काँग्रेस महागठबंधनच्या गळ्यातील लोढणं झालंय का ?

आज जाहीर झालेल्या निकालामध्ये ७४ जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. तर लालूंचा राष्ट्रीय जनता दल ७३ जागांसह तर दुसऱ्या नंबरवर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल(यू) हा ७१ जागांवरून थेट ३९ जागांवर घसरला आहे. तर राष्ट्रीय पक्ष असलेला कॉंग्रेस चौथ्या स्थानावर गेला आहे. ७० जागांवर निवडणूक लढवलेल्या कॉंग्रेसला अवघ्या २० जागांवर समाधान मानावं लागत आहे.

राजदला सत्ता स्थापनेसाठी १३-१५ जागा कमी पडत आहेत. पण कॉंग्रेसच्या या ‘फ्लॉप शो’ मुळे आता तेजस्वी यादव यांच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यांवर मात्र पाणी पडलं आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस राजदच्या गळ्यातील लोडणं झालय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने एकूण ७५ जागांची मागणी केली होती. पण राजदने इतक्या जागा देण्यास नकार दिल्यानंतर महागठबंधनमधून बाहेर पडण्याचा दबाव टाकत ७० जागा पदरात पडून घेतल्या.

कॉंग्रेसची या खराब कामगिरीवर जेष्ठ पत्रकार पत्रकार अशोक कुमार शर्मा म्हणतात की,

कॉंग्रेसने जास्त जागांसाठी आग्रह धरला, पण त्या निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडे कार्यकर्ते किंवा तगडे उमेदवार नव्हते. मिथिलांचल हा कॉंग्रेस बालेकिल्ला मानला जातो. परंतु इथल्या ६० जागांपैकी ४२ जागा एनडीएच्या खात्यात गेल्या आहेत. तसेच कॉंग्रेस जरी २० जागांवर जिंकली असेल तरीही ही राजद आणि डाव्यांच्या मतदारांची कृपा आहे.

त्यामुळे कॉंग्रेसला निवडणुकीत सोबत घेण्याच्या निर्णयावर राजदला आता पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे.

प्रचारादरम्यान राहुल गांधी शिमल्याच्या सुट्टीवर. 

निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत तेजस्वी यादव दिवसात ४ सभा घेत असताना राहुल गांधी मात्र शिमाल्यला ४ दिवसांच्या सुट्टीवर गेले होते. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. यानंतर त्यांनी प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर म्हणजे २३ ऑक्टोंबरला पहिली प्रचार सभा घेतली होती. यानंतर संपूर्ण प्रचारात राहुल यांनी केवळ ६ सभा घेतल्या होत्या.

३५ वर्षापूर्वीच्या निवडणुकीत मिळाले होते बहुमत. 

२०१५च्या निवडणुकीत कॉंग्रेसने एकूण ४१ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी २७ जागा जिंकल्या होत्या. तर २०१० मधील निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वच्या सर्व २४३ जागा लढवल्या पण त्यापैकी केवळ ४ जागा जिंकल्या.

२००५ मध्ये बिहारमध्ये दोनदा निवडणुका घेण्यात आल्या. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने ८४ जागा लढवल्या त्यातील १० जिंकल्या. तर तर ऑक्टोबरमध्ये ५१ जागांवर लढून केवळ ९ जागा जिंकल्या. २००० मध्ये एकत्रित बिहारच्या ३२४ जागांमध्ये कॉंग्रेसने २३ जागा जिंकल्या. १९९५ मध्ये ३२० पैकी २९ जागा जिंकल्या होत्या.

१९९० मध्ये कॉंग्रेसने ३२३ पैकी ७१ जागा जिंकल्या. तर १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने ३२३ पैकी १९६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. मात्र आता या निकालाला ३५ वर्षे उलटून गेली आहेत. नितीश-लालू राजकारणाच्या उदयानंतर कॉंग्रेसची गाडी रुळावरून घसरली ती अजून परत मार्गावर परतलेली नाही. 

अखिलेश यादव यांना पूर्वानुभव. 

मित्रपक्षाला पूरक कामगिरी न करण्याची कॉंग्रेसची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांना हा अनुभव आला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसने एकत्र येत निवडणुका लढवल्या होत्या.

यात एकूण ४०३ जागांपैकी समाजवादी पक्षाने २९८ जागा तर कॉंग्रेसने १०५ जागा लढवल्या होत्या. यात १०५ मधील केवळ ७ जागा जिंकत कॉंग्रेस स्वतः बुडला होताच पण समाजवादी पक्षाला सोबत घेऊन बुडाला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.