निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला मात्र पक्षाची ही एक परंपरा कायम आहे…

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला आहे. एकेकाळी गुजरातमध्ये सर्वाधिक १४९ जागा मिळवण्याचा रेकॉर्ड नावावर असलेल्या काँग्रेसला आजवरच्या इतिहासात सगळ्यात कमी जागा मिळाल्या आहेत.

१९९० च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४९ पैकी ११६ गमावल्या आणि काँग्रेसच्या हातात फक्त ३३ जागा उरल्या होत्या. अगदी तशाच प्रकारचं अपयश काँग्रेसला या निवडणुकीत पाहावं लागलंय.  

या ऐतिहासिक पराभवाची जबाबदारी स्वीकारून गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रघु शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिलाय.

रघु शर्मा हे मुळचे राजस्थानचे, २००८ पासून ते अजमेर विधानसभा मरदारसंघातून राजस्थानचे आमदार आहेत. शर्मा यांनी २०१८-२१ या काळात अशोक गहलोत सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम सांभाळलं. कोरोनाच्या काळात उत्तम व्यवस्थापनामुळे त्यांचं कौतुक झालं होतं. तर गुजरात सरकारने कोरोना काळात चांगलं व्यवस्थापन केलं नाही म्हणून गुजरातच्या भाजप सरकारवर आरोप करण्यात येत होते.

नोव्हेंबर २०२१ मध्ये काँग्रेसने रघु शर्मा यांना राजस्थानच्या आरोग्यमंत्री पदावरून काढून त्यांच्याकडे गुजराचं प्रदेशाध्यक्षपद दिलं होतं. एक वर्ष ते गुजरातमध्ये काँग्रेसचं नियोजन करणे आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सांभाळत होते. या ऐतिहासिक पराभवानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय, पण निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देणारे ते पहिले काँग्रेस नेते नाहीत. 

निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देण्याची काँग्रेसमध्ये परंपरा राहिली आहे. 

जेव्हा एखाद्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होतो, तेव्हा त्या राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतात. याच परंपरेत रघु शर्मा यांनी गुजरातच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. निव्वळ राज्याच्या विधानसभाच नाहीत तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. 

निवडणूक हरल्यानंतर राजीनामा देण्याची अलिखित परंपरा काँग्रेसमध्ये आधीपासूनच पाळली जातेय परंतु अलीकडच्या काळात जेव्हा जेव्हा पक्षाचा पराभव झालाय तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा देण्याचं प्रमाण वाढलंय. काँग्रेसच्या पराभवाची खरी सुरुवात झाली होती १९९८ सालापासून.

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांचा राजीनामा घेण्यात आला होता. 

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला १८२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला १४१ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीतील पराभवाचं खापर सीताराम केसरी यांच्यावर फोडलं आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला असं सांगितलं जातं. 

सीताराम केसरी यांच्या राजीनाम्यावर आजही वादविवाद होतात, त्यांना धक्के मारून काँग्रेसमधून काढण्यात आलं असं सांगितलं जातं. मात्र १९९८ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर केसरी यांनी राजीनामा दिला होता हे मात्र नक्की. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर १३ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांनी  राजीनामे दिले होते. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा २०१४ प्रमाणेच जबरदस्त पराभव झाला होता. तेव्हा काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी स्वतःच्या राज्यामधील जागा निवडून न येण्यामागे आपले प्रयत्न कमी पडले असं सांगून पदाचे राजीनामे दिले होते. यात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, मध्य प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी नैतिक कारण देत राजीनामे दिले होते.

त्यासोबतच पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार, आसामचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनाईक इत्यादी नेत्यांनी सुद्धा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि प्रदेशाध्यक्ष पदाचे राजीनामे दिले होते.

१३ प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी यांनी देखील काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेसने २०१९ ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढवली होती. या निवडणुकीत पक्ष्याच्या इतर नेत्यांसोबत स्वतः राहुल गांधी अमेठी सीटवरून निवडून येतील की नाही यावर साशंकता होती. राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड अशा दोन जागांवरून निवडणूक लढवली.

अमेठीची चिंता अखेर खरी ठरली, स्मृती इराणी यांनी अमेठी सीटवर राहुल गांधी यांचा पराभव केला. या पराभवात राहुल गांधी यांच्यासोबतच काँग्रेसच्या इमेजला सुद्धा धक्का बसला होता. कारण या सीटवरून राहुल गांधी यांच्यापूर्वी संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी या गांधी परिवारातील लोकांनी सुद्धा निवडणूक लढवली होती.

त्यामुळे राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

२०२२ मध्ये झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभेतील पराभवानंतर स्वतः काँग्रेस अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते.

मार्च २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत एकाही राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवता आली नव्हती. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसच्या जागा कमी झाल्या होत्या, पण यापेक्षा जास्त धक्का बसला पंजाबमध्ये. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पंजाब आम आदमी पक्षाच्या हातात गेल्यामुळे काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता.

या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी पाचही राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. यात पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धु, उत्तर प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू, उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदीयाल यांच्यासोबत गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा राजीनामे दिले होते.

या मोठ्या उदाहरणांसोबतच जेव्हा जेव्हा वेगवगेळ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झालाय, तेव्हा तेव्हा काँग्रेस नेत्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे. या राजीनामा देण्याच्या परंपरेला काही अपवाद आहेत, पण अपवादांसोबतच काँग्रेसने पराभवानंतर राजीनामा देण्याची परंपरा पाळलीय.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.