काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद तरुणाकडे सोपवण्याविषयी पक्षातील तरुण नेत्यांना काय वाटत?

महाराष्ट्रात सध्या प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या वरिष्ठ नेत्याकडे द्यावे किंवा तरुण नेतृत्वाकडे सोपवावे अशी मागणी स्वतः थोरात यांनी केली आहे. त्यामुळे तरुणांना संधी मिळण्यास मदत होईल असं ते म्हणाले.

या बदलाच्या मागणीसाठी त्यांनी ३ आणि ४ जानेवारी रोजी त्यांनी दिल्ली दौरा काढून काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल, खा. राजीव सातव यांची भेट देखील घेतली होती.

२ आठवड्यापूर्वी काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले होते. त्यात भाई जगताप यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, मुंबई काँग्रेससाठी नव्या प्रभारीची देखील नियुक्ती केली होती. या बदलानंतरच प्रदेश काँग्रेसमधील बदलांच्या चर्चाना सुरुवात झाली होती.

बाळासाहेब थोरात हे विद्यामान प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते आणि महसूल मंत्री आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नियमानुसार एकावेळी दोन संघटनात्मक पदांची जबाबदारी एकाच व्यक्तीला देता येत नाही.

त्यासाठी बाळासाहेब थोरात यांना किमान एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

त्यामुळेच त्यांनी मंत्रिपदाला न्याय देता यावा आणि तरुणांना संधी मिळावी यासाठी तरुण नेतृत्वाकडे जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या या मागणीमुळे वरिष्ठांची नाव जरी आघाडीवर असली तरी पक्षाला कुठेतरी तरुण नेतृत्व मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या याच भूमिकेबद्दल काँग्रेसमधील तरुण नेत्यांना काय वाटत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यासाठी ‘बोल भिडू’ने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ता अ‍ॅड. कल्याणी माणगावे, नाशिकचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील,  अकोला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांच्याशी संपर्क साधला.

यामधील

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

हा सर्व निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर घेण्याचा आहे, पण तरीही पक्षाने तरुणांना संधी द्यायला पाहिजे. जो पर्यंत जास्तीत जास्त तरुण काँग्रेसशी जोडला जात नाही तो पर्यंत पक्षाला जास्तीत जास्त यश मिळणार नाही.

पक्षातील वरिष्ठ नेते आणि तरुण मंडळी यांच्या एकत्रित चालण्यानेच पक्ष पुढे जातो. बाळासाहेब थोरात यांनी देखील याच भूमिकेमधून हि मागणी केली आहे.

सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सत्तेच्या केंद्रीकरणाचे आरोप होत आहेत. या आरोपांविषयी ते म्हणाले, हे संपूर्णतः चुकीचे आरोप आहेत. बाळासाहेब थोरात यांचा भाचा म्हणून मला युवक काँग्रेसची जबाबदारी मिळालेली नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या २० लाख युवकांनी मतदान करून निवडून दिलेलं आहे. संपूर्णपणे लोकशाहीच्या प्रक्रियेतून म्हणजेच निवडणुकीतून निवडून आलो आहे.

मी जवळपास २० वर्ष झालं देशभरात संघटनेचं काम करत आहे. २००० साली युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे. यापूर्वी देखील मी दोन वेळा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी मला होता आलं नाही. तेव्हा मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आणि २०१८ मध्ये मी पुन्हा निवडणूक लढवून अध्यक्ष म्हणून काम करत आहे.

या सगळ्यानंतर देखील असा आरोप करणं हे चुकीचं आन अन्याय करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण कि अनुभवी यावर मत मांडताना प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

तरुणांना संधी द्यायलाच हवा. त्याबद्दल कोणाचे दुमत नाही.  पण यासोबतच तरुण आणि वरिष्ठ यांची सांगड घालणार तो नेता हवा.  थोडं त्याला राज्याची जाणं आहे, चांद्यापासून – बांद्यापर्यंत जो व्यक्ती ओळखतो अशा व्यक्तीच्या खांद्यावरती हि जबाबदारी सोपवायला हवी.

राज्यातील सध्याची परिस्थिती बघता तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे थोडासा अनुभवी गरजेचं आहे. त्या नेत्याने कमीत कमी २ ते ३ तरी निवडणूका लढवलेल्या असाव्यात. कारण तिन्ही पक्षामध्ये त्याचा प्रभाव असावा.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे या मान्यवर अध्यक्ष आहेत. या दोघांशी बोलताना त्याचा प्रभाव जाणवला पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी भांडावं लागलं नाहीच पाहिजे पण जर कधी तशी वेळ आली तर भांडावं देखील लागलं पाहिजे.

याच विषयावर प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या अ‍ॅड. कल्याणी माणगावे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाल्या,  

प्रदेशाध्यक्ष पदाचा विचार करताना वय या गोष्टीकडे न बघता वरिष्ठांनी पक्षाला, संघटनेला पूर्ण वेळ देऊ शकेल अशा नेत्याला हि संधी दिली पाहिजे. केवळ युवकच नाही तर सर्व घटकांना सोबत घेऊन चालणार नेता महत्वाचा आहे. त्यातूनच तरुण देखील पक्षाशी जोडला जाईल. त्यांना जास्तीत संधी मिळेल. जबाबदारी मिळेल.

३ पक्षांचं सरकार असल्यामुळे तरुणाकडे जरी नेतृत्व सोपवलं तरी वरिष्ठांची टीम आणि साहाय्य गरजेच आहे.

तर युवक काँग्रेस नाशिकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

प्रदेश काँग्रेसची जबाबदारी म्हणजे काटेरी मुकुट आहे. त्यामध्ये नवे, जुने, वरिष्ठ, कनिष्ठ अशा सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समतोल साधावा लागतो. पुढे जाऊन २०२२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. त्यामुळे तिथे मोठी कसरत होणार आहे.

कारण वरती सोबत असलो तरी खाली काय भूमिका घ्यायची, एकत्र जायचं, कि काही वेगळी भूमिका घ्यायची यासाठी तरुण आणि मॅच्युअर चेहरा असावा. तरुण दिला त्या निर्णयाचं स्वागतच होईल. ज्यामुळे तरुण जो काँग्रेसपासून दुरावला आहे तो पुन्हा पक्षाकडे येईल. पक्षाचं वातावरण बदलायला पोषक होईल.

पण सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांमध्ये प्रभावी राहिली. वेळ पडली तर प्रसंगी तडजोडीची भूमिका घेईल.

युवक काँग्रेस अकोल्याचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या तरुण नेत्याकडे जबाबदारी सोपवण्यासंदर्भाच्या भूमिकेशी मी सहमत आहे. कारण जो पर्यंत युवा वर्ग पक्षामध्ये पुऱ्या ताकदीने सहभागी होणार नाही तो पर्यंत पक्ष वाढणार नाही. त्यामुळे मंत्री महोदयांच्या म्हणण्याप्रमाणे तरुणाला आणि पूर्णवेळ पक्षासाठी देणारा व्यक्ती असला पाहिजे.

आपला देश तरुणांचा देश आहे, त्यामुळे तरुणांच्या भावना, त्यांच्या गरजा, हे एखादा तरुण नेताच जणू शकतो. सोबतच यामुळे शहरातील देखील तरुण वर्ग पक्षाशी जोडला जाईल. आणि तरुण म्हणजे अगदी २५-३० अशा मधील नाही, काँग्रेसमध्ये ४०-४५ च्या जरी नेत्याकडे दिल तरी आम्ही त्याच स्वागत करू.  

या सगळ्यांची मत ऐकल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेसचे नेते तरुण जबाबदारीसाठी सहमत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. दिल्लीमध्ये काय निर्णय होतात, ते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेशी सहमत होऊन तरुण नेतृत्वाकडे जबाबदारी देणार कि, आणखी वरिष्ठ कोण चेहरा प्रदेशाध्यक्ष पदावर येणार हे आता लवकरच कळेल.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.