RSSची चड्डी जाळल्याचा फोटो काँग्रेसने टाकलाय पण RSS-काँग्रेस संबंध नेहमी टोकाचे नव्हतेच

साधारणं 1950-51 चा काळ. महात्मा गांधींची हत्या झाली होती. प्रमुख आरोपी नथुराम गोडसेला फासीची शिक्षा देखील झाली होती. या तणावातून पुढे जात भारतात स्वातंत्र्याची पायाभरणी होत होती. देश नव्या वाटेने जात होता..

याच काळात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या कानावर एक महत्वाची बातमी आली. ही बातमी होती संपूर्ण वेस्टर्न उत्तरप्रदेशात मुस्लीमांचा नरसंहार करण्याच्या प्लॅन असल्याची..

बर ही बातमी देखील साध्या व्यक्तीने दिली नव्हती. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बातमी घालणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं, तत्कालीन गृहसचिव राजेश्वर दयाल. युपीच्या डीआयजींनी तसाच रिपोर्ट गृहसचिवांना दिला होता व गृहसचिवांनी ती बातमी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली..

या बातमीत एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे मुस्लीमांचा नरसंहार करण्याच्या या प्लॅनमध्ये खुद्द तत्कालीन सरसंघचालक माधव गोळवळकर देखील सामील आहेत..

तुम्हाला काय वाटतं? या बातमीचं काय झालं असेल…

नेहरूंच्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या या मुख्यमंत्र्यांनी बघु बघु म्हणतं हा मुद्दा बासणात ठेवला. “कोणताही निर्णय न घेणं हा देखील एक निर्णय असतो” अस म्हणलं जातं. कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी नेमकं हेच केल.

हा किस्सा तत्कालीन गृहसचिव राजेश्वर दयाल यांनी आपल्या Life Of Our Times या पुस्तकात सांगितलेला आहे.. 

हा किस्सा आत्ता सांगण्याचं कारण काय.. तर संघाचे आणि कॉंग्रेसचे संबंध यावर होणारी चर्चा. चर्चा होण्याचं निमित्त ठरलेय ती भारत जोडो यात्रा. राहूल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेची प्रसिद्धी करताना कॉंग्रेसच्या ऑफिशियल पेजवरून खाकी चड्डीचा फोटो पोस्ट करण्यात आला. सोबत ही खाकी चड्डी जळताना दाखवण्यात आली व त्यावर लिहण्यात आलं की, 145 दिवस बाकी…

खाकी चड्डी ही संघाची ओळख. त्यामुळे हा बाण थेट संघाला टार्गेट करण्यात आला. गेल्या काही वर्षात राहूल गांधींची भूमिका पाहीली तर ती जितक्या टोकाची भाजपविरोधी राहिलेली आहे तितक्याचं टोकाची किंवा त्याहून अधिक टोकाची संघाच्या विरोधातली राहिलेली आहे अस दिसून येतं..

पण पुर्वीपासून संघ आणि कॉंग्रेसचं नातं असच होतं का? आणि असच होतं तर कॉंग्रेसच्या काळात संघ वाढलाच कसा? याच सर्व प्रश्नाची उत्तरं पाहण्यासाठी आपणाला इतिहास जावं लागतं…

सुरवातीला आपण गोविंद वल्लभ पंत यांच्या भूमिकेबद्दल बोललो. गोविंद वल्लभ पंत हे काही साधे नेते नव्हते. नेहरूंचे अत्यंत जवळचे नेते, युपीच्या राजकारणातले मात्तबर नेते म्हणून त्यांची ओळख होती. मनात आणलं असतं तर एका क्षणात त्यांनी या एका रिपोर्टच्या आधारावर संरसंघसंचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असते. पण त्यांनी ते दिले नाहीत, त्याच कारण सांगण्यात येत युपीच्या राजकारणात असणारी कॉंग्रेसची रचना..

तत्कालीन युपी कॉंग्रेसमध्ये संघाच प्राबल्य होतं. आज ऐकून पटणार नाही पण तेव्हा संघाला मानणारी मोठ्ठी लॉबी कॉंग्रेसमध्ये काम करत होती. अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर तत्कालीन युपीच्या विधानसभा अध्यक्ष आत्म गोविंद खेर यांच देता येईल. ते स्वत: कॉंग्रेसचे नेते होते सोबतच संघाचे स्वयंसेवक होते. त्यांची मुले देखील संघाचे स्वयंसेवक होती.. 

थोडक्यात जनसंघ असो किंवा नंतर आलेला भाजप असो, हे दोन्ही पक्षांनी सत्तेपर्यन्त मार्गक्रमण केलं नव्हतं तोपर्यन्त संघाचे कॉंग्रेससोबत संबध चांगले होते अस म्हणता येईल. पण या संबंधाला नेहमीच एक ऑर्ग्युमेंट उभा राहतं ते म्हणजे कॉंग्रेसच्या काळात संघावर लावण्यात आलेली बंदी…

गांधींच्या हत्येनंतर 4 फेब्रुवारी 1948 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा पंतप्रधान होते पंडीत जवाहरलाल नेहरू तर देशाचे गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल यांच्या सांगण्यावरूनच ही बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

पण आजचं राजकारण पाहिलं तर नेहरूंना विरोध म्हणून कट्टर कॉंग्रेसी असणारे सरदार पटेल भाजपला जवळचे वाटतात. असच काहीच पर्सेप्शन कॉंग्रेस आणि संघाचा त्या काळात होत.कारण पुढे वर्षभरातच ही बंदी उठवण्यात आली होती. काश्मिर प्रश्नावरून किंवा चीनसोबत झालेल्या युद्धावरून आज नेहरूंवर टिका केली जाते मात्र त्या वेळी काश्मिर प्रश्नावरून संघाने दिलेल्या योगदानाचं नेहरूंनी कौतुक केलं होतं. 

1962 सालच्या युद्धप्रसंगी संघाने दिलेल्या योगदानाची दखल घेवून 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाच्या स्वयंसेवकांना आमंत्रित केलं होतं.. 

नेहरूंच्या पश्चात देखील संघ आणि कॉंग्रेसचे संबंध विकोपाला गेले नाहीत असच दिसतं. 1965 साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राजकीय पक्ष नसणारी एकमेव संघटना होती ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…

पुढे सत्तेवर आल्या त्या इंदिरा गांधी. 

आणिबाणीच्या काळात संघावर देखील बंदी घालण्यात आली. सुब्रम्हण्य स्वामींनी केलेल्या दाव्यानुसार बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पत्र लिहली होती ज्यामध्ये देवरस म्हणतात, जयप्रकाश नारायण यांच्यासोबत आमचा संबध नाही व कॉंग्रेसच्या वीस कलमी योजनेला आमचा पाठींबा आहे.

ही पत्र देवरसांनी येरवडा जेलमधून लिहली होती. पुढे आणिबाणी त्यानंतर आलेला जनता पक्ष व त्यानंतर सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी या इंदिरा सरकारने संघाला पुरक अशात भूमिका घेतलेल्या दिसतात. त्यातलचं एक उदाहरण म्हणजे तामिळनाडूच्या मिनाक्षीपुरम्..

1980 सालच्या सुरवातीस तामिळनाडूमधल्या मिनाक्षीपुरम् येथे मोठ्या संख्येने दलितांचे इस्लामीकरण करण्यात येत होते. या धर्मांतराबाबत संघाने मोठ्ठी चळवळ सुरू केली. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत विराट हिंदू समाज ही संघटना स्थापन करण्यात आली होती. अन् आश्चर्य वाटेल या संघनटेचे अध्यक्ष एक जेष्ठ कॉंग्रेसी नेते होते. माजी केंद्रिय मंत्री करण सिंग यांना या विराट हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष करण्यात आले होते.

बेरजेच्या राजकारणातून इंदिरा गांधींनी बहुसंख्याक हिंदू विशेषत: हिंदूत्ववादी गटांना जवळ करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या एकात्मता यात्रा ज्या यात्रेचा उल्लेख गंगा जल यात्रा असही केला जातो त्याचं आमंत्रण स्वीकारलं होतं. हा विश्व हिंदू परिषदेचा पहिला जनसंपर्क कार्यक्रम होता व ज्याला इंदिरा गांधी उपस्थित होत्या..

इंदिरा गांधींच्या पश्चात राजीव गांधी व बाळासाहेब देवरस यांच्या गुप्त भेटी झाल्याची माहिती अनेक ठिकाणी दिली जाते. 

जेष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांच्या लेखांमधून त्यांच्या पुस्तकांमधून कॉंग्रेस, राजीव गांधी व संघाच्या संबधावर अधिक जवळून माहिती घेता येते..

रशीद किडवाई सांगतात याच भेटीचं फलीत म्हणजे 1984 च्या निवडणूकांमध्ये राजीव गांधींना संघाने पाठींबा दिला होता. राजीव गांधी व देवरस यांच्या भेटीचा दाखला देताना किडवाई सांगतात गांधी घराण्याचे स्नेही कपिल मोहन यांच्या निवासस्थानी या भेटी होत असत. किमान अर्धा डझन वेळा तरी देवरस यांचे धाकडे बंधू भाऊराव देवरस यांच्यासोबत राजीव गांधीच्या भेटी झाल्या असतील..

दूसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा बाबरीचा प्रश्न चर्चेत येतो तेव्हा तेव्हा राजीव गांधींनीच रामजन्मभूमीचे कुलूप उघडून हा मुद्दा चर्चेत आणल्याचा आरोप होतो. दूसरीकडे राजीव गांधींच्या काळातच दूरदर्शनवर रामायण दाखवण्यास मंजूरी मिळाली. ही मागणी देखील सर्वप्रथम संघानेच केली होती..

आत्ता कालखंडा आला तो अडवाणींच्या रथयात्रेचा, प्रखर हिंदूत्वाचा.. 

पण या काळात देखील कॉंग्रेस आणि संघाचे संबंध सौदाह्र्याचेच होते. नरसिंह राव यांनी देखील चिघळलेल्या परिस्थितीवर ठाम भूमिका घेतली नाही असे आरोप होत राहिले. 1994 साली रज्जू भैय्या यांनी संघाचे सरसंघसंचालक म्हणून कारभार स्वीकारला तेव्हा कॉंग्रेसतच्या एका गटाने अरे राव साहब फिर रहं गये असा टोमणा नरसिंह राव यांना मारला होता..

याचाच अर्थ नरसिंह राव यांचे आणि संघाचे संबंध इतके चांगले होते की राव यांनाच संघाचे प्रमुख करायला हवे होते अस कॉंग्रेसच्या एका गटाची उपहासात्मक टिप्पणी होती.. 

मुळाच जनसंघाची स्थापनाच संघाने राजकीय केंद्रबिंदूवर जाण्यासाठी केली होती. पण या सर्व काळात टिकून राहणं देखील संघासाठी महत्वाचं होतं आणि याचा अंदाज संघाला गांधीहत्येनंतर लादलेल्या बंदीत आला होता. मात्र जेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत विराजमान झाला तेव्हा संघाकडून देखील कॉंग्रेससोबतचे संबध वजाबाकीचे झाले. तर संघाला आधार देत संघ सत्तेत येवू शकतो याची जाणीव कॉंग्रेसी नेतृत्वाला होत गेली व त्यातून कॉंग्रेसकडून देखील हे संबंध वजाबाकीचे ठरत गेले..

हे ही वाच वाच 

Leave A Reply

Your email address will not be published.