आधी चरणजीतसिंग चन्नी, आता मेवानी… काँग्रेस दलित राजकारणाचा अजेंडा सेट करतीय?

भाजपच्या तुलनेत मागच्या ७ वर्षांच्या काळात काहीसा मागे पडत असलेला काँग्रेस पक्ष आता आपली राजकीय समीकरण पुन्हा दुरुस्त करण्याच्या प्रयत्नांना लागला आहे, असं म्हंटल्यास आता वावगं ठरणार नाही. कारण आधी काँग्रेसने पंजाबमध्ये दलित नेते चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. तर आता काँग्रेसने थेट गुजरातचे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनाचं पक्षात आणलं आहे.

त्यामुळेच पुढील वर्षी होतं असलेल्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आता भाजपसोबत दोन हात करण्यासाठी दलित अजेंडा सेट करत आहे का? असा प्रश्न पडत आहे.

दलित आंदोलनामधून राजकीय ओळख मिळवलेले जिग्नेश मेवाणी यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा हात पकडला आहे. त्यांच्यासोबत कन्हैया कुमार देखील काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. मेवाणी राजकारणात यायच्या आधी पत्रकार, वकील होते. पुढे जाऊन दलित चळवळीत उतरले आणि आता आमदार आहेत.

मेवाणी सगळ्यात जास्त चर्चेत आले होते ते, गुजरातमधील ऊना घटनेनंतर. त्यावेळी त्यांनी घोषणा दिली होती कि,

दलित समाज आता मृत जनावरांची चामडी काढणे, मैला उचलण्यासारखी खालच्या दर्जाची काम करणार नाही. त्यानंतर मेवाणी गुजरातच्या आरक्षित वडगाम मतदारसंघातून निवडणूक लढवत ते अपक्ष आमदार झाले. त्यावेळी काँग्रेसने मेवाणी यांच्या समर्थनार्थ आपला उमेदवार दिला नव्हता, त्याचा फायदा देखील त्यांना मिळाला. त्यानंतर आता अधिकृतरित्या ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

चरणजीतसिंग चन्नी सध्याच्या घडीला देशातील एकमेव दलित मुख्यमंत्री

काँग्रेसच्या सध्याच्या घडीच्या दलित राजकारणाचा मुख्य पाया आहे तो, चरणजीत चन्नी. पंजाबचे मुख्यमंत्री असलेले चन्नी सध्याच्या घडीला देशात दलित समुदायाचे एकमेव मुख्यमंत्री आहेत. भाजपचे आणि मित्र पक्षांचे देशात निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये सरकार आहेत. मात्र भाजपने एकही दलित मुख्यमंत्री दिलेला नाही.

इतकच काय तर भाजपने आपल्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या राजकीय समीकरणांमध्ये एकाही दलित मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवलेला नाही. तर काँग्रेसने याआधी बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये दलित समाजाचे मुख्यमंत्री दिले आहेत. यापूर्वी बिहारमध्ये जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर मागच्या ६ वर्षात एकही दलित मुख्यमंत्री बनलेले नाही.

काँग्रेसची पुढची नजर चंद्रशेखर आणि उत्तराखंडवर?

काँग्रेसच्या दलित राजकारणाचा अजेंडा इथंच थांबत नाही. असं म्हंटलं जात आहे कि, काँग्रेसची पुढची नजर हि उत्तर प्रदेशमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर आहे. चंद्रशेखर यांचं प्रियांका गांधी यांच्यासोबत चांगले ट्युनिंग आहे. त्या अलीकडेच चंद्रशेखर यांना मेरठच्या हॉस्पिटलमध्ये भेटायला देखील गेल्या होत्या.

मागच्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेशमध्ये चंद्रशेखर यांच्या पक्षासोबत काँग्रेस युती करणार असल्याची चर्चा होती. पण अद्याप त्याबाबत काही स्पष्टता आलेली नाही.

उत्तराखंडमध्ये देखील दलित मुख्यमंत्री देणार?

पंजाब नंतर उत्तराखंडमध्ये देखील काँग्रेस दलित मुख्यमंत्री देऊ शकतो अशा चर्चा सध्या सुरु आहेत. यासाठी कारण ठरलं आहे ते म्हणजे अलीकडेच उत्तराखंड काँग्रेसचे प्रचार अभियानचे प्रभारी हरीश रावत यांनी केलेलं एक वक्तव्य.

रावत म्हणाले होते कि,

ते एका आगामी काळात दलित समुदायातील व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बघू इच्छित आहेत. आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी ते पूर्णपणे काम करतील.

त्यामुळे आगामी काळात उत्तराखंडमध्ये देखील काँग्रेस निवडणुकीपूर्वी दलित नेता मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकते. किंवा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र सोपवण्याच आश्वासन देऊ शकते.

काँग्रेसचा दलित अजेंडा त्यांना इतर राज्यांमध्ये देखील उपयोगी पडू शकतो?

देशात सध्या एकूण लोकसंख्येच्या १६.६ टक्के लोकसंख्या दलित समुदायाची आहे. यात सध्या गुजरातमधील दलित मतांची टक्केवारी बघितली तर ती २२ टक्के आहे. तर बिहारमध्ये १५, पंजाबमध्ये ३२ टक्के, उत्तरप्रदेशमध्ये २२ टक्के, उत्तराखंडमध्ये १८ ते २० टक्के दलित मतदार आहेत.

त्यामुळे आगामी काळात उत्तरप्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तराखंड अशा मोठ्या राज्यांमध्ये चरणजीत चन्नी, जिग्नेश मेवाणी, चंद्रशेखर यांना स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस मैदानात उतरवू शकते. सोबतच चन्नी यांच्यामुळे पंजाबमधील ३२ टक्के अशा मोठ्या मतदारांना काँग्रेस आपलसं करू शकते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.