस्थापक आहेत.
त्यांनी १५३७ मध्ये बंगलोर शहर वसवलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ जुलै २०१३ मध्ये काँग्रेस सरकारने बंगलोर विमानतळाला केम्पेगौडा यांचं नाव दिलं होतं होतं. तर भाजपकडून आता त्याच विमानतळासमोर केम्पेगौडा यांचा पुतळा आणि २३ एकरावर पार्क तयार करण्यात आला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनुसार हा पुतळा जगातील कोणत्याही शहराच्या संस्थापकांपैकी सगळ्यात मोठा पुतळा आहे.
पण केम्पेगौडाच्या या पुतळ्यावरून सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरु झाला आहे.
विमानतळाच्या जागेवर केम्पेगौडाचा पुतळा बांधण्यासाठी सरकारी पैशाचा वापर करण्यात आला आहे, हे योग्य नाही. असा आरोप कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.
तर कर्नाटकचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलंय की,
“बंगळूर विमानतळाला केम्पेगौडा यांचं नाव काँग्रेस सरकारनेच दिलं होतं. काँग्रेस सरकारनेच नादप्रभू केम्पेगौडा वारसा विकास प्राधिकरणाची स्थापना केली होती. एवढंच नाही तर काँग्रेसनेच केम्पेगौडा यांच्या जयंतीला सुरुवात केली होती. इथे पुतळा बनवण्याची संकल्पना सुद्धा काँग्रेस सरकारच्या काळातलीच आहे.”
शिवकुमार आणि सिद्धरामय्या या काँग्रेस नेत्यांपाठोपाठ जनता दल सेक्युलरचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीस सुद्धा भाजपवर टीका केली आहे.
ते म्हणाले की, “भाजप सरकार केम्पेगौडा यांचा पुतळा बनवून आगामी निवडणुकीत वोक्कलिग्गा समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हा त्यांचा भ्रम आहे, निवडणुकीमध्ये वोक्कलिग्गा समाजातील लोक त्यांचा भ्रम दूर करतील.”
एकीकडे काँग्रेस सरकारच्या काळात बंगलोर विमानतळाला केम्पेगौडा यांचं नाव देण्यात आलं, त्यांचा पुतळा बनवण्याची संकल्पना मांडली गेली होती. मग आज काँग्रेस आणि जेडीएसकडून यावर आक्षेप का घेतले जात आहेत.
तर यामागे दुसरं तिसरं काही नाही तर दक्षिण कर्नाटकमधल्या वोक्कलिग्गा बहुल जगाचं गणित दडलं आहे.
बंगळूरचे संस्थापक केम्पेगौडा हे वोक्कालिग्गा समाजातलेच होते, त्यामुळे या समाजातील लोकांसाठी केम्पेगौडा हे अस्मितेचं प्रतीक आहेत. केम्पेगौडा हे विजयनगर साम्राज्याच्या काळात असलेल्या दक्षिण कर्नाटकमधील प्रमुख सरदार होते. केम्पेगौडा यांना त्या काळातले सर्वात सुशिक्षित शासक म्हणून ओळखलं जातं.
केम्पेगौडा यांचा जन्म वोक्कलिग्गा समाजातील मोरासू गौडा वंशात झाला. तीन वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यामुळे अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांच्याकडे येलनहक्काचं प्रमुखपद सोपवण्यात आलं होतं. चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन राज्यकारभर चालवणारे केम्पेगौडा हे एकदा शिवनासमुद्रच्या भागात शिकारीवर गेले होते. या शिकारीदरम्यान केम्पेगौडा यांना राजधानीसाठी एका नवीन शहराची स्थापना करण्याची संकल्पना सुचली.
लागलीच विजयनगरचे शासक अच्युत राय यांची आज्ञा घेऊन केम्पेगौडा यांनी बंगलोर शहराची निर्मिती करण्यास सुरुवात केली.
पहिल्यांदा ५६० एकरावर पसरलेल्या या शहराच्या सभोवताल मातीची तटबंदी बांधण्यात आली होती. या तटबंदीच्या आत दोन प्रशस्त रस्ते बांधण्यात आले. तसेच तटबंदीच्या आत लाल दगडांचा वापर करून सात बुरुजांचा एक किल्ला बांधण्यात आला होता. शहरात एक सैनिक छावणी, मंदिरे आणि मोठ्या तलावाची निर्मिती केली होती.
यासोबतच जनावरं, कापूस, तांदूळ, नाचणी, धान्य यांच्या व्यापाराच्या पेठ वसवल्या होत्या. कुंभार, चांभार इथपासून पुरोहित ब्राह्मण या वेगवेगळ्या जातींसाठी वेगवगेळ्या पेठांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली होती. यासाठी त्यांनी दूरवरून कारागीर बोलावले होते. शहराच्या निर्मितीसोबतच आजूबाजूच्या पडीक जमिनीवर नांगर चालवून शेतीला सुरुवात केली होती.
पाणी, अन्न, व्यापार, सुरक्षा आणि सुंदरता या चारही गोष्टी लक्षात घेऊन केम्पेगौडा यांनी बंगलोर शहराची स्थापना केली होती. बंगलोरचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःची राजधानी येलनहक्कावरून बंगलोरला स्थलांतरित केली. अशा पद्धतीने बंगलोर शहर या जगाच्या पाठीवर उदयाला आलं.
केम्पेगौडा यांनी निव्वळ बंगलोर शहराची स्थापनाच केली नाही तर सामाजिक सुधारणा सुद्धा केल्या होत्या.
मोरासू वोक्कलिग्गा समाजात ‘बंदी देवारु’ नावाची एक परंपरा आहे. केम्पेगौडा यांच्या काळात या परंपरेत अविवाहित मुलींच्या हाताचे शेवटचे दोन बोट कापले जात होते. केम्पेगौडा यांनी या अमानवी परंपरेवर बंदी घातली होती. त्यामुळे महिलांची या परंपरेतून सुटका झाली होती. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानामुळेच वोक्कलिग्गा समाजातील लोक केम्पेगौडा यांना श्रद्धास्थान मानतात.
याचाच फायदा घेण्यासाठी भाजप सरकारने विमानतळासमोर केम्पेगौडा यांचा पुतळा बनवला आहे.
कर्नाटकच्या दक्षिण भागामध्ये वोक्कलिग्गा समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मैसूर, मांड्या, रामनगर, हसन, तुमकुरु, बंगलोर ग्रामीण, कोलार, चिक्कबल्लपुरा या जिल्ह्यांमध्ये वोक्कलिग्गा समाज प्रभावी आहे तर चिकमंगळूर आणि चामराजनगर जिल्ह्याच्या काही भागात सुद्धा वोक्कलिग्गा समाजाचे लोक राहतात.
वोक्कलिग्गा समाज पारंपरिकरित्या काँग्रेस आणि जेडीएसचा मतदार राहिला आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत वोक्कलिग्गा बहुल भागात भाजपला मोजकेच यश मिळालं होतं. काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांची या भागात मोठी पकड असल्यामुळे मर्यादित जागाच भाजपला मिळाल्या होत्या. आता हाच बॅकलॉग भरून काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.
वोक्कलिग्गा बहुल १० जिल्ह्यांमध्ये एकूण ६४ विधानसभा सीट आहेत.
या ६४ जागांपैकी सर्वाधिक २४ आमदार हे जेडीएसचे आहेत, त्यापाठोपाठ १९ जागा काँग्रेसकडे आहेत तर १७ जागा भाजपकडे आहेत. यातल्या ४ जागांवर अपक्षांच्या हातात आहेत. त्यातल्या २ अपक्षांना जेडीएसचा पाठिंबा आहेत तर १, १ अपक्षांना भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा आहे.
बंगलोर शहर सुद्धा याच भागात येतो पण शहरात वेगवेगळ्या जातींचे लोक राहतात. बंगलोर शहरात एकूण २८ विधानसभा सीट आहेत. यातल्या सर्वाधिक १५ जागा भाजपकडे आहेत, १२ जागा काँग्रेसकडे आहेत तर जेडीएसडे फक्त एकच जागा आहे.
१० जिल्ह्यातील ६४ जागा आणि बंगळूर शहराच्या २८ जागा मिळून एकूण ९२ जागा होतात. यातल्या काँग्रेसकडे सर्वाधिक ३५ जागा, भाजपकडे ३३ जागा आणि जेडीएसडे २७ जागा आहेत.
संपूर्ण कर्नाटकची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की काँग्रेस आणि जेडीएससाठी वोक्कलिग्गा समाज किती महत्वाचा आहे.
२०१८ च्या निवडणुकीत कर्नाटकात भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला ८० जागा मिळाल्या होत्या. तर जेडीएसच्या खात्यात ३७ जागा पडल्या होत्या. यात भाजपच्या एकूण जागांपैकी ३२ टक्के जागा या भागातल्या आहेत. काँग्रेसच्या ४४ टक्के जागा या भागातल्या आहेत तर जेडीएसच्या ७३ टक्के जागा वोक्कलिग्गा भागातल्या आहेत.
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी हे दोघेही वोक्कलिग्गा समाजातूनच आहेत. कर्नाटकमध्ये ११ टक्के लोकसंख्या असलेल्या या समाजाचा जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसला मोठा पाठिंबा आहे. या दोन पक्षांचा हाच पाठिंबा काढून घेऊन वोक्कलिग्गा समाजाला स्वतःकडे वळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. परंतु वोक्कलिग्गा समाज २०२३ च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला कौल देतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.
हे ही वाच भिडू
- राज्ये जातीय जनगणना करणार म्हणून सांगतात अन् ऐन टायमिंगला पलटी हाणतात..
- मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याला भेट दिल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पराभव झाला..?
- शहाजी महाराज नसते तर “बंगळूर” हे एक छोटसं खेडेगाव राहिलं असतं.