काँग्रेसचे नेते टीएमसीमध्ये आणून प्रशांत किशोर काँग्रेस तोडायच्या मार्गावर आहेत?
आगामी ५ राज्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर जिथे पक्ष सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळ्या रणनीती आखण्याचा त्याराची आहे, तिथेचं पक्षांतर्गत वाद, नेत्यांच्या नाराजीचं सत्र सुरु झालायं. यात सगळ्यात जास्त भरडला जातोय तो काँग्रेस पक्ष. पंजाबमधली काँग्रेसची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांदेखतची आहे. त्यात उत्तर प्रदेशमध्ये महत्वाचे चेहरे पक्षातून बाहेर पडलेत काही त्याच मार्गावर आहेत.
आता तसं पाहिलं तर, काँग्रेसची गळती ही २०१४ नंतरच्या मोदी लाटेपासूनचं सुरु झालीये. पण यामुळे काँग्रेस आपले अनेक महत्वाचे चेहरे गमवतोय हे मात्र नक्की, यातचं आता आणखी एक नवीन नाव जोडलं समोर येतंय. ते म्हणजे मुकुल संगमा.
काँग्रेसचे मोठे नेते आणि मेघालय आणि ईशान्येकडील माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा हे पक्ष सोडून टीएमसीमध्ये सामील होणार असल्याचं बोललं जातंय. आणि एकटे संगमाचं नाहीतर तर त्यांच्यासोबत काँग्रेसचे १३ आमदार सुद्धा टीएमसीमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमधून झळकतायेत.
आता महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसमधून टीएमसीमध्ये जाणाऱ्या नेत्यांची यादी अलीकडच्या काळात वाढतचं चाललीये. आणि यामागे प्रशांत किशोर यांचा हात असल्याचे बोलले जातेय.
तसं म्हणायचं झालं तर, काँग्रेस आणि किशोर यांच्यातील अलीकडील जवळीक सुद्धा कोणापासून लपून नाही. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील होण्याच्याही चर्चा सुरू होत्या. पण या सगळ्या गोंधळा दरम्यान अचानक काँग्रेसचे अनेक बडे नेते TMC मध्ये जातायेत.
काँग्रेस सोडून टीएमसीमध्ये जाणाऱ्या बड्या नेत्यांच्या नावावर नजर टाकली तर, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुष्मिता देव. ज्या राहुलच्या टीममध्ये होत्या, सुस्मिता देव ऑगस्टमध्ये टीएमसीमध्ये सामील झाल्या. यानंतर नाव येत ते लुईझिन्हो फेलेरो याचं, गोवा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो २ दिवसांपूर्वीचं टीएमसीमध्ये सामील झालेत. आता यानंतर मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा. संगमा हे लवकरचं टीएमसीमध्ये सामील होण्याच्या चर्चा आहेत.
आता या सगळ्यात प्रशांत किशोरांचा काय हात तर, लुईझिन्हो फेलेरो यांनी किशोर यांच्यामुळेचं टीएमसीमध्ये सामील होण्याचे जाहीरपणे कबूल केले आहे.
आता प्रश्न येतो की, प्रशांत किशोर असं का करू शकतात. तर असे म्हंटले जातेय कि, प्रशांत किशोर यांना काँग्रेस पक्षात मोठी भूमिका हवी आहे. त्यांनी काँग्रेसच्या उच्च नेतृत्वासमोर लवकरात लवकर निर्णय करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधींना यांना सल्लागार समितीचे प्रमुख बनवले पाहिजे, परंतु समितीमध्ये त्यांच्याशिवाय आणखी बरेच लोक असावेत. या समितीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी कार्यकारी समितीकडून देण्यात यावी. याशिवाय त्यांनी पक्षात सामील होण्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत.
किशोरांच्या अश्या अनेक कारणांमुळेच त्यांच्याकाँग्रेसमध्ये सामील होण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काँग्रेसमध्ये ते ज्या प्रकारचे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतायेत, ते पक्षाच्या संघटनात्मक संरचना आणि कार्यप्रणालीनुसार नाही. त्यांच्या अटी मान्य करण्यासाठी पक्षाला आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल करावे लागतील.
एवढचं नंतर, बंडखोर वृत्ती स्वीकारलेला काँग्रेसचा जी -२३ गटही प्रशांत किशोरांना पक्षात घ्यायला विरोध करतंय. यामुळे काँग्रेस हाय कमांड किशोरांना पक्षात सामील करायचे फायदे आणि तोटे काढतय. हाय कमांडला त्यांच्या पक्षात सामील होण्याबाबत शंका असल्यानेही समजतंय.
ही शंका दिवसेंदिवस वाढतीये, यामागचे मुख्य कारण प्रशांत किशोर आणि त्यांची इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (IPAC). जी वेगवगेळ्या मेघालयात टीएमसीसोबत मिळून ‘मिशन त्रिपुरा’ चा प्लॅन आखतंय. तर दुसरीकडे गोव्यात सुद्धा IPAC आणि टीएमसीने मिळून आधीच रणनीती आखलीये.
आता यामागचा हेतू जरी भाजपला घेरण्याचा असला तरी याचा फटका कुठे ना कुठे काँग्रेसला सुद्धा बसतोय. त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश अद्यापतरी संशयाच्या भोवऱ्यात आहे.
हे ही वाचं भिडू :
- प्रशांत किशोर आता ममतांच्या भवानीपूरचे मतदार झालेत यामागे पण काही प्लॅन आहे का?
- एकेकाळी प्रशांत किशोरांना काँग्रेसमध्ये आणा असं म्हणणाऱ्या नेत्यांनी आता पलटी मारलीये
- माजी मुख्यमंत्र्यांना हाताशी धरून तृणमूल काँग्रेस गोव्याच मैदान मारण्याची तयारी करत आहे?