आरएसएसचा जन्मच मुळात कॉंग्रेसच्या एका संघटनेमधून झालाय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हणजेच आरएसएस. भारतात हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर उचलून धरलेली शिस्तबद्ध स्वयंसेवकांची संघटना. भाजप या त्यांच्याशि सलंग्न विचारांच्या राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी स्वयंसेवक तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे काम करत असतात. भाजपचे बलस्थान काय तर आरएसएसचे सदैव दक्ष असणारे केडर अस सांगितल जात.

गेली अनेक वर्षे संघाचा गणवेश पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी असा होता. त्यांचे मोठमोठे नेतेही या गणवेश परिधान करायला लाजायचे नाहीत. यामुळेच त्यांचे कॉंग्रेसवाले विरोधक या संघटनेला चड्डीवाल्यांची संघटना असे म्हणतात.

पण गंमतीची गोष्ट म्हणजे आरएसएस ची स्थापनाच कॉंग्रेसच्या एका संघटनेमधून झाली आहे.

कॉंग्रेस सेवा दल.

कॉंग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांची जननी म्हणून या संघटनेला ओळखलं जात.तिची स्थापना केली होती डॉ.नारायण सुब्बाराव हर्डीकर.

ना.सु.हर्डीकर हे मुळचे धारवाड कर्नाटकचे. त्यांचा जन्म १८८९ साली झाला. ते शिक्षणाने डॉक्टर होते. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले. तिथे त्यांची भेट थोर नेते लाला लजपतराय यांच्याशी झाली. त्यांच्यामुळे हर्डीकर होमरूल चळवळीशी जोडले गेले. अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्याच कार्य करू लागले. होमरूल लीग या संघटनेच त्यांना सचिवपद देण्यात आलं.

अमेरिकेतील भारतीय मजुरांची संघटना उभी केली. अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्याबद्दल जनमत तयार करण्यासाठी लाला लजपतराय आणि ना.सु.हर्डीकर यांनी प्रयत्न केले. तिथल्या अमेरिकन भारतीय परिषदेचे देखील ते अध्यक्ष होते. अमेरिकेतल्या संसदीय समितीपुढे देखील त्यांची साक्ष झाली होती. यंग इंडिया या पत्रामार्फत त्यांनी लिहिलेले लेख तिथे प्रचंड गाजले होते.

शिक्षण झाल्यावर ना.सु.हर्डीकर भारतात परत आले. लाला लजपतराय आणि लोकमान्य टिळकांच्या मैत्रीमुळे ते कॉंग्रेस पक्षाशी जोडले गेले. येथेच त्यांची भेट नागपूरच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी झाली.  दोघेही स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारावून गेलेले.

१९२० सालच्या नागपूर येथे भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी या दोघांनी उचलली. त्यांनी व डॉ. परांजपे यांनी गोळा केलेल्या बाराशे स्वयंसेवकांनी हे अधिवेशन यशस्वी पणे पार पाडले. डॉ.हेडगेवार आणि डॉ. हर्डीकर या दोघांनी एखाद्या प्रशिक्षित सैनिकांप्रमाणे शिस्तबद्ध उभ्या केलेल्या या कार्यकर्त्यांच्या टीमचे नाव राष्ट्रीय सेवा मंडल असे होते.

पुढे १९२३ साली मध्यभारतात इंग्रजांच्या विरुद्ध झेंडा सत्याग्रहास सुरवात झाली. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी खुद्द पंडीत नेहरू, वल्लभभाई पटेल हे तरुण कॉंग्रेस नेते नागपूरला आले होते असं म्हणतात.

या आंदोलनात बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे गीत आणि नागपुरातील श्यामलाल गुप्त पार्षद यांचे विजयी विश्व तिरंगा प्यारा हे ध्वजगीत यास मान्यता देण्यात आली. हे आंदोलन प्रचंड गाजले. इंग्रजांनी कार्यकर्त्यांची धरपकड करून हे झेंडा सत्याग्रह मोडून काढले.

डॉ.हेडगेवार आणि डॉ.हर्डीकर यांची रवानगी नागपूरच्या जेलमध्ये झाली. दोघे एकत्रच होते. तिथे त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असत. यातूनच कॉंग्रेसमध्ये एका लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या शिस्तबद्ध संघटनेच्या बांधणीची कल्पना पुढे आली.

डॉ.ना.सु. हर्डीकर यांनी राष्ट्रीय सेवा मंडलच्याच कार्यकर्त्यांची हिंदुस्तानी सेवा दल नावाची संघटना तुरुंगातच स्थापन केली. डॉ.हेडगेवार देखील या संघटनेचा भाग होते आणि त्याच्या निर्माणात त्यांचाही सिंहाचा वाटा होता. पुढे या सगळ्या कार्यकर्त्यांची सुटका झाली.

बाहेर आल्यावर हर्डीकर यांनी हिंदुस्तान सेवा दलाची कल्पना सरोजिनी नायडू यांच्या कानावर घातली. सरोजिनी नायडू यांनी त्यांना पंडीत जवाहरलाल नेहरू यांची भेट घेण्यास सुचवले. अलाहबादला जाऊन नेहरूंन हि संघटना व तिचे कार्य, उद्देश सांगण्यात आले. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी अशी संघटना असावी यावर नेहरूंचहि एकमत झालं.

यातूनच १९२३ साली काकिनाडा येथे भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात सेवा दलाची अधिकृत सुरवात करण्यात आली.

पहिल्यांदा कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी सेवा दलाला विरोधच केला होता. गांधीजींच्या अहिंसावादी विचारसरणीमध्ये हि संघटना बसत नाही अस काहीजणांच म्हणन होतं. मात्र स्वतः जवाहरलाल नेहरू याचे पहिले अध्यक्ष झाल्यामुळे हा विरोध मावळला.

इकडे डॉ.केशव हेडगेवार यांनी कॉंग्रेसच्या खिलाफत चळवळीला मुस्लिमांचे लागुंलचालन करण्याचे धोरण असे म्हणत पक्षास रामराम ठोकला. त्यांनी १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना उभारली. हिंदूंचे ऐक्य व संघटन हे त्यांचे उद्देश होते.

डॉ.हर्डीकर मात्र कॉंग्रेस पक्षात राहिले. टिळकांच्यानंतर गांधीजींचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. कट्टर गांधीवादावर आयुष्यभर वाटचाल केली. त्यांच्यामुळेच कॉंग्रेसमध्ये दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सेवा दलामार्फत ध्वजवंदन करण्याची परंपरा रूढ झाली.

त्यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्तान सेवा दलाने व त्याच्या कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत प्रचंड काम केले. सेवा दलाबद्दल असलेली कॉंग्रेस नेत्यांची आढी या निमित्ताने दूर झाली. १९३१ साली कॉंग्रेस वर्किंग कमिटीने देशभर या संघटनेची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले. हिंदुस्तान सेवा दल हे नाव बदलून कॉंग्रेस सेवा दल असे नवे नामकरण करण्यात आले. प्रत्येक राज्यात याची संघटना उभारण्यात आली. देश पातळीवर मुख्य संघटक नेमण्यात आला.

आजही कॉंग्रेस सेवा दल अस्तित्वात आहे.कॉंग्रेसचे अनेक कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्याच कडे असते. या सेवा दलाचे कार्यकर्ते सत्तेच्या राजकारणात सहभागी नसतात मात्र कॉंग्रेसचे सच्चे शिपाई म्हणून त्यांना ओळखण्यात येतं. मात्र गेल्या काही काळात कॉंग्रेस सेवा दलाकडे पक्षाचेच दुर्लक्ष झाले याचा परिणाम त्यांनी केडर गमावला. याच्या उलट हेडगेवार यांची आरएसएस मात्र आजही भाजपवरची पकड मजबूत ठेवून आहे.

मागील काही काळापासून राहुल गांधीनी या कॉंग्रेस सेवा दलाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.